ममता बॅनर्जी आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मुंबईला आल्या होत्या तेव्हा त्या उद्धवजींना भेटल्या होत्या. हे नाते स्मरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत त्यांची भेट घेतली यात काहीच गैर नाही. शिवाय ममतादीदींनी संजय राऊत यांच्याकडे उद्धवजींकरिता काही संदेशही दिले. त्यातही काही गैर नाही. मोदींच्या विरोधातला, तिसरा पर्याय चाचपणीसाठी त्या दिवशी त्या दिल्लीत गेल्या, तेथे त्यांनी काही भेटीगाठी घेतल्या, यातही काही गैर नाही. पण रालोआचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली तेव्हा माध्यमांना त्यामध्ये ‘साटेलोटे’ दिसू लागले हे मात्र गैर आहे. पश्चिम बंगाल आणि शिवसेना यांच्या नात्याला जोडणारा एक समान दुवा आहे. तो म्हणजे, ‘वाघ’! वर्तमानकाळ कसाही असला तरी शिवसेना म्हटल्यावर तो ‘वाघाचा मुखवटा’च मराठी माणसाच्या डोळ्यासमोर येतो. शिवाय, उद्धव ठाकरे व्याघ्रप्रेमी आहेत, मुंबईच्या संजय गांधी उद्यानात बंगाली वाघ आणून त्यांचे पालकत्व घेण्याचा पहिला प्रयोग त्यांनीच केला होता, हेही सर्वानाच माहीत आहे. आता तर, सेनेचा वाघ आणि भाजपचा सिंह मिळून वाटेवर येणाऱ्या उंदरांचा नायनाट करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वत:च जाहीर केले आहे. म्हणजे वाघ म्हणून राजमान्यता मिळालेल्या शिवसेनचे प्रवक्ते आणि बंगाली वाघीण अशी प्रतिमा असलेल्या ममतादीदी यांची भेट झाली तर माध्यमांना वेगळा राजकीय वास का यावा हे एक कोडेच आहे.  असे म्हणतात की, लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने मोदी सरकारच्या विरोधातील सर्व पक्षांची आघाडी करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पण या बातमीत तरी, आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे?.. निवडणुका दिसू लागल्या, की विरोधकांच्या आघाडीचे प्रयत्न सुरू होणे ही तर नित्याचीच बाब असते.  निवडणुकीनिमित्त जी काही मतांच्या राजकारणाची गणिते आखण्याची गरज असते, ती आखणे हे राजकीय पक्षांचे तर कर्तव्यच असल्याने, आघाडीची मोट बांधण्यासाठी या वेळीही तसे प्रयत्न सुरू झाले इतकीच ही एक सामान्य बाब असताना, ममता बॅनर्जी दिल्लीत राजकीय नेत्यांना भेटल्या आणि त्यांनी शिवसेनेच्या खासदाराचीही भेट घेतली ही घटना माध्यमांना जणू भविष्यातील राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी देणारी का बरे वाटावी?.. तसेही, सध्या शिवसेनेच्या बाबतीतच माध्यमांसमोर प्रश्नचिन्हे का उमटावीत, हा एक प्रश्नच आहे. तिकडे राऊत यांनी ममतादीदींची भेट घेतली, त्यांचा संदेश घेऊन ते उद्धवजींना भेटले ही एक बातमी झाली. पण त्यापाठोपाठ लगेचच उद्धवजी तातडीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी विधान भवनात ताटकळले, तेव्हा त्या भेटीचा या घडामोडींशी काही संबंध असावा अशी सुतराम शंकादेखील कुणाला आली नाही. विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उद्धवजी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट ठरूनही झाली नाही ते बरेच झाले. नाही तर संजय राऊत यांना ममतादीदींनी उद्धवजींसाठी दिलेला संदेश आणि पाठोपाठ उद्धवजींची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक यांचेही काही वेगळे अर्थ शोधत माध्यमांचे द्राविडी प्राणायाम सुरू झाले असते. दोन वाघांची भेट एवढाच त्या दिल्लीतील भेटीचा अर्थ लावला असता, तर एवढे अनर्थ शोधण्याची गरजच राहिली नसती. अशा भेटीगाठी होतच असतात.