आपल्या भारतीय लोकांची एक अगदी वाईट्ट सवय आहे. अमेरिकेतील कुटुंबव्यवस्थेला सातत्याने बोल लावण्याची. ‘तिकडच्या नात्यांमध्ये ओलावाच नसतो.. सगळा नुस्ता व्यवहार’, हे आपले आवडते मत. पण अमेरिकेतही कुटुंबव्यवस्था कशी टिकून आहे, याचा दाखला प्रत्यक्ष अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिला आहे. श्रीमान ट्रम्प गेले होते जर्मनीला जी-२० परिषदेसाठी. जगातल्या २० देशांचे प्रमुख जमले होते त्या निमित्ताने. अशा परिषदांना राष्ट्रप्रमुख आपापल्या सौंना बरोबर घेऊन जातात अनेकदा. पण या सौंचा दौऱ्यातील सहभाग तसा बेतास बात असतो. पण ट्रम्प, सौ. मेलेनिया ट्रम्प व  मुलगी इव्हांका यांनी जी-२० परिषदेदरम्यान त्यांच्यातील घट्ट नात्यांचे जे हृदयंगम दर्शन घडविले त्याने सगळ्याच उपस्थितांचे ऊर भरून आले म्हणतात. ट्रम्प यांना केवळ अमेरिकाच नाही, सगळ्या जगाचा कारभार पाहावा लागतो. त्यात आणि घरे बांधण्याचा रोजचा व्यवसाय. रोज आपले गवंडी आले की नाही ते पाहा, मुकादम वेळेत येतायत की नाही ते पाहा, सिमेंटचे भाव वाढलेत की काय यावर लक्ष ठेवा. एक माणूस काय काय म्हणून बघणार? त्यामुळेच सौ. मेलेनिया ट्रम्प आणि इव्हांका या दोघींनी जी-२० परिषदेदरम्यान डोनाल्ड यांना खूपच मदत केली. या परिषदेदरम्यान एक बैठक होती ‘आफ्रिकेशी साह्य़’ या विषयावर. त्या वेळीच त्या बैठकीपेक्षाही काही महत्त्वाचे काम ट्रम्प यांच्या समोर आले. त्यामुळे ते काही काळ बैठकीतून बाहेर पडले आणि त्यांची जागा घेतली इव्हांका यांनी. आता मुलगी म्हटली की एवढे काम तरी करावेच लागते ना पित्यासाठी. कर्तव्यच आहे ते. त्यावर, ‘ट्रम्प कशी घराणेशाही लादत आहेत’ वगैरे टीका झाली, पण या कृतीमागील इव्हांका यांच्या हृदयातील पित्याविषयीची कळकळ नाही जाणवली कुणाला. मेलेनिया ट्रम्प यांचेही तसेच. परिषदेत ट्रम्प यांची रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा चालू झाली ती थांबता थांबेना. ‘रशियन व्होडका चांगली, की अमेरिकी व्हिस्की उत्तम’ यांवर दोघांत चर्चा रंगली असावी, असे काही जण छद्मीपणाने म्हणत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करणेच चांगले. या दोघांतली चर्चा थांबत नाही म्हटल्यावर सौ. मेलेनिया यांनी, ‘अहो किती काम करता..’ म्हणत चर्चेला आवर घालण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही ते सोडा, पण यातून मेलेनिया यांच्या पतिप्रेमाचा सज्जड दाखला मिळाला. भले त्यांनी ट्रम्प यांचा हात जाहीररीत्या झिडकारला असेल याआधी, पण काहीही असले तरी पतीविषयी त्यांना किती आस्था, काळजी आहे, हेच दिसून आले यातून. कुटुंबातील सदस्यांमधील नात्यांचे धागे हे असे घट्ट पाहिजेत. कुठेही असो, काहीही असो, या धाग्यांनी सदस्य एकमेकांशी बांधलेले राहायला हवेत. कुटुंबातील ही वत्सलता मग राष्ट्र नामक विशाल कुटुंबातही आढळेल. आपल्या लोकांनीही या भावबंधनापासून काही तरी शिकायला हवे.