भाऊनुं, ह्य काय बगलांव काय?.. एका बातमीवर बोट नाचवत बाबल्याने बुध्यासमोर पेपर नाचवल्यान आनि बुध्याचं डोलं भयाकारी मोटं झालं. बुध्यानं बाबल्याच्या हातातला पेपर हिसकावलान. पुन्ना त्याचं डोलं बारीक झालं. ‘बुध्या, डोलं तपासून घे आता.. शिंदुर्गात हास्पिटल झालंय.’ बुध्याकडे पाहत हसतहसत बाबल्या म्हणाला. तोवर बुध्याची बातमी वाचून झाली होती. पेपर बाजूला करून तो जोरजोरात हसला. ‘हसतांव कशाला? नारायण राण्यान हॉस्पिटल काढलान म्हनूं?’.. कपाळावरची रेषा न हलवता बाबल्यानं बुध्याला विचारलं, आणि बुध्यानं मान डोलावली. ‘बाबा, त्यो कोकनचो सुपुत्र हाय.. आपलं नशीब चांगलं, म्हनू तां हितं, आपल्या लाल मातीत जनमला. नाय तं राज्याचा शीयम कवा आपल्याकडं येवन आपल्या फुडाऱ्याचं गानं म्हननार व्हता.. सगल्यांनी निस्तां चुनाच लावल्यानि आजपर्यंत. राण्यान नाव काडलान कोकनाचं.. कोकन पुण्यवान हाय आसं शीएम म्हनतात, आमान्ला तं कवाधरनंच ठावं होतं. हां, त्या पुन्याईचं कारन काय तां कलत न्हवतं, तं आत्ता कलालं. नारायन राण्यामुळे कोकण पुण्यवान हाय व्हयं.. बरा झाला रं द्य्ोवा.. असा सुपुत्र आमच्या मातीत जनमला नसता, तर आमचं कायपन खरं न्हवतं. मुंबयला पायफुटीवर रहावन आमच्या बापसाचा उबा जन्म ग्येला. तिकडं जीव मुठीत धरून रहायला लागायचं. दुशीकन्डं धारवाले च्याकू घेवन रस्त्यावरनां खुनाडी पोरं राडा करायची, तवा आमचा बापूस न्होकला, पन घाबरलिला न्हाय.. दिवस पालाटले आता ते.. मानसं पन बदलली. आता पुण्याची कामां करतायत मानसा. राजकारन काय, चालनारच.. परं, मानसासाठी चार चांगली कामा करनारी मानसां तयार व्हतायत ह्यां काय वायट नाय. नारायन राण्यान कोकणाचं नाव मोटं क्येलान. तसा त्यो आमचा मानूस नाय. आमी वरलं.. म्हंजी, चिपलूनाकडलं.. आनि त्यो, खालला.. म्हंजी, शिंदुर्गातला. पर, आमची माती येकच ना.. लाल माती. म्हनू त्यो आमचाच मानूस. कोकणचा सुपुत्र. बरां क्येलान त्यानं पडव्यात हास्पिटल काडलान त्ये.. आता निवडणुकीत राडं झालं, एकमेकांची टालकी फोडलानि, तर हास्पिटलासाटनां हितं, डेरवणास यायची गरज न्हाय. तितंच डोस्की फोडा, नि तितचं, उपचार बी घ्या!’.. बुध्या म्हणाला, आणि बाबल्याचं डोलं चमाकलं. ‘भाऊनू, येक काम करूया?’.. पेपराची घडी काखेत मारून, बारीक डोलं करून, ना वायच फुडं वाकून बाबल्या बुध्याच्या कानाशी कुजबुजला. बुध्यानं पुन्ना डोलं बारीक क्येलान, नां कान बाबल्याच्या तोंडाकडं वलवलान.. ‘तुमास्नी ठावं हायं? ग्येल्या वरसापर्यंत, या राण्याचो बुड जाग्यार नव्हतां.. गावकऱ्यान् कांदळगावच्या रामेश्वराक साकडं घातलान, राण्याच्या चांगल्या कामाची कीर्ती टिकव रं बाबा.. करून! ता जापसाल मी सोत्ता कानान ऐकलं हाय..  गावकर म्हनला व्हता, बा द्योवा म्हाराजा, पाच पुरी बारा आकारा स्वामी समर्था, कोकणचो विकासात जो कुनी फुडारी धुमशाना करून सत्यानास करत आसत त्येका चांगली बुद्धी दे, जां काय आडमेळो आसत, भायेरली, भुतुरली कोनाची दातकसाळ आसंत, तर पायाबुडी घाल, आनि पाचाचे पंचवीस करून फडाचो झेंडो फडाक सामील करून घे रे म्हाराजा.. असं जापसाल घातलान तवा, ‘व्हय म्हाराजा’ म्हनूं मी पन वराडलो व्हतो. द्य्ोवान तां गारानां आयकलान.. शीयमनं राण्याला पुण्यवान घोषित क्येलान. मंग आता आपन आपल्या गावात पारावर सत्यनारायनाची पूजा घालूया?’ बाबल्या म्हणाला, आणि बुध्याचे डोळे भरून आले. ‘रामेश्वराची कृपा रं बाबा’.. खालच्या कोकणाकडे मान वळवून बुध्यानं हवेत हात जोडले, आणि बुध्या-बाबल्या सत्यनारायणाच्या तयारीला लागले..