चाचा मोदीजींनी नमोजाकिटाच्या काज्यात ताजी टवटवीत कमलकळी खोविली. केसांवरून हात फिरवून चापूनचोपून सरसे केले. ऐन्यात स्वत:स चारी कोनांत नीट न्याहाळीत पटकन् छानशी सेल्फी घेतली. एकदा सकाळची सेल्फी उत्तम निघाली की मग चाचाजींच्या दिवसाचा मस्तच सूर लागतो. मग कितीही नव्या घोषणांची रचना करावी लागली, कितीही भाषणे करावी लागली तरी त्यांस त्याचे काहीएक नसते. परंतु आजचा दिवस काहीसा वेगळा होता. आज त्यांच्यापुढती महागंभीर असे कार्य होते. त्यांच्या मनी आले, एक वेळ दहा वेळा राफेल डील करावयास सांगा, १५ लक्ष वेळा कृष्णधन स्वदेशी आणावयास सांगा, दिवसातून दोनदा विदेश दौरा करावयास सांगा.. फिकीर नथी! परंतु वाङ्मय समीक्षा? सोपे का क्रियाकर्म आहे ते? त्यातही पुन्हा स्वलिखित जागतिक वाऱ्याची समीक्षा करणे म्हणजे कर्मकठीणच. परंतु एकदा चाचाजींनी कमिटमेन्ट केली की मग ते साक्षात् बृहस्पती जरी आले तरी त्यांचेही ऐकत नाहीत. ते आपण निश्चलनीकरणाचे समयी पाहिलेच. आजही त्यांनी निश्चयच केला होता, की आजच्या आज या पुस्तकाचे परीक्षण करावयाचेच व संपूर्ण विश्वाच्या इतिहासात असे पुस्तक परीक्षण करणारे पहिले पंतप्रधान म्हणून लिम्काबुकी आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरावयाचेच. लिम्काच काय, गिनेस बुकासही ते कोरावेच लागणार. कां की, अद्याप एकाही लेखकप्राण्याने स्वत:च स्वत:च्या पुस्तकाचे परीक्षण लिहिलेले नाही. चाचाजींनी क्षणभर डोळे मिटले. गोमातेस मनोमन दंडवत घातले व पुस्तक परीक्षण लेखनास प्रारंभ केला : बालमित्रों, जगातील कोण्या पंतप्रधानाने असे एक्झाम वॉरिअर्स नावाचे पुस्तक लिहिले आहे का? नेहरू स्वत:ला चाचा म्हणत, पण त्यांनी तरी असे पुस्तक लिहिले आहे का? पण माझ्या सरकारमध्ये मी हे पुस्तक लिहिले. कारण माझे मुलांवर खरेखरे प्रेम आहे. गेल्या साठ वर्षांत या मुलांना परीक्षेच्या व्यापम तणावाला तोंड द्यावे लागत आहे. मी लहान असताना साठ वर्षे मलाही हा तणाव सहन करावा लागला बालमित्रों! आजही ती परीक्षा, त्या पेपरांतली ती प्रश्नपरिषद.. टाळतोच मी तो तणाव. अशा प्रकारे तणावमुक्त झाल्यामुळेच मित्रों, आज मी शिक्षण क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले आहे. आणि म्हणूनच आजवर कोणत्याही शिक्षकाला, पालकाला जे करता आले नाही, ते मी केले आहे. आता या पुस्तकामुळे संपूर्ण देश तणावमुक्त होणार आहे. हे पुस्तक म्हणजे परीक्षायोद्धय़ांसाठीची नमोगीता आहे बालमित्रों! मुलांमध्ये परीक्षा देण्याचा कौशल्यविकास झाला, तर बालमित्रों, त्यांना अभ्याससुद्धा करावा लागणार नाही. गेली साठ वर्षे त्यांनी हे कौशल्य लातूरमध्ये, कोटामध्ये अडकून ठेवले होते. परंतु मी भगीरथ प्रयत्न करून ती कौशलगंगा संपूर्ण देशात नेली आहे. नेली आहे की नाही? नेली, याचा पुरावाच आहे बालमित्रों. आज शाळाशाळांमध्ये संस्थाचालक या पुस्तकावर उडय़ा मारत आहेत. मला तर असे सांगण्यात आले आहे, की भाजपचे काही खासदारसुद्धा गुपचूप हे पुस्तक वाचत आहेत. काही मुले तर इतकी तणावमुक्त झाली आहेत, की ती शिक्षकांना म्हणत आहेत, आम्हांला शिकवू नका, फक्त परीक्षा घ्या! तणावमुक्त परीक्षेचे हे नवेच मॉडेल आहे. त्याचे वैशिष्टय़ असे, की ते कोणत्याही परीक्षेला लागू पडते. मग ती महागाईची असो, की भ्रष्टाचाराची. एकदा तणाव दूर झाला की सर्व परीक्षा सोप्याच होतात. तेव्हा सर्वानीच हे पुस्तक वाचले पाहिजे. वाचले पाहिजे की नाही मित्रों?