खरं म्हणजे, जंगली प्राण्यासमोर सारे समानच.. पण प्राणी पिंजऱ्यात पकडला, की माणसाचे मोठेपण त्याला निमूटपणे मान्य करावे लागते. त्यातही, माणसांच्यात वावरल्यामुळे माणसांमधले कमीअधिक उंचीचे थरही त्याला कळत असावेत. वाघाच्या पिंजऱ्याबाहेर बायकामुलांचा गराडा असतो, मोबाइलच्या कॅमेऱ्यात त्याची छबी पकडण्यासाठी आटापिटा सुरू असतो, तेव्हा हे महाशय, पिंजऱ्याच्या कोपऱ्यात पसरून घोरत असतात आणि वाघोबाचा मनाजोगता नूर पकडायला मिळेल ना या काळजीचा घोर मुलाबाळांना लागलेला असतो. एखाद्या कसबी छायाचित्रकारालाही पिंजऱ्यातल्या वाघाची मनाजोगती पोझ मिळविण्यासाठी कित्येक तास कॅमेरा सावरत पुतळा होऊन ताटकळावे लागते, पण परवा नया रायपूरला, पिंजऱ्यातल्या त्या वाघोबाने नरेंद्र मोदींना मात्र, सहजपणे समोर झुकून जणू सलामी दिली. देशाचा पंतप्रधान आपला फोटो काढत आहे आणि उद्या सर्वत्र त्याच्या या लकबीचे छायाचित्र झळकणार आहे, याची जाणीव असावी, इतक्या सहजपणे त्याने हा क्षण सर्वाच्या सोयीचा करून टाकला आणि मोदींबरोबर वाघोबाचीही छबी सर्व माध्यमांवर झळकली. वाघ कितीही शक्तिशाली असला, तरी त्याला पिंजऱ्यात कैद केल्यावर तो आपल्याला मनाजोगती पोझ देणार, हा संदेशच त्यांनी पक्षाला दिला. इथे महाराष्ट्रात तर, मोदींच्या या छबीनंतर भक्तांचा आणि पाठीराख्यांचा नूरच पालटून गेला असणार. नया रायपूरमधील त्या पिंजऱ्यातल्या वाघाला महाराष्ट्रातले वाघ फारसे परिचयाचे नसावेत. इकडे राजकारणात वाघांचे महत्त्व फारच वाढल्यावर, राज्याच्या वनमंत्र्यांनी तर मंत्रालयाच्या चौकात फायबरचा वाघ आणून उभा केला आणि ‘कुणीही त्याच्यासोबत सेल्फी-सेल्फी खेळावे’ असा फतवाच काढून टाकला. कधी काळी मोठा दिमाख मिरवणारा हा प्राणी आता नकली बनून सरकारदरबारी खेळण्यासारखा वावरतोय, हे आता उभ्या महाराष्ट्राला माहीत असल्याने, पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा पिंजऱ्यातल्या वाघाला समोर झुकायला लावावे या दु:खाने व्याघ्रप्रेमी जनता क्षणकाळासाठी कळवळली असेल, यात शंका नाही. वाघाच्या किंवा वन्यप्राण्यांच्या छायाचित्रणाचा मक्ता कुणा एकाकडे नाही, साऱ्या सुविधा आसपास सहजपणे हाती असतील, तर त्यांची छायाचित्रे कुणीही काढू शकतो, असाही संदेशही पंतप्रधानांनी मागे ठेवल्याच्या जाणिवेने राज्यातील भक्तगण सुखावले असतील. आता निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकारणाच्या जंगलातील वाघ गुरगुरू लागतील, डरकाळ्या फोडू लागतील आणि शक्तपिंरदर्शनाचे प्रयोगही करून दाखवतील; पण पिंजऱ्यातल्या वाघाने कितीही डरकाळ्या फोडल्या, तरी त्याची भीती बाळगण्याचे कारण नाही, हेच मोदींनी दाखवून दिल्याचे दाखलेही यापुढे दिले जातील. महाराष्ट्रातील भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर धीर देणाऱ्या अशा एखाद्या संदेशाची गरजच होती. मोदी यांनी आपल्या कृतीतून असाच संदेश दिल्याने, भाजपच्या सिंहांना आता त्वेष चढेल आणि पुन्हा एकदा, ‘जबडय़ात घालूनि हात, मोजतो दात, जात ही अमुची’ अशा डरकाळ्यांनी राजकारणाचे रण दुमदुमू लागेल..