‘नक्कल करायला अक्कल लागते’ हे खरे असले तरी आपली सारी अक्कल केवळ नक्कल करण्यात वाया घालविणे सर्वानाच परवडत नाही. कधी तरी अशी वेळ येते, की केवळ नक्कल करण्यात कामाचा वेळ कसा निघून जातो तेच कळत नाही आणि वेळ निघून गेल्यावर अक्कल येऊनही उपयोग होत नाही. सातत्याने केवळ नक्कलच करत राहिले, की ‘ओरिजिनल’ रूपाचाच विसर पडतो आणि नकली रूप हेच ओरिजिनल आहे असे वाटून त्याचाच अभिमानही वाटू लागतो. म्हणून योग्य वेळी आपण आहोत तसे, म्हणजे अगदी ओरिजिनल व्हावेच लागते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अलीकडे ‘आपण ओरिजिनल राज ठाकरे व्हावे’ असे वाटू लागले, हा त्याचाच परिणाम आहे. आपण सध्या जे आहोत ते ओरिजिनल नाहीच, हे त्यांनाच सुमारे वर्षभरापूर्वी ध्यानातही आले होते. त्या वेळी बहुधा ‘आपण ओरिजिनल नाही’ हेच बहुधा त्यांना आवडत असावे. त्या दिवसांत, ‘मला ओरिजिनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका’ असा खणखणीत दम त्यांनी स्वपक्षाच्या सैनिकांना दिला होता! पण सैनिकांनाही बहुधा ‘ओरिजिनल राज ठाकरे’ त्या वेळी तरी नकोच असावेत. म्हणून त्यांनी राजसाहेबांना ‘ओरिजिनल’ होण्याची संधीच दिली नाही. परिणाम?.. व्हायचा तोच झाला. आता मात्र, आपण ओरिजिनल व्हायचेच असे राजसाहेबांनी ठरविलेले दिसते. त्यांच्या मनसैनिकांनाही, ओरिजिनल असण्याचे महत्त्व लक्षात आलेले दिसते. गेल्या आठवडय़ात राजसाहेबांनी रामदास आठवलेंची भेट घेतली, तेव्हा ज्या गंभीर वातावरणात उभय नेत्यांची चर्चा झाली, त्यावरून राजसाहेबांनी ओरिजिनल व्हायचे मनावर घेतले आहे याची खात्री पटावी! तसेही, रामदास आठवले हे जसे आहेत तेच ओरिजिनल असल्याने, ते गंभीर झाल्यावरच कुणाची तरी नक्कल करत असावेत असा भास होऊन अनेकांना हसू फुटते. राजसाहेबांचे तसे झाले नाही, यावरूनच, त्यांनी ओरिजिनल राज ठाकरे होण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न जनतेने मान्य केले असावेत हे स्पष्ट होते. ओरिजिनल होण्याच्या प्रयत्नांना केवळ जनतेनेच नव्हे, तर काळानेदेखील नेमक्या वेळी साथ दिली आहे. नाही तर, परप्रांतीय फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून मनसेचे ते खळ्ळ-खटय़ाक खऱ्या गांभीर्याने पुढे सरकलेच नसते. या आंदोलनात मनसैनिकांनी मार खाल्ल्यावर राजसाहेबांचा राग अनावर होणे आणि ‘मार खाणाऱ्यांना पक्षात जागा नाही’ असे त्यांनी बजावणे हा सारा प्रवास नक्कल सोडून ओरिजिनल बनण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा असावा. खरे तर, मला ओरिजिनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका, असे जेव्हा त्यांनी बजावले, तेव्हापासूनच ‘ओरिजिनल’ राजसाहेबांना पाहण्यासाठी तमाम मराठी माणूस उत्सुक होता. आता ती उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता नक्कल करण्यात वेळ वाया न घालविता, ओरिजिनल बनण्यासाठी सारी अक्कल कामी येणार या कल्पनेने मनसैनिक सुखावला असेल.