उंचावलेल्या भुवया, विस्फारलेले डोळे, ओठांचा आकुंचित चंबू आणि वळलेल्या मुठीतून उंचावणारी दोन बोटे अशा अवतारातील एखादा फोटो समाजमाध्यमावर झळकला, तर ती ‘सेल्फी’ आहे, हे नकळत्या बालकांनाही उमजू लागले आहे. समाजमाध्यमाने समाजात ज्या काही वेडांचे पीक रुजविले, त्यापैकी सेल्फी नावाच्या वेडाने फैलावाचाही विक्रम केला. रडून आक्रोश करणाऱ्या बाळास सेल्फीचे आमिष दाखविल्यावर त्या क्षणी सेल्फीसाठी पोज घेण्याचा मोह त्याला आवरेना व्हावा, आणि सेल्फी काढून झाली की पुन्हा त्याने भोकाड पसरावे. अशी एक चित्रफीत समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाल्याने, सेल्फीवेडाची मुळे आता पुरेशी खोलवर रुजली आहेत याची खात्री होते. गेल्या शतकात राज्यात काँग्रेस गवताने एवढा धुमाकूळ घातला, की त्याचा नायनाट करणे ही डोकेदुखी होऊन गेली. फोफावण्याचाही एक एक मोसम असतो. आता या मोसमात फोफावण्याची संधी सेल्फीने घेतली, आणि भारतात तर या वेडाचे पीक काँग्रेस गवतासारखेच फोफावत गेले. गंमत म्हणजे, काँग्रेस गवतासारखा फैलाव झालेल्या या वेडाला खतपाणी मात्र भाजपकडूनच मिळाले. साक्षात नरेंद्र मोदीच जेव्हा सेल्फी काढून आपल्या दिनक्रमाच्या प्रत्येक क्षणाचे ‘सोने’ करू लागले, तर भक्तगणांमध्ये सेल्फी वेडाचा फैलाव होणे साहजिकच! भाजपने या वेडाला एवढा राजाश्रय दिला की, मुंबईच्या मंत्रालयाच्या प्रांगणात ठेवलेला फायबरचा वाघदेखील सेल्फीच्या कटकटीपायी वैतागून गेला असे म्हणतात. अशा प्रकारे, झपाटय़ाने कोणतेही वेड फोफावू लागले, की त्याची साथ होते आणि त्या साथीने ग्रासलेल्या प्रत्येकास तो आजार जडतो. भारतात सेल्फीच्या आजाराने ग्रासलेल्यांची संख्या वाढत आहेच, पण या आजाराने अनेक बळीदेखील घेतले आहेत. एक वेळ, एखाद्या वेडय़ावर उपचार करून त्याला बरे करता येणे शक्य आहे. पण वेडय़ाला असा एखादा असाध्य आजार जडला, तर दुहेरी उपचार करून त्याला ताळ्यावर आणणे अंमळ अवघडच!.. अशी दुहेरी लागण झालेल्यांना अवघड जागी उभे राहून डोळे मिचकावून तोंडाचा चंबू करीत शरीर वाकडेतिकडे करण्याचा चाळा लागतो, आणि शरीराची नैसर्गिक ठेवण बिघडल्याने साहजिकच तोल ढळून मृत्यू ओढवणे संभवते. असे अनेक सेल्फीग्रस्त अलीकडच्या काळात जगाचा निरोप घेते झाले. त्यांचा अंत हा दु:खद प्रकार असला, तरी स्वत:हून मृत्यूच्या दाढेत जाण्याची हिंमत या आजारात होत असल्याने, सेल्फीपासून सावध राहायलाच हवे! गुजरातेत मोदीभक्तांमध्ये भाजपचा विजयोत्सव असा काही संचारला, आणि नरेंद्र मोदींच्या प्रतिमेस मिठाई भरविताना सेल्फी काढण्याचा सपाटा सुरू झाला. इकडे ही स्पर्धा लागली असताना, सेल्फीवेड हा आजारच असल्याचे तिकडे लंडनमधील संशोधकांनी जाहीर करून टाकावे, हा निव्वळ योगायोग असला तरी त्याने धास्तावण्याची गरज नाही. प्राथमिक अवस्थेतच आजाराचे निदान झाले, तर त्यातून सावरणे शक्य असते.