शेताची पूर्ण मशागत करावी, चांगल्या वाणाचे बियाणे निवडावे, खतपाणी घालून ते जोपासावे, तेव्हाच मग शेतात सोने हाती लागते. महाराष्ट्राच्या बारामती नावाच्या गावातील शेतात असे सोने पिकते. कारण त्या शेतांची मशागत तर असतेच, पण वाणदेखील निवडून लावलेले असते. काही वर्षांपूर्वी या शेतात अस्सल बारामती वाणाच्या द्राक्षांची पदास सुरू झाली. जवळपास १८ वर्षांपूर्वी दिल्लीत ‘शरद सीडलेस’ जातीच्या द्राक्षांचा बोलबाला झाला, आणि या वाणाचे पीक घेण्यासाठी फार पूर्वीपासूनच मशागत सुरू होती, हे काही मोजक्यांनी ओळखले. शेताची पूर्ण मशागत झाल्याखेरीज पेरणी करायची नाही आणि एकदा पेरले की त्या शेतातून भरघोस पीकच घ्यायचे हे शरद पवारांचे तंत्र आहे, हे आणखी अनेकांना कळले. ‘शरद सीडलेस’ची गोडी चाखण्यात दिल्लीतील मोजकी मंडळी दंग होती, तेव्हा शरद पवार गालात मिस्कील हसत आपल्या मशागतीच्या तंत्राचे गुपित सांगून सर्वाना अचंबित करत होते. एखादे पीक घ्यायचे ठरवले, की अगोदर मातीची किती मशागत करायची हे पवारांना नेमके ठाऊक असते. ते गुपित आपल्याला कळले असे अनेकदा इतरांना वाटते, आणि शेतातले पीक काही वेगळेच आहे हे लक्षात आले की अंदाज चुकल्याचे लक्षात येते. पवार जेव्हा हाताने, मानेने किंवा थेट तोंडाने ‘नाही’  म्हणतात, तेव्हा ते ‘होय’ असते असे अनेक जण सांगतात. अगदी परवा सुशीलकुमार शिंदेंनीदेखील ही गोष्ट गौप्यस्फोट केल्याच्या थाटात सांगून टाकली, तेव्हादेखील पवार मिस्कीलकपणे गालात हसत होतेच. त्यांनी हातानेच ‘नाही’ असे सांगिततले, म्हणून पवार हे भारताचे राष्ट्रपती होणारच यावर सुशीलकुमार शिंदेंनी शिक्कामोर्तब केले. दोन-चार महिन्यांपूर्वी पवारांच्याच पक्षाच्या चिंतन बठकीत त्यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी पवारांना भारताचे भावी पंतप्रधान म्हणून जाहीर केले होते. तेव्हाही खुद्द पवार यांनी त्याचा इन्कार केला होता. त्याआधी गेल्या एप्रिलमध्ये शिवसेनेचे संजय राऊत यांनीही पवार यांच्याकरिता राष्ट्रपतिपदाची मोच्रेबांधणी सुरू केली होती. जेव्हा जेव्हा पंतप्रधानपदाची किंवा राष्ट्रपतिपदाची चर्चा सुरू होते, तेव्हा तेव्हा पवार यांच्या नावाखेरीज ती पुढे सरकतच नाही, ही महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशीच बाब आहे. या देशात कोणत्याही पदासाठी शरद पवार हा ठोस आणि कायमस्वरूपी पर्याय आहे, असा याचा अर्थ आहे. असे कुणाही येरागबाळ्याच्या बाबतीत घडत नसते, आणि एखादे नाव चच्रेत असणे हा काही केवळ योगायोग नसतो. .. पवार हे केवळ शेतकरी नाहीत. ते शेतीतज्ज्ञ आहेत. त्यांच्या शेताची मशागत बारमाही सुरू असते. योग्य हवामान साधले, की नेमकी वेळ साधून कोणत्या वेळी कोणत्या पिकासाठी कोणते बी पेरायचे याचे तंत्र त्यांना नेमके अवगत असते. शरद सीडलेस हा त्या तंत्राचाच एक आविष्कार. ही द्राक्षे एवढी गोड, की त्याची चव चाखताना आंबटपणाचा आभासही होत नाही. त्या द्राक्षांच्या गोडीची चव चाखत सारे जण जेव्हा वाहवा करीत असतात, तेव्हा हा जाणकार कृषीतज्ज्ञ मात्र, गालात मिस्कील हसत हातानेच काही तरी खुणा करीत असतो. काहींना त्यात ‘नाही’ दिसते, काहींना त्यामध्ये ‘होय’चा भास होतो. पण आपणही कधी तरी कात्रजच्या घाटातून प्रवास केलाय, हे प्रत्येकालाच माहीत असते..