सकाळीच सगळ्यांच्या घरी खलिता पोहोचला आणि संस्थानचे नवरत्न खासनीस मातृस्थानीच्या खलबतखान्यात दाखल झाले. उधोजीराजेंनी तातडीने बैठक बोलाविल्याचे पाहून, ‘आज राजे काही तरी करून दाखविणार’ या अपेक्षेने साऱ्यांनी आपापले खिसे चाचपले.  कालच नगरच्या दौऱ्यात राजेंनी आपला रुद्रावतार दाखविला होता. राज्यात मोगलाई सुरू असल्याच्या जाणिवेने राजे अस्वस्थ झाले होते ते पाहून दिवाकरपंतांनी महामंडळाच्या महासंचालकांना फोन लावला. ‘शिवशाही’ सुखाने वाटचाल करते आहे, हे ऐकून त्यांना बरे वाटले. कोकणप्रांतीच्या राडय़ातून राजेंना हवे ते होणार ना, अशा विचारात अस्वस्थ झालेल्या सुभाषदादांनी आपलाही खिसा चाचपला. तो कागद खिशातच होता. तेवढय़ात मिलिंदरावांनी अदबीने खलबतखान्याचा दरवाजा उघडला. राजेसाहेबांचे आगमन झाले होते. सारे जण समोर हात बांधून कमरेत झुकून उभे राहिले. राजे हसतमुखाने आपल्या सिंहासनावर स्थानापन्न झाले. सिंहासनाच्या गादीतून काही तरी टोचल्याची जाणीव होऊन राजेंच्या मुद्रेवर वेदना उमटली. सिंहासन मोडकळीस आले असा विचार मनात आला, पण तो दाबून राजेंनी सर्वाना बसण्याची खूण केली.

सारे जण बसले, तेवढय़ात बाळराजेंचे आगमन झाले. पुन्हा सारे उठून अदबीने कमरेत वाकून उभे राहिले. मग सारे पुन्हा खाली बसले आणि राजेंनी खलबते सुरू केली. चेहऱ्यावर संतापाची छटा उमटविण्याचा प्रयत्न करीत ते बोलू लागले. ‘नाकर्त्यां राज्यकर्त्यांसोबत मांडीला मांडी लावून बसावे की नाही’, असा सवाल त्यांनी केला आणि सारी नवरत्ने चूप झाली. काय उत्तर द्यावे कुणालाच कळेना. राजेंनी सुभाषदादांकडे पाहिले. आता काही तरी बोलावयास हवे, हे ओळखून दादांनी तोंड उघडले आणि इतरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ‘राजे, आपणच निर्णय घ्यावा हे चांगले, पण या मोगलाईतही आपली शिवशाही सुखी आहे, याची इतिहासात नक्की नोंद होईल याची दखल घ्यावी’.. सुभाषदादा म्हणाले आणि सर्वाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले.  राजेंनी मात्र, मान हलवून दादांच्या बोलण्यास दाद दिली आणि त्यांनी संजयरावांकडे नजर वळविली. संजयराव सावरले. ‘राजे, आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकार आमचे नाही. केवळ राज्याच्या स्थर्यासाठी आम्ही सोबत आहोत. योग्य वेळ येताच बाहेर पडलेले बरे’.. संजयरावांनी सल्ला दिला आणि पुन्हा साऱ्यांनी खिसे चाचपत एकमेकांकडे बघितले. राजेंनी संजयरावांच्या मतासही तशीच पसंतीची दाद दिली. आता राजे काय बोलणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले होते. राजेंनी क्षणभर विचार केला आणि त्यांनी आवेशात फर्माविले, ‘आता स्वस्थ बसून चालणार नाही, कायदा हातात घ्या!’.. हे ऐकताच सारे जण सरसावले. खिशातील हात बाहेर आले. तेवढय़ात राजेंनी खूण केली.. ‘थांबा.. लगेचच नको. या सरकारचे नाकत्रेपण आणखी वाढले, तरच कायदा हातात घ्या.. तोवर, राज्याच्या हितासाठी त्यांच्यासोबत राहू’..  राजे म्हणाले आणि बैठक संपण्याआधीच नवरत्नांनी खलबतखान्याबाहेर धाव घेतली.. ‘शेवटी सरकार चालवायचे आहे’.. आपल्या गाडीत बसता बसता सुभाषदादा स्वत:शीच बोलले आणि गाडी मंत्रालयाकडे निघाली..