सध्या दुष्काळाचे सावट पसरलेले असले, तरी अशा अवकाळी वातावरणातही एका शेतीला मोठा बहर आला असून त्याचे अमाप पीक येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हे पीक बारमाही असले, तरी पाच वर्षांतून एकदा या पिकास मोठा बहर येतो. सारेजण त्या बहराच्या हंगामाची आतुरतेने वाट पाहात असतात. यंदाच्या बहराच्या हंगामास, ‘दिवाळी’नंतर आणि ‘हिवाळी’पूर्वी असा मुहूर्त लाभल्याचे या क्षेत्रातील जाणकार बोलू लागल्याने, इच्छुकांच्या नजरा दिवाळीनंतरच्या दिवसांकडे लागल्या आहेत. दुष्काळी किंवा अवकाळी वातावरणातदेखील भरभरून पिकणारी आणि आशाअपेक्षा जागृत ठेवणारी ही शेती कोणत्या पिकाची, असा प्रश्न तुम्हाआम्हा सर्वसामान्यांना पडला असला, तरी जाणकारांनी मात्र, या पिकाचे नाव लगेचच ओळखले असेल, यात शंका नाही. या पिकाला ‘गाजर पीक’ असे म्हणतात.

यंदा दिवाळीनंतर आणि हिवाळीपूर्वी- म्हणजे, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी- या पिकाचा हंगाम साजरा होणार असल्याचे जाहीर झाल्याने, गाजर पिकावर राजकीय हवामान बदलाचा मोठा परिणाम होत असतो असे समजावयास हरकत नाही. काही पिकांना पाणी मिळाले नाही तर ती करपून जातात, काही पिके ढगाळ हवामानामुळे किंवा अवकाळी पावसामुळे नासून जातात, तर काही पिकांना अशा हवामानात खोडकिडे वा तुडतुडय़ांचा त्रास सोसावा लागतो. गाजर पिकास मात्र, अशा कोणत्याच बदलाचा कोणताही त्रास होत नसला तरी राजकीय हवामान अनुकूल असेल तरच हे पीक जोमाने वाढते असा आजवरचा अनुभव आहे. या पिकाची लागवडही सोपी असते. एकाच व्यक्तीने एखादा चांगला मुहूर्त पाहून एकच गाजर पेरले, तरी बघता बघता त्याचा विस्तार होऊन गाजराची रोपे शेतात सर्वत्र डोलू लागतात. मुळात गाजर हे कंदमूळ जातीचे पीक असल्याने, जमिनीच्या खाली किती जोमाने ते वाढते आहे हे केवळ अंदाजानेच ठरविले जात असले, तरी वरचा पाला जेवढा तजेलदार आणि हिरवागार, तेवढे जमिनीखालचे गाजर लालगुलाबी व जोमदार असणार असा ढोबळ अंदाज असतो. यंदाची गाजरपेरणी योग्य मुहूर्तावर आणि थेट मुख्यमंत्र्यांकडून झालेली असून आता विस्ताराची चिन्हेही चांगली दिसू लागल्याने, आपल्याला पिकाची फळे मिळणार अशा आशेने अनेक नजरा पीक काढणीकडे लागल्या आहेत. या गाजरांची वाढ निव्वळ राजकीय हवामानावर अवलंबून असल्याने, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमुळे राजकीय हवामान अनुकूल असल्याचे मानले जात आहे. दिवाळीनंतर ‘हिवाळी’पूर्वी गाजराचे पीक काढले जाईल व सारा शेतमाल मुख्यमंत्र्यांच्या हाती सोपविला जाईल. मग त्याचे वाटप कसे, किती आणि कोणास करावयाचे, हे ठरविले जाईल. आपल्या वाटय़ाला थोडीफार गाजरे आलीच, तर त्याचे काय करावयाचे याचा विचार सध्या अनेकांनी सुरू केला आहेच. काही जणांना ‘गाजर हलवा’ करावा असे वाटत आहे, तर काही जण ‘गाजराची पुंगी’ करण्याच्या विचारात आहेत. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली.. खरे तर, अनुभवी लोक पुंगीचाच विचार करतात, असे म्हणतात!