मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी एक अघटित घडले असे म्हणतात. तेथून जाणाऱ्या-येणाऱ्या हजारो प्रवाशांना त्याची साधी गंधवार्ताही नव्हती. कशी असणार? मुंबईतील घडय़ाळे माणसांच्या मनगटावर नसतात. मानगुटीवर असतात. ते ओझे वाहत, आपापले धावते पाय आणि शाबूत अवयव घेऊन लोकल गाडय़ा पकडण्याच्या नादात सारे जण. या प्रवासात स्वतच्या अस्तित्वाचीही गंधवार्ता घेणे जेथे त्यांच्या घ्राणेंद्रियांना अशक्य, तेथे भलत्या ठिकाणी नाक खुपसण्यास ते कशास जातील? त्या स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्यांना तरी ते अघटित कळावे ना? पण त्यांनाही ते समजले नाही. त्यांचे सारे लक्ष लागले होते दिल्लीहून येत असलेल्या नव्यानवेल्या पाहुणीकडे. तिचे नाव टॅल्गो. ही मूळची स्पेनमधली. सरकारला देशाचा विकास अतिवेगाने करायचा आहे. त्यासाठी बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. पण ते काम होऊन होऊन किती वेगात होणार? तेव्हा त्याआधी सरकारने ही टॅल्गो पाचारण केली. ही रेल्वे गाडय़ांतली पीटी उषाच. दिल्लीहून मुंबईला अवघ्या साडेअकरा तासात जाईल म्हणे ती. तर अशी ही वेगवती येणार म्हटल्यावर साऱ्यांचे लक्ष तिकडेच लागलेले असणे स्वाभाविकच होते. पण अजून काही ती स्थानकात पोचली नव्हती. वेळ निघून चालली होती आणि पाहुणी काही येत नव्हती.. या अशा गडबडीत ते अघटित घडले म्हणे. झाले ते असे की, फलाटांवरच्या दोन गाडय़ा बराच वेळ झाला तरी जागच्या हलेनातच. सिग्नल यंत्रणा सुरू, ओव्हरहेड वायर यथास्थित, रुळाला तडा नाही, रुळांवर कोणी पाण्याची बाटलीही रिकामी केली नव्हती की गाडी थांबावी. पण त्या जागच्या हलतच नव्हत्या. कारण- त्या दोन लोकल म्हणे एकमेकांशी गप्पा मारत होत्या! विषय होता नव्या पाहुणीचा. म्हणत होत्या, खूप सुंदर दिसते म्हणे ती. पळतेही मोठय़ा तोऱ्यात. त्यावर दुसरी लोकल फणकाऱ्याने म्हणाली, मोनोराणीही सुंदर दिसते म्हटले! आली तेव्हा काय थाट होता तिचा! वेगळी स्टेशने, वेगळे मार्ग. पण आता? त्यावर पहिली म्हणाली, परवा सकाळी चाकेच निखळली तिची! हवेतून धावते तरी हे हाल. ही नवी टॅल्गोबाई तर याच रुळांवरून धावणार आहे. किती हाल सोसत आपण हेलपाटे घालतोय या रुळांवरून. हिला म्हणावे एकदा येच या मार्गावर. म्हणजे कळेल.. बराच वेळ त्यांच्या अशा गप्पा चालल्या होत्या. तिकडे आत बसलेले प्रवासीही कंटाळून गेले होते. कोणी तरी वैतागून म्हणाले, पावसामुळे ट्रॅक ओला झाला असेल म्हणून.. कोणी म्हणाले, तसे नाहीये. पावसाने ओव्हरहेड वायरमधील वीज गारठली असेल! त्या गरीब विनोदांवर आजूबाजूचे प्रवासी कसनुसे हसले. त्याशिवाय मुंबईकर प्रवासी काय करणार दुसरे? तेवढय़ात दोन्ही गाडय़ा सुरू झाल्या. त्याच वेळी टॅल्गो ट्रेन स्थानकात शिरत होती.. तिलाच एक तास उशीर झाला होता!