आमचे प्रेरणास्थान आणि अमेरिकेचे अध्यक्ष महामहीम डोनाल्ड ट्रम्प हे एक महामुत्सद्दी नेते आहेत. गेल्या दीडशे वर्षांत अमेरिकेत जे झाले नाही ते डोनाल्डजींनी गेल्या दोन वर्षांत करून दाखविले. आज उत्तर कोरियासह संपूर्ण आकाशगंगा अमेरिकेकडे आदराने पाहते ते डोनाल्डजींमुळेच. त्यांच्या मुत्सद्देगिरीची कौतुके सांगावीत तरी किती? आपण व्हाट्स्याप विद्यापीठाचे विद्यार्थी असलो, तरी आपल्याला एवढे तर ऐकून माहीतच असते, की रशिया आणि अमेरिका यांचे नाते अहिनकुलासारखे. परंतु डोनाल्डजींची मुत्सद्देगिरी पाहा. निवडून येण्यापूर्वीच त्यांनी रशियाच्या त्या पुतिन यांच्यावर अशी काही जादू केली, की ते डोनाल्डजींच्या प्रचारासाठीच धावून आले. यास काही नतद्रष्ट राष्ट्रद्रोही फेकन्यूज म्हणतील. विचारतील, की- एवढे संबंध सुधारले तर मग पुतिन यांस त्यांनी शपथविधीस बरे नाही पाचारले? तर या राष्ट्रद्रोह्य़ांना आम्ही सांगू इच्छितो, की अमेरिकेत शपथविधी सोहळ्यास कलवरे आणि वरधावे बोलावण्याची प्रथा नाही. किंतु रशियाशी सुधारलेले संबंध हे काही एकमेव उदाहरण नाही. उत्तर कोरियाचे पाहा. दहशतवादीच हो ते राष्ट्र. आणि त्याचे ते बटूमूर्ती अध्यक्ष. किम जाँग उन. लहानपणी दिवाळीत फटाके फोडण्यास मिळाले नसावेत त्यांस. त्यामुळे आता सतत भूगर्भात अणुबॉम्ब तरी फोडत असतात किंवा रॉकेटे तरी उडवीत असतात. त्यामुळे जग मात्र सतत भयभीत. त्या बटूमूर्तीला सरळ करणे वॉशिंग्टनपासून ओबामांपर्यंत कोणालाही जमले नव्हते. पण डोनाल्डजींनी ते साधले. अहाहा! काय ती मुत्सद्देगिरी! काय ती छडी-गाजरनीती! आधी म्हणाले,  भो किम, सरळ हो. अन्यथा अमेरिका तृतीय नेत्र उघडील. अशी छडी उगारताच किम सुतासारखे सरळ झाले. मग डोनाल्डजींनी त्यांस भेटीचे आवतण दिले. दाती तृण धरून किममहोदय सिंगापुरी भेटीस आले. मग तेथे डोनाल्डजींनी खूप फोटो काढले त्यांच्याबरोबर. झाले. प्रश्न मिटला. तेथून परतताच डोनाल्डजींनी ३३ कोटी अमेरिकावासीयांस उद्देशून ती शुभ ट्विप्पणी केली, की हुश्श. आता सर्वानी सुरक्षित वाटून घ्यावे. यास म्हणतात प्रश्न मिटवणे. यास म्हणतात विश्वनेता. आता यावर काही राष्ट्रद्रोही म्हणतील, की मग दोनच दिवसांपूर्वी ते असे का म्हणाले, की अमेरिकेस उत्तर कोरियाकडून मोठा धोका? तर याचे उत्तर आहे- मुत्सद्देगिरीच. हे ऐकून तिकडे ते दबंग किम किती ‘कन्फ्युज’ झाले असतील याचा विचार करा. शत्रूला आणि मित्रांनाही असे सतत गोंधळात टाकणे हा मुत्सद्देगिरीतील कूटप्रयोग आहे. डोनाल्डजींनी ही सलमानी विद्या नक्कीच काही प्राचीन भारतीय बॉलीवूडग्रंथातून उचलली असावी असा आमचा संदेह आहे. ‘मैं चाहे ये करू, मैं चाहे वो करू, मेरी मर्जी’ हा त्या ग्रंथांतील मंत्र असो की ‘एकदा कमिटमेन्ट केली की आपण आपलेही ऐकू नये’ हा नियम असो वा ‘जे बोलावे ते करावे आणि जे न बोलावे ते तर नक्कीच करावे’ हे धोरण असो.. भारतमित्र डोनाल्डजींच्या राज्यकारभाराचे नीट अवलोकन केल्यास आपणास हीच नीती स्पष्ट दिसते. शिवाय इतिहासात खोल न जाता नवा इतिहास रचण्याचे धोरणही यात स्पष्ट दिसते. त्यामुळेच काल आपण काय म्हणालो हे विसरून ते कारभार करीत असतात. असे विश्वनेते आपणास लाभले हे आपले भाग्यच. तरीही काही पत्रे त्यांच्यावर टीका करतात. त्या पत्रदलालांस आम्ही एवढेच विचारू इच्छितो, की ओबामांनी पण उत्तर कोरियापासून अणुधोका आहे असे म्हटले होते तेव्हा तुम्ही कुठे गेला होता?