08 March 2021

News Flash

व्यासांच्या भेटी शेक्सपिअर आला!

थोर एक होते कविराज ज्ञानी, विंदा असे त्यांचे नाम साचे.

थोर एक होते कविराज ज्ञानी,

विंदा असे त्यांचे नाम साचे.

त्यांचेच शब्द घेऊन उधार,

मांडियला येथे अनुभव.

अधिक ते घ्यावे न्यून ते सोडावे,

आमच्याच माथी माप त्याचे.

व्यासांच्या भेटी शेक्सपिअर आला

तो झाला सोहळा महाजाली.

जाहली दोघांची व्हच्र्युअल भेट,

सांगण्याची वाट आपली केली.

व्यास ते सांगती, ऐक शेक्सपिअरा

महाभारत मी लेखियेले.

कौरव, पांडव, कितीएक पात्र

थोरलाच काळ उभा केला.

साऱ्यांमध्ये थोर बनुनि राहिला

पराक्रमा त्याच्या नाही खीळ,

लाख त्याच्या कथा, लाख त्याच्या गोष्टी

नाम त्याचे असे घननीळ.

पराक्रम त्याचा काय तुला सांगू

काय सांगू आणि चातुर्य त्याचे.

तान्हेपण त्याचे थोरचि की होते,

कंस किंवा कालियाला पूस जरा.

गोकुळीचा थाट त्याचा नटखट,

सारी खटपट लोण्यासाठी.

जमवले किती त्याने सवंगडी,

साऱ्यांसाठी तोच झाला श्रीपती.

राधा आणि गोपी, गोकुळीच्या नारी

साऱ्यांवर जादू बासरीची.

एक ध्यास मन, एक ध्यास ध्यान,

कृष्ण.. कृष्ण.. कृष्ण हेचि गान.

ऐक शेक्सपिअरा, सांगती ते व्यास

कलियुगी थोरी आजही त्याची.

इंद्रप्रस्थ नामे भव्य ती नगरी

दिल्ली असे आज नाव तिचे.

प्रशांत नामक कुणी तो भूषण

त्याने केले स्मरण सावळ्याचे.

शेक्सपिअरा, नीट कान दे आता

ऐसे वदती व्यास त्याला.

तुझ्या नाटकीचे एक पात्र प्यारे

असे ते सर्वत्र, सदाचेच,

रोमिओचे नाव, विसरेल कोण

प्रिया त्याची असे ज्युलिएट.

भूषणे धरीले रोमिओसी हाती

तैसेच आणिक सावळ्यासी.

ऐशा या लीलांत, कृष्ण हाची थोर

रोमिओ तर सान वदे ऐसा.

कृष्णावरी ऐसा भलता वहीम,

चालवून नाही घेणार मी.

संतापून व्यास सांगताती ऐसे

झाले काय पुढे ऐका सारे.

मिशीवर एक फिरवून बोट

शेक्सपिअर भला सरसावे.

ऐका महाराज, व्हावे जरा शांत

नाही उपयोग याचा, बोले.

काय होता कृष्ण, काय रोमिओ तो

नाही जाण नीट कुणापाशी.

कृष्णाचा आचार, कृष्णाचा विचार

बुडोनि गेला, द्वारकेस.

नाम घेती कृष्ण, जपताती कृष्ण

कालिया मनात दडलेला.

तुमचा तो कृष्ण, तुम्हा लखलाभ

मला असो माझा रोमिओ तो.

आवरावा राग, मनास रोखावे

वृथा चिंता तुम्ही करो नये.

संपलाहे पॅक, नेटचा तो आता

भेट ही आपली पुरे झाली.

शांतपणे जावे, आपापल्या वाटे

चारी दिशा काटे, पसरले.

दोघे निघोनिया गेले दोन दिशा

आभाळ ते कृष्ण करोनिया.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 3:17 am

Web Title: vyasa shakespeare
Next Stories
1 लोकशाहीचा विजय असो..
2 संघर्षांची खडतर वाट..
3 डोक्याचे काम..
Just Now!
X