जनआरोग्य योजनेतून उपचार घेणाऱ्या १.८० टक्के रुग्णांचा मृत्यू; शासकीयच्या तुलनेत खासगी रुग्णालयात मृत्यूचे प्रमाण अधिक

राज्यात योजनेचा पहिला टप्पा २ जुलै २०१२ पासून आठ जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला.

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : राज्यात महात्मा ज्योतिराव फुले योजनेतून खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेताना १.८० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात शासकीय रुग्णालयांच्या तुलनेत खासगीत उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक  आहे. या योजनेत गंभीर आजारी  रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात. गरीब रुग्णांवर उपचारासाठी ही योजना फायदेशीर ठरत असली तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे.  

राज्यात योजनेचा पहिला टप्पा २ जुलै २०१२ पासून आठ जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला. राज्य शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून ही योजना राज्यव्यापी केलेली आहे. ०२ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने सुरू झालेली योजना १३ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना या नावाने सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली. २३ सप्टेंबर २०१८ पासून आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत एकत्रितपणे राबवण्यात येत आहे. ०१ एप्रिल २०२० पासून सुधारित योजना राज्यामध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीतर्फे राबवण्यात येत आहे.

राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत शासकीय व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांमधून उपलब्ध करून देण्याचा योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेची सांख्यिकी व अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार योजनेमध्ये गेल्या नऊ वर्षांत २९ लाख २६ हजार कुटुंबातील ५० लाख ७४ हजार ०५४ रुग्णांची उपचारासाठी नोंदणी केली. त्यामध्ये गेल्या २४ तासांत एक हजार ४७१ रुग्ण दाखल झाले आहेत.

आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ३३ लाख ५५ हजार ०७६ रुग्णांचे ‘स्क्रिनेड’ करण्यात आले. ४० लाख ९५ हजार ७८२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामध्ये शासकीय रुग्णालयात आठ लाख ५५ हजार ६७४, खासगी रुग्णालयांमध्ये ३२ लाख ४० हजार १०८ रुग्णांवर शस्त्रक्रियेचे उपचार झाले. योजनेंतर्गत उपचारार्थ रुग्णांपैकी आतापर्यंत एकूण ९१ हजार ७१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ११ मृत्यू गेल्या २४ तासांत झाले.

उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येप्रमाणेच शासकीयपेक्षा खासगी रुग्णालयात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. शासकीयमध्ये ३२ हजार ७२९, तर खासगी रुग्णालयात ५८ हजार ९९० मृत्यू झाले आहेत. एकूण नोंदणी केलेल्या रुग्णांपैकी १.८० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला.

रुग्णालयांना आतापर्यंत ९६५२.४३ कोटी  

योजनेतून रुग्णांवर उपचार केल्यावर ठरलेल्या दरानुसार रुग्णालयांना त्याची प्रतिपूर्ती करण्यात येते. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत शासकीय रुग्णालयांना १८७९.१४ कोटी, तर खासगी रुग्णालयांना ७७७३.४३ कोटी असे एकूण ९६५२.४३ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 1 80 percent of patients getting treatment under pradhan mantri jan arogya yojana die zws

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या