नवी मुंबई : कोपरखैरणे येथील केंद्रीय शिक्षण मंडळाची नवी मुंबई महापालिकेची शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी शिक्षक मिळाले नसल्याने पालकांमध्ये संताप वाढला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एकाच वर्गात शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी बसवले जात आहेत. नवी मुंबई महापालिकेने शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांनाही उत्तम आणि दर्जेदार शिक्षण पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून दोन ठिकाणी केंद्रीय मंडळाच्या शाळा पाच वर्षांपूर्वी सुरू केल्या आहेत. यात सीवूड्स व कोपरखैरणे येथे शाळा सुरू केल्या असून सूवीड्स येथील शाळा आकांक्षा फाऊंडेशन तर कौपरखैरणे येथील शाळा महापालिका स्वत चालवत आहे. सीवुड्स येथील शाळा संस्थेकडून अतिशय चांगल्या प्रकार सुरू आहे. मात्र कोपरखैरणे येथील शाळोबाबत तक्रारी वाढल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या शाळेतील वर्ग वाढले मात्र शिक्षक आहे तेवढेच राहील्याने आता एका शिक्षकाला दोन दोन वर्गांना एकत्र बसवून शिकवावे लागत आहे.

एप्रिलमध्ये शाळा सुरू झाली असून मागील तीन महिन्यांपासून केवळ तीनच तासांची शाळा भरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडत आहे. परीणामी परीक्षा घेण्याला ही विलंब होत आहे. विद्यार्थ्यांचा चाचणी परीक्षेचाही अभ्यासक्रम अपूर्ण राहिला असल्याने जुलैअखेर होणाऱ्या परीक्षा लांबवून ऑगस्टमध्ये घेण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यामुळे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी शाळा सुरू झाल्यापासून पालकांमधून होत आहे. मात्र अद्याप शाळेला शिक्षक मिळाले नाहीत. त्यामुळे संताप वाढला आहे.

पालकांचा आंदोलनाचा इशारा
करोनानंतर प्रत्यक्षात शाळा सुरू होऊन तीन महिने लोटले आहेत. तरीही शिक्षक कमी. त्यामुळे अभ्यासक्रम मागे पडला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थीसंख्या अधिक शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशी परिस्थिती राहिली तर आयुक्त दालनात विद्यार्थीसमवेत ठाण मांडून बसू अशी प्रतिक्रिया पालकांनामधून उमटत आहे.

शैक्षणिक संस्था जी शिक्षक भरती पुरवठा करते, यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली असून ३ ऑगस्ट अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. त्यांनतर याला कसा प्रतिसाद आहे, ते समोर येईल.- अभिजित बांगर, आयुक्त, महानगरपालिका