नाशिक : सुरगाणा तालुक्यातील चुली या गावातील मजुरांनी रोजगार हमी योजनेचे काम मिळावे तसेच बेरोजगार भत्ता मिळावा यासाठी सोमवारी तहसीलदार कार्यालयात आंदोलन केले. तहसीलदारांच्या दालनात तब्बल १० तास ठिय्या देण्यात आला असून उशिरापर्यंत कोणताही निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे

श्रमजीवी संघटनेच्या वतीने सुरगाणा तालुक्यातील चुली या गावास ३०ऑगस्ट रोजी रोजगार हमीचे काम मिळावे म्हणून तहसील कार्यालयाकडे मागणी केली होती. परंतु, अद्यापही मजुरांना काम मिळालेले नाही. कायद्याप्रमाणे कामाची मागणी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत काम दिले पाहिजे, असे असतानाही १५ दिवसानंतरही काम मिळालेले नाही. त्यामुळे सदर मजुरांवर हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

 मजुरांना दुसरा कोणताही रोजगार नसल्याने सर्व मजूर सध्या घरात बसून आहेत. त्यामुळे या मजुरांच्या वतीने तहसील कार्यालयाकडे रोजगार मिळावा म्हणूनमागणी करण्यात आली होती. परंतु, त्यांच्या मागणीची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने त्यांना काम मिळाले नाही. त्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात आंदोलनही करण्यात आले होते. त्यावेळी दोन दिवसात सर्व मजुरांना काम उपलब्ध करून दिले जाईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार यांनी दिले होते. मात्र त्याची पूर्तता झाली नाही.