राज्यात दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून दिवसाला ३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून, राज्यात झालेल्या करोनाचा प्रादुर्भावावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारवर खापर फोडले. “राज्य सरकारच्या बेशिस्तपणामुळे करोना वाढला आहे. भाजपासोबत दोन हात करू इच्छित असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोनाचा सामना करू शकलेले नाहीत,” अशी टीका त्यांनी केली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्रीमंत्री रामदास आठवले म्हणाले की, “२० हजार करोडचे पॅकेज देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. पण, महाराष्ट्र सरकारनं मात्र राज्यातील मजुरांना, शेतकऱ्यांना, उद्योपतींना, लघु उद्योजकांना मदत करण्यासंबंधी पाऊल उचलले नाही. उद्धव ठाकरे हे भाजपशी दोन हात करू इच्छित आहेत. पण करोनाचा सामना करू शकलेले नाहीत. सरकारच्या बेशिस्त पणाने करोना वाढलेला आहे,” असा आरोप आठवले यांनी ठाकरे सरकारवर केला.

पुढे ते म्हणाले की, “देशभरात करोनाचं संकट आहे. हजारो रुग्ण आढळत आहेत. बाधितांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात संख्या वाढत आहे. नागरिकांनी नियमांचं पालन करावं,” असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. “लॉकडाऊनमध्ये मजुरांचे हाल झालेले आहेत. उद्योग सुरू केले तर मजूर मिळणं कठीण झाले आहे,” असंही ते म्हणाले.

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आढळले ३ हजारपेक्षा जास्त रुग्ण

राज्यात मागील तीन दिवसांपासून २४ तासांच्या कालावधीत करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण वाढलं आहे. आज (१३ जून) सलग तिसऱ्या दिवशी राज्यात ३ हजारांपेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आढळून आले. ३,४२७ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं असून, ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १,५५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ५१ हजार ३७९ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४९ हजार ३४६ करोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोना रुग्णांची महाराष्ट्रातली संख्या आता १ लाख ४ हजार ५६८ इतकी झाली आहे.