मध्ये दोन दिवस गेले. दगडूला वाटलं आता मुलीचं नांदणं काही होत नाही. पण एक दिवस त्याला रोहिदास भेटला. त्याच्याबरोबर गावातली दोन कार्यकर्ती पोरंसुद्धा होती. त्यांच्याशी बोलता बोलता दगडूनेच सुमनचा विषय काढला. म्हणाला,
‘‘रोहिदास, परवा तू बैठकीत बोललास लय बरं वाटलं, पण काय करायचं, ती लोकं आहेत राजकारणी! वाटत नाय तिथं सुमनचा निभाव लागन म्हणून. आणि ही पोरगीसुद्धा लय हेकेखोर आहे. कशाला त्यांना आवडत नाय त्या गोष्टी करायच्या? उगीच आमच्या गळ्याला फास.’’
‘‘तुमच्या गळ्याला कसला आलाय फास. सुमन करती ते काही वाईट नाही. विद्याताईंशी बोलणं झालंय आमचं काल. त्यासुद्धा म्हणाल्या सुमनची इच्छा असेल तर तिनं निवडणुकीला उभं राह्यला काहीच हरकत नाही.’’
रोहिदास थोडा धीर देत म्हणाला.
‘‘पण तिच्या सासरच्या लोकांना नाही ना आवडत ते!’’
‘‘त्यांना कसं आवडेलं ते! बायकांचं वर्चस्व सहन झालं पाहिजे ना!’’
‘‘पण त्यापायी एवढं मोठं रामायण घडतंय त्याचं काय?’’
‘‘काही रामायण घडत नाही. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही फक्त एक करा, आज अण्णासाहेब काही कामानिमित्त आलेत गावात, त्यांच्या कानावर घाला. सुमनच्या सासरची माणसं त्यांच्याच पार्टीतली आहेत. त्यांच्याकडं जाताना तेवढं विद्याताईंना घेऊन जावा. काहीतरी तोडगा काढतील ते.’’
अण्णासाहेबांकडे जाण्याची रोहिदासची कल्पना दगडूलाही आवडली. त्याला वाटलं आता त्यांच्याकडूनच निघाला तर निघेल मधला मार्ग.
पण पुढच्याच क्षणी त्याला अण्णासाहेबांची माणसं आठवली. नंदाचा नवरा, चेअरमन, पुढारी यांनी आधीच अण्णासाहेबांचे कान फुंकले असणार.
आणि झालंही तसंच होतं.
अण्णासाहेब पुण्याहून आल्याआल्याच त्यांच्या घरात परवाच्या बैठकीवर चर्चा झाली होती.
खरं तर हा दगडूचा आणि त्याच्या जावयाचा प्रश्न होता. चार गावांना त्यात ढवळाढवळ करण्याची गरज नव्हती. पण काही राजकीय डाव असेही खेळले जातात. मग त्यात सुमनसारखी एखादी भरडली जाते.
पुढाऱयाला तर आपला हेतू साधून घ्यायचा होता. जांभूळवाडीत आपल्या बहिणीला निवडून आणायची होती. पण त्या गावच्या राजकारणात सुमनच्या सासरच्या घरचा दबदबा. तिथं सुमन उभी राहिली तर निवडून येणार हे निश्चित. म्हणून तर सुमन आपल्या गावची असतानाही ते सुमनच्या नवऱयाच्या बाजूने. पण सुमनच्या नवऱयाला काय माहीत, की हाच माणूस उद्या आपल्याशी बंडखोरी करून आपल्यालाच रसातळाला पोचविणार आहे.
आपला कावा आपल्याच मनात ठेवून पुढाऱयाने अण्णासाहेबांना सांगितलं. म्हणाला,
‘‘अण्णासाहेब, दगडूच्या सुमनने स्वत:च्याच घरात बंडखोरी केली आहे. दिराच्या विरोधात उभं राह्यचं म्हणती… तिच्या दिराचा ग्रामविकास योजनेतील गैरप्रकार बघता, जांभूळवाडीत कोणाला उभं करायचं हे आपलं अजून ठरायचं आहे म्हणा, पण पार्टीतल्या माणसांच्या घरातच अशी बंडखोरी बरी दिसत नाय. तेव्हा तुम्ही दगडूला बोलवून त्याची कानउघडणी करा जरा!’’
पुढाऱयाने इथं दोन्ही डाव साधून घेतले. सुमनच्या दिराला बदनाम करून जांभूळवाडीचा उमेदवार बदलण्याविषयी अण्णासाहेबांना विचार करायला लावला. आणि विद्याची तक्रार करून तिलाही चार गोष्टी सांगण्याची विनंती केली.
असे अण्णासाहेबांचे कान भरल्याले असताना दगडूने इथं जाणं मूर्खपणाचंच!
पण तरीही मोठय़ा आशेने दगडू विद्याला घेऊन संध्याकाळच्या वेळेला अण्णासाहेबांकडे गेला. तेव्हा पुढारी, नंदाचा नवरा, चेअरमन, कांबळेसर असे सर्वजण बसले होते तिथं. तसे अण्णासाहेब गावात असताना त्यांचं ठाणं इथंच असतं म्हणा.
आणि या वेळी तर त्यांना राजकारणात मुरलेले अण्णासाहेब दगडूला काय सांगतात, कोणती चाल चालून सुमनला परत पाठवायला लावतात हे पाहायचं होतं.
दगडू अण्णासाहेबांच्या समोर आल्याआल्याच पुढाऱयाचं तोंड वाकडं झालं. पण विद्या त्याच्या बरोबर आहे, हे बघताच त्याने आपले डोळे  आणि कान अण्णासाहेबांकडे लावले.
अण्णासाहेबांनी दगडूला समोरच्याच खुर्चीवर बसायला सांगितलं. विद्यासुद्धा त्याच्या शेजारी बसली. थोडय़ा इकडच्या तिकडच्या गोष्टी करून दगडूच्या येण्याचं कारण त्यांनी माहीत असतानाही विचारलं. म्हणाले,
‘‘आज काय काम काढून आलास?’’
पुढाऱयाकडे बघून घाबरत घाबरतच दगडूने सगळं सांगितलं. सुमन निघून येण्याचं तिच्या नवऱयाने सांगितलेलं कारण आणि खरी परिस्थिती. काही सुद्धा लपवलं नाही त्याने. सत्य परिस्थिती अण्णासाहेबांसमोर मांडण्यासाठी विद्यानेही त्याला मदत केली.
अण्णासाहेबांनीही शांतपणे सगळं ऐकूण घेतलं. थोडा वेळ गप्प राहिले आणि मग विचार करून बोलल्यासारखे म्हणाले,
‘‘हे बघ दगडू, गावात आता आपली माणसं आहेत. असले कौटुंबिक तंटे मिटवायला सरपंच आहे. गावात चेअरमन, पुढाऱयासारखे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यामार्फत घ्यायचं मिटवून. आणि तुझा जावई तरी कुठं लांबचा आहे? आपलाच माणूस आहे तो. कशाला लांबवून त्रास करून घ्यायचा…’’
‘‘नाही, पण ही सगळी माणसं…’’
दगडूने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याला बोलू न देता अण्णासाहेबांनीच आपलं बोलणं चालू ठेवलं. म्हणाले,  
‘‘आपलीच आहेत ती माणसं. आता त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवला पाहिजे एवढं खरं! आणि दगडू, बायकांनी कशाला पडायचं राजकारणात. चार जण कौतुक करणारे असतात इथं. पोरीला समजावून सांग. बायकांचं काम नाही ते. अब्रूचे धिंडवडे निघतात. आणि ते बायकांच्या प्रकृतीला मानवणारं नसतं.’’
विद्याला अण्णासाहेबांचं हे बोलणं पटणारं नव्हतं. तिच्या सत्कार समारंभात भाषण करणाऱया अण्णासाहेबांचे विचार आणि आजचं बोलणं. केवढा फरक! याचा प्रत्यय तिनं आज दुसऱयांदा घेतला. न राहून मग ती मध्ये बोललीच,  
‘‘पण तिची जर इच्छा असेल, तर कशाला अडवायची तिला.’’
‘‘तू गप्प बस!’’
अण्णासाहेब विद्यावर एकदम ओरडले. त्यांच्या ओरडण्याचं विद्याला आश्चर्य वाटलं. त्यांचा राग बघून मग ती सुद्धा गप्प बसली.
‘‘मला उद्या येऊन भेट.’’
अण्णासाहेबांच्या या वाक्याने पुढाऱयाने त्यांना काय सांगितलं असेल हे तिच्या लक्षात आलं. तेव्हा आता यांच्यापुढं काही बोलण्यात अर्थ नाही हे सुद्धा तिच्या लक्षात आलं.
थोडय़ा गंभीर झालेल्या वातावरणात अण्णासाहेब पुन्हा दगडूला सांगायला लागले. म्हणाले,
‘‘उद्या जर तुझ्या पोरीवर त्यांनी घाणेरडे आरोप केले, तिच्या चारित्र्याचे धिंडवडे काढले, तर इज्जत कोणाची जाणार आहे? पोरीच्या जातीने एवढा ताठपणा करून नाही चालत. हे जग खूप वाईट आहे. शहाणी असेल तर ते निवडणुकीचं फॅड डोक्यातून काढ आणि जा म्हणाव परत आपल्या घरी. नाही त्यांनी घरात घेतलं, तर मी बघतो काय करायचं ते.’’
अण्णासाहेबांच्या या बोलण्यापुढं त्यांना अजून काही सांगण्याची दगडूला इच्छा राहिली नाही. आणि हिम्मतही राहिली नाही. काही न बोलताच तो जागचा उठला आणि चालायला लागला. त्याच्या पाठोपाठ विद्याही थोडय़ा नाराजीने बाहेर पडली.

(क्रमश:)

– बबन मिंडे

(पुढील आठवड्यात वाचा : पक्षनिष्ठा आणि हितसंबंध. तालुकापातळीवरील राजकारण आणि सभापती.  अनेक पक्षांच्या अस्थिर सरकारची डोकेदुखी आणि वाढणारे पक्ष आणि पार्ट्या… यात मुरब्बी राजकाणी अण्णासाहेबांच्या खेळी.)