मासेपालन आणि त्यासंबंधीच्या प्रक्रिया उद्योगाविषयी प्रशिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमांची आणि या क्षेत्रातील करिअर संधींची सविस्तर ओळख-

मत्स्य व्यवसायामध्ये सागरी आणि नद्यांमधील मासेपालन, मत्स्यबीजनिर्मिती, मासेपालन व्यवस्थापन, माशांचे प्रक्रिया केलेले पदार्थ, सागरी अन्नपदार्थाची आयात-निर्यात, संशोधन, माशांचे संवर्धन आदींचा समावेश आहे. भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा मत्स्यनिर्मिती करणारा देश आहे तर गोडय़ा पाण्यातील मासे उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमाकांचा देश आहे. आपल्या देशाला लाभलेला लांब समुद्रकिनारा आणि जैवविविधता यामुळे मत्स्यपालन क्षेत्राची वाढ होण्यासाठी पोषक वातावरण मिळते. १० कोटींपेक्षा अधिक लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मत्स्यपालन व्यवसायाशी निगडित आहे.
तांत्रिक प्रगतीमुळे या क्षेत्राचा विस्तार मोठय़ा प्रमाणावर होत आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या मत्स्यबीजाचा विकास केला जात आहे. या क्षेत्राचे आयात-निर्यातीमधील महत्त्व लक्षात घेता
या क्षेत्राचे संनियंत्रण तज्ज्ञ व्यवस्थापकांमार्फत केले जाते.
या क्षेत्राचे वाढते महत्त्व लक्षात घेता या क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.
आपल्या देशातील गोडय़ा पाण्यातील मत्स्यपालनाच्या एकूण क्षेत्रांपकी आज केवळ ३० टक्के क्षेत्राचा सक्रिय उपयोग केला जातो तर खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालनाच्या एकूण क्षेत्राच्या
१० टक्केच वापर केला जातो. ही आकडेवारी लक्षात घेता या क्षेत्राच्या वाढीची आणि विस्ताराची शक्यता सुस्पष्ट होईल.
अभ्यासक्रम
मत्स्यव्यवसाय शास्त्राच्या अभ्यासक्रमाला बारावीनंतर प्रवेश घेता येतो. बॅचलर ऑफ फिशरी सायन्स हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. बारावी विज्ञान शाखेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
हा बहुशाखीय अभ्यासक्रम असून त्यात माशांच्या विविध प्रजातींच्या जैविक साखळीचा सखोल अभ्यास केला जातो.  विविध प्रकारच्या मत्सनिर्मितीच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती या अभ्यासक्रमांतर्गत करून दिली जाते. मत्स्यालय व्यवस्थापनाचे कौशल्य आणि सागरी संपत्तीच्या देखभालीचे तंत्रही या अभ्यासक्रमात शिकवले जाते. या अभ्यासाअंतर्गत इनलँड अ‍ॅक्वाकल्चर, फ्रेशवॉटर अ‍ॅक्वाकल्चर, मेरी कल्चर, इंडस्ट्रिअल फिशरिज, फिश प्रोसेसिंग, फिश न्युट्रिशन, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, पॅथॉलॉजी, एन्व्हायरॉन्मेन्ट इकोलॉजी, एक्स्टेंशन आदी विषयांचा समावेश करण्यात येतो.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केल्यावर राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, साहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांसारख्या संधी मिळू शकतात. केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या मरिन प्रॉडक्ट एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अ‍ॅथारिटी, फिशरिज सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, नाबार्ड, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी आदी विभागांत नोकरी मिळू शकते. खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या कृषी कर्ज विभागात क्षेत्रीय अधिकारी अथवा व्यवस्थापक म्हणून संधी मिळू शकते.
खासगी संस्था, फिश फार्म येथेही अ‍ॅक्वाकल्चर फार्मर, शेलफिश कल्चरिस्ट, हॅचेरी टेक्निशिअन, बायोलॉजिकल सायन्स टेक्निशिअन, फिश रिसर्च असिस्टंट अशा नोकरीच्या संधी मिळतात. सी फूड प्रोसेसिंग अ‍ॅण्ड एक्स्पोर्ट युनिट, अ‍ॅक्वा फीड प्लान्ट आदी क्षेत्रांत संधी मिळू शकते.
पदव्युत्तर पदवी तसेच पीएच.डी. अशी अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांना खासगी क्षेत्रात क्वालिटी कंट्रोल ऑफिसर, फिश प्रोसेसर, अ‍ॅक्वाकल्चरिस्ट, फार्म मॅनेजर अशा संधी मिळू शकतात. मत्स्य शेती आणि मत्स्यपालन केंद्राचे डिझाइन, निर्मिती, बांधकाम, देखभाल, दुरुस्ती, व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची मोठी गरज भासते. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार स्वत:चा व्यवसाय उभारू शकतात.
शोभिवंत मत्स्यनिर्मिती, मत्स्य बीजनिर्मिती आणि विक्री, मासे प्रक्रिया आणि विपणन, माशांना होणाऱ्या आजारांवरील उपाययोजना, सल्ला-सेवा, मोती निर्मिती आदी व्यवसाय सुरू करता येतात. याकरता नाबार्ड तसेच बँका अर्थपुरवठा करतात.
जगात सागरी अन्नपदार्थ आणि सागरी औषधांची मागणी वाढत आहे. त्यामुळे ओशनोग्राफर्सना या क्षेत्रात करिअरच्या संधीही मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होऊ शकतात. सागरी शोध मोहिमेत सहभागाची संधी मिळू शकते. सागरी मासेपालन उद्योगाला जागतिक बँकेचेही साहाय्य लाभू शकते.
उच्च प्रशिक्षित उमेदवारांना युरोपियन राष्ट्रे, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, चीन या देशांमध्ये विविध करिअर संधी मिळू शकतात. आखाती देशांतील मत्स्यप्रक्रिया उद्योगांमध्ये उत्तम संधी उपलब्ध आहेत. परदेशातही यासंबंधी आयात-निर्यात क्षेत्रांत  अनेक संधी उपलब्ध आहेत.
प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था
* सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरिज अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग :
या संस्थेच्या वतीने बॅचलर ऑफ फिशरी सायन्स (नॉटिकल सायन्स) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कालावधी चार वष्रे. सागरी मासेमारीचे तांत्रिक प्रशिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाते. याशिवाय मासेमारीसाठी उपयोगात आणणाऱ्या पाणबुडीचे संनियंत्रण, मासे पकडण्यासाठीची विविध तंत्रे, सागरी विज्ञान या विषयांचा समावेश आहे.
हा अभ्यासक्रम कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीशी संलग्न आहे. या अभ्यासक्रमाला डायरेक्टोरेट जनरल ऑफ शििपगची मान्यता आहे. अर्हता- बारावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या इतर विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अट लागू नाही.
प्रवेश प्रक्रिया : या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्टला ५० टक्के वेटेज, बारावीतील गुणांना ४० टक्के वेटेज आणि मुलाखतीला १० टक्के दिले जातात.
येत्या ६ जून २०१५ रोजी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयांवर प्रश्न विचारले जातील. ही वस्तुनिष्ठ पद्धतीची परीक्षा आहे. प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी ०.२५ टक्के गुण कापले जातील. ही परीक्षा कोची, चेन्नई आणि विशाखापट्टणम येथे होईल. मुलाखती जुलच्या मध्यात  होतील. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
पत्ता- सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरिज नॉटिकल अ‍ॅण्ड इंजिनीयिरग ट्रेिनग, फाइन आर्ट अव्हेन्यू, कोची- ६८२०१६.
ई-मेल- cifnet@nic.in
वेबसाइट- http://www.cifnet.gov.in
* महाराष्ट्र पशू आणि मत्स्यपालन विद्यापीठाच्या अंतर्गत कॉलेज ऑफ फिशरी सायन्स, तेलंगखेडी, नागपूर
आणि कॉलेज ऑफ फिशरी सायन्स उद्गीर, मराठवाडा येथे बॅचलर ऑफ फिशरी सायन्स हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

नया है यह!
एम.फिल इन नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट-
हा अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट या संस्थेने सुरू केला आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. अर्हता- ५५ टक्के गुणांसह वन/ कृषी/ पर्यावरण/ विज्ञान/ जैविक शास्त्रे या विषयातील पदव्युत्तर पदवी. पत्ता- डायरेक्टर, आयआयएफएम, पोस्ट बॉक्स-३५७, नेहरू नगर, भोपाळ- ४६२००३.
वेबसाइट- http://www.iifm.ac.in/mphil

सुरेश वांदिले – ekank@hotmail.com