पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक्रम, उपलब्ध शिक्षणसंस्था आणि करिअर संधींचा आढावा..
भारत हा ऐतिहासिकदृष्टय़ा समृद्ध वारसा असलेला प्रदेश आहे. देशात प्रागऐतिहासिक काळापासूनच्या ऐतिहासिक वास्तू, अवशेष, गडकिल्ले आदी विपुल प्रमाणात आढळतात. त्याद्वारे भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक विकासाच्या उत्क्रांतीचा शोध आणि बोध घेता येतो. ऐतिहासिक वारशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यात पुरातत्त्वशास्त्र (आर्किऑलॉजी) या विषयातील तज्ज्ञांचा हातभार लागतो. नव्या ऐतिहासिक प्रदेशाचे उत्खनन, त्याचा अभ्यास, निष्कर्ष या बाबीही तज्ज्ञांना कराव्या लागतात. सॅटेलाइट इमेजिंग, जेनेटिक मॅपिंग, रेडिओकार्बन डेटिंग, थर्मोग्राफी, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग यांसारखी अत्याधुनिक यंत्रसामग्री या तज्ज्ञांच्या साहाय्याला सध्या उपलब्ध झाल्याने उत्तखननाची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
पुरातत्त्वशास्त्र हा आंतरज्ञानशाखीय विषय आहे. यामध्ये उत्खननासोबत प्राचीन मानवी संस्कृती, जीवनशैली यांचा अभ्यास करावा लागतो. यासाठी प्राचीन वास्तू, नाणी, विविध प्रकारच्या भांडय़ांचे अवशेष, शस्त्रे, दागिने, वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष, मानवी सांगाडे, कवटी व इतर मानवी अवयव, कागदपत्रे, चोपडय़ा, वास्तूशैली आदींचा सूक्ष्म अभ्यास आणि विश्लेषण करावे लागते.
अतिप्राचीन वारशांचे जतन आणि संरक्षण करण्याच्या जिकिरीच्या कामाची जबाबदारी या तज्ज्ञांना पार पाडावी लागते.
इतिहास विषय घेऊन करिअर होऊ शकते याविषयी साशंकता असल्याने पुरातत्त्वशास्त्र विषयाकडे जाणीवपूर्वक वळणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.
हा विषय घेऊन वेगळ्या प्रकारच्या करिअरच्या जगात प्रवेश करता येतो. तथापि, यासाठी संयम, मानसिक संतुलन आणि अतिशय कष्ट करण्याची तयारी या गुणांची आवश्यकता आहे. उत्खनन ते सरंक्षण, संवर्धन या प्रवासात प्रत्येक टप्पा काटेकोरपणे निर्धारित वेळेत करून घेण्याचे कौशल्य या तज्ज्ञांना प्राप्त करावे लागते. इतिहासातील आपल्या लोकांची संस्कृती जाणून घेण्याची इच्छा आणि रस असणाऱ्यांसाठी हा विषय मोठे समाधान प्राप्त करून देऊ शकतो. या तज्ज्ञांना दिवसेंदिवस उत्खननाच्या कार्यात गढून जावे लागते. त्यानंतर प्रयोगशाळांमध्ये काम करावे लागते. यामध्ये काही महिने वा वष्रेही व्यतीत होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करिअर संधी :
सध्या भारतासह अनेक देशांत ऐतिहासिक परिसराचे उत्खनन सुरू आहे. प्राचीन वास्तूंचे संवर्धन आणि संरक्षणाकडेही लक्ष पुरवले जात आहे. युनेस्को या संघटनेने जगातील अनेक वास्तूंना ऐतिहासिक वारशाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षण, संवर्धन आणि नव्या संशोधनासाठीही निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे पुरात्वत्त्वशास्त्रज्ञांना करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत.

मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Archaeologists studying
First published on: 26-05-2016 at 05:07 IST