उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मायावती यांनी यंदा दलित-मुस्लिम मतांना विजयाचे समीकरण बनवले आहे. त्यामुळेच त्या खुलेआमपणे मुसलमानांना फक्त त्यांच्याच पक्षाला मतदान करण्याचे अपील करत आहेत. परंतु, यावरच आता वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मायावती यांच्याविरोधात कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. गरज पडल्यास मायावतींविरोधात भाजप तक्रारही करेल असे त्यांनी म्हटले आहे.

निवडणुकीचा निकाल ११ मार्च रोजी लागणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात मायावतींच्या विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुमारे २१ टक्के दलित मतदार आणि २० टक्के मुस्लिम मतदार आहेत. आणि मायावती यांनी याच व्होट बँकेला आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हा फॉर्म्युलाच निवडणुकीत वापरण्याचे मायावतींनी ठरवले आहे. आपल्या प्रचारसभेत त्या थेटपणे याचा उल्लेख करत आहेत. त्यामुळे इतर पक्ष हवालदिल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने धर्मावर आधारित मत मागणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. धर्मावर मते मागितल्यास संबंधित व्यक्ती किंवा पक्षाविरोधात कारवाई केली जाऊ शकते. या नियमांतर्गतच भाजप मायावतींविरोधात तक्रार दाखल करू शकते. भाजप सत्तेवर आल्यास आरक्षण रद्द करेल असे मायावती सातत्याने आपल्या प्रचारात सांगतात.