News Flash

सी.एल.

सकाळचे साडेसहा वाजलेयत. मला जाग आलीय. उठायला अर्धा तास उशीरच झालाय.

सकाळचे साडेसहा वाजलेयत. मला जाग आलीय. उठायला अर्धा तास उशीरच झालाय. पावसाळी हवामानाचा परिणाम! काल सपाटून भिजलो होतो, आज म्हणूनच अंग जड वाटत होतं. ताड्कन उठलो. बाहेर डोकावलं. पाऊस सपाटून पडत होता.

झोतामागून पाण्याचे झोत.. त्यात घोंघावणारा वारा. खोलीतून खाली उतरलो असतो, तर दोन मिनिटांत चिंब भिजून गेलो असतो. गॅलरीमध्ये आलो. गॅलरी पावसाने चांगलीच झोडपून काढली होती. तरीपण खळाळून स्वच्छ न्हालेल्या लहान मुलाप्रमाणे वाटली ती मला. पावसाचे शिडकावे अंगावर घेत खाली पाहिलं. रस्त्यावर पाणी जोरजोरानं वाहत होतं, गटारे तुडुंब भरून वाहत होती. कित्येक वस्तू घरंगळत होत्या. सगळीकडे दलदल आणि पाणीच पाणी.

हवेत जीवघेणा गारवा. पाऊस थांबण्याची, निदान त्याचा जोर ओसरण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. त्यात आजूबाजूचा परिसर, त्याचा देखावा पाहता खाली उतरण्यास मन घेत नव्हते.

आज शनिवार.. ऑफिस! हजेरी लावणे आवश्यक वाटत होते. नपेक्षा फुकट एक सी.एल. जाणार होती. अगोदरच बहुतेक संपलेल्या. त्यात आजची आणखी एक हकनाक. या सी.एल.सुद्धा पैशाप्रमाणे गरज पाहूनच वापराव्या लागतात. आयुष्यात अनेक गोष्टींबाबत जपून राहावं लागतं.

या सकाळच्या वातावरणाने ऑफिसात जाण्याचा ‘मूड’ घालवून टाकला. उठल्याबरोबर वातावरण कसं प्रसन्न आणि उल्हासदायक हवं बघा. मग सारी कामे आणि पुढचा दिवस उल्हासदायक जातो; पण आजचं वातावरण काही औरच!

जाऊ दे सी.एल. गेली तर.. एक विचार मनात बळावला. त्याचा विजयसुद्धा झाला आणि पुन्हा शरीर अंथरुणात गुरफटून घेतलं. डोळे मिटून घेतले. डोळ्यावर झापड आली. बाहेर पावसाचं घोंघावणं सुरूच होतं.

बरोबर ८.४५ ला जाग आली. म्हणजे दोन तास अगदी आरामात अंथरुणात गेले होते! आता अंगात विशेष आळस नव्हता. अंग झटकून उठलो. विचार चमकला. जावे का ऑफिसला? अजून संधी आहे. आज तुफान पाऊस, पाणी तुंबलेलं, गाडय़ा अनियमित. खेचाखेची, गर्दी, चिंब शरीरं, कदाचित या परिस्थितीमुळे साडेदहापर्यंत ऑफिसमध्ये घेतीलही. नाही तर आहेच सी.एल. प्रयत्न तर करावा.

विचार पक्का झाला. ९.१५ ला खोलीतून बाहेर पाऊल ठेवलं. बाहेरचं वातावरण मोठय़ा कसोशीनं शरीरात जिरवलं. ९.२० ची बस मिळाली. साऱ्या सीट्स चिंब भिजून गेलेल्या! त्यातल्या त्यात एका बऱ्यापैकी सीटवर बैठक ठोकली. ९.३० ला स्टेशनवर! गाडय़ा येताहेत.. पण उशिराने.. ‘‘हाँ भाई, ट्रेन तो चालू है, लेकिन देरीसे..’’ संवाद कानावर आदळतात. हे अपेक्षितच. ९.३० ला नुकतीच एक गाडी येऊन गेली होती. त्यामुळे दुसरी आणखी अर्धा तास तरी येण्याची शक्यता नाही.

इकडेतिकडे पाहिले. वृत्तपत्रांचे मथळे कालच्या पावसाच्या तुफानी घोडदौडीच्या वर्णनांनी भरलेले होते. पश्चिम किनारपट्टीला वादळाचा बसलेला प्रचंड तडाखा, गेटवेचा कोसळलेला बंधारा, ताजमहाल हॉटेलच्या परिसरात घुसलेले पाणी, घोंघावणारा वारा, या साऱ्यांची दृश्ये टिपण्यासाठी झपाझप चालणारे परदेशी पाहुण्यांचे कॅमेरे, तीन दिवसांपूर्वी समुद्रात गेलेले कोळी.. बेपत्ता.. शोध चालू.. त्यांच्या शोधार्थ नौदलाच्या निघालेल्या तीन युद्धनौका, दोन हेलिकॉप्टर्स.. मध्य रेल्वेची कोलमडलेली वाहतूक. विविध भागांत साचलेले पाणी.. अनेक बातम्या.. नजर या साऱ्यांवरून झराझर येऊन स्थिरावली. मन विव्हळ झाले एका बातमीने. बेपत्ता असलेल्या त्या सागरपुत्रांच्या घरी काय हाहाकार उडाला असेल?

नजर समोर फिरवली. स्टेशनच्या समोरील सखल भाग, पाणी तुफान तुंबलेलं! साऱ्या झोपडय़ांतून पाणी घुसलेलं! रात्रभर पावसाच्या माऱ्याने आणि पाणी घुसल्याने कुणालाच झोप नाही. छतावरचे प्लॅस्टिक पेपर उडून गेलेले. पाणी आता ठिबकतंय. आतील सारी जागा भिजून चिंब.. मुलं केकाटतायत. एकाला ताप आलाय. त्याला दवापाणी करायला हवं. डॉक्टरकडे जायला हवं, पण पैसे कुठायंत? आज तरी आधी झोपडी सावरायला हवी. पाणी बाहेर काढलं पाहिजे. काय हे जीवन!

हातात फावडं, कुदळ, घमेलं घेऊन माणसं जमली.. सारी झोपडपट्टी पाणी उपसायच्या प्रयत्नाला लागली.. मधला बंधारा फोडून पाणी पलीकडं पाठवण्यासाठी. पावसाची रिपरिप थोडी कमी झालीय. हात भराभर काम करतायंत.. एक, दोन, तीन.. बंधारा फुटला, चर खणला गेला, पाणी हळूहळू पलीकडं सरकायला लागलंय. लहान पोरं नागडय़ानीच टाळ्या पिटतायंत. झोपडपट्टीतील कुत्री हुंगत हुंगत इकडंतिकडं फिरतायंत. काही पोरं त्या साठवलेल्या पाण्यात यथेच्छ डुंबतायंत. बाप्ये पाणी हटविण्याच्या प्रयत्नात आहेत, तर बायका उभ्या उभ्याच इकडंतिकडं नाचतायंत. सारी झोपडपट्टी कामाला लागलीय.

१०-१०. स्टेशनात गाडी धडधडत आली. फलाटाच्या किनाऱ्यावरून फाकाफाक झाली. आतील साऱ्या सीट्स आधीच्या स्टेशनातील प्रवाशांनी अगोदरच भरून गेल्या होत्या, तरीही गाडीत जागा पकडण्यासाठी गाडीवर हल्ला करण्याच्या इराद्यानेच सारे प्रवासी एक विशिष्ट ‘पोझ’ घेऊन उभे राहिलेले. गाडी पूर्ण थांबायच्या आतच ‘धडाड्.. धड्ऽऽ..’ प्रचंड आवाज करत प्रवाशांनी आत उडय़ा टाकल्या. ‘उतरनेवाले यात्रियों को पहले उतरने दीजिये’ ध्वनिक्षेपक कोकलत होता, पण ऐकतो कोण? घुसण्यासाठी एकच रणकंदन माजलेले.

गाडी हलली.. सीट मिळालेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर प्रचंड विजय मिळविल्याचा आनंद, उभ्या असलेल्या प्रवाशांच्या नजरेत बसलेल्यांबद्दल हेवा, तर काही जण कुठल्या सीटवरून कोण कधी उठतो व ती सीट मला कधी मिळतेय यासाठी टपून बसलेला.

वीस मिनिटांनी गाडी पुढच्या स्टेशनात आली. मी फलाटावर आपोआपच फेकला गेलो. अंगाचा खिमा झालेला. साऱ्या प्लॅटफॉर्मवर नजर फिरवली. प्रत्येक प्लॅटफॉर्म माणसांनी नुसता फुललेला! गुळाच्या खडय़ाला मुंग्या डसाव्यात तशी माणसे प्लॅटफॉर्मला डसलेली. ठेचकाळत, ढकलत एक नंबरवर आलो. गाडी आली. तडक आत घुसलो, जबरदस्तीनेच! गत्यंतरच नव्हते. १०.३२ ला गाडी हलली. धावपळ केली तरी ऑफिसला जायला अकरा वाजणार हे निश्चित! पण आता माघार घ्यायची नाही. माणसांनी फुलून गेलेल्या गाडीने शेवटी अपेक्षित स्टेशन गाठले. एव्हाना गाडीसुद्धा दमलेली वाटली.

१०.४२ ला स्टेशनातून बाहेर.. ताडताड पावलं टाकत मेन रस्त्यावर आलो. शरीर कंटाळलेलं.. त्याला जाग आणायचीय.. तरतरी आणायचीय.. समोरच्या हॉटेलमध्ये घुसलो. इथंही गर्दी.. खाण्यासाठी, पिण्यासाठी.. मी कॉर्नरची जागा मिळवली. ‘एक चाय’ वेटरला ऑर्डर दिली. वाफाळलेला कप समोर आला.. घटाघट चहा संपवला. आज चवीने चहा पिण्यास वेळच नव्हता. ताड्कन उठलो.. पैसे काऊंटरवर ठेवले. बाहेर सरकलो.. घाईत एकाला धक्का लागला.. तो रागाने गर्रकन वळाला. मी ‘सॉरी’ म्हणालो.. पुढे पळालो.

१०.५५ ला ऑफिसमध्ये येऊन थडकलो. मस्टरची पोझिशन पाहिली. मस्टर इन्-चार्ज पुटपुटला- ‘‘साडेदहापर्यंत ‘लेट’ घेतले, आता इलाज नाही. मस्टर बडय़ा साहेबांकडे गेले.’’

मी विनंती केली, ‘‘प्लीज!’’ उत्तर आले, ‘‘सॉरीऽऽ’’

मी एक उसासा सोडला.. सी.एल.चा फॉर्म घेतला.. एक दिवसाची सी.एल. पुट्अप केली!
अरविंद चव्हाण – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:22 am

Web Title: casual leave
Next Stories
1 ‘ससा-कासव’ शर्यत
2 आता बुजवू नका-खोदा!
3 पाठिंबा
Just Now!
X