‘क्षमेपलीकडचा अर्थ’ या लेखात आरती कदम यांनी धाडसी परंतु अतिशय मौलिक विचार मांडला आहे. या लेखाद्वारे अतिशय संवेदनशील व ज्वलंत विषयांवर एक दिशादर्शक व अतिशय अर्थपूर्ण विचार मांडला आहे. ज्या विषयावर लोक बोलायला घाबरल्यासारखे करतात त्या विषयाला आपण वाचा फोडली आहे. निकोप समाजासाठी हे विचार समोर येणे गरजेचे आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारानुसार क्षमा हे वीराचे लक्षण आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजप्रबोधनाचे कार्य पार पडायला हवे व ते कार्य आपले वृत्तपत्र यशस्वीपणे पार पाडत आहे.

दीपक एकाडे, वाशिम

 

अप्रतिम लेख

‘क्षमेपलीकडचा अर्थ’ हा आरती कदम यांनी लिहिलेला लेख अप्रतिम आहे. मी चतुरंग पुरवणी नियमित वाचते. आजपर्यंत वाचण्यात आलेल्या लेखांमधून हा लेख अप्रतिम आहे. समाजव्यवस्था किंवा समाजवास्तवात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी या लेखात मांडलेले विचार आचरणात आणणे आवश्यक आहे.

सायली कुलकर्णी

 

क्षमेचा अर्थ भावला

‘क्षमेपलीकडचा अर्थ’ या लेखातील थोरडिस एल्वा आणि टॉम यांच्या धाडसाचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. लेखाची मांडणी आणि क्षमेचा आपण समजावून सांगितलेला अर्थ मनाला खूप भावला. सुंदर लेख वाचायची संधी त्यानिमित्ताने मिळाली.

अमृता गुरव

 

 

अर्थपूर्ण क्षमा

‘क्षमेपलीकडचा अर्थ’ या लेखाने  बाईपणाची दुखरी बाजू बाजूला ठेवून केवळ एक व्यक्ती म्हणून निकोप विचार करायला भाग पडले. एल्वा आणि टॉमने जे धाडस दाखवले ते खरंच कौतुकास्पद आहेच, परंतु मुळात बलात्कार म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न मनाला सतावत राहतो. बलात्काराची नेमकी व्याख्या शब्दबद्ध करता येईल का? आणि ती व्याख्या कोणी करावी, कायद्याने की समाजाने? ‘एखाद्या स्त्रीचा तिच्या मनाविरुद्ध शारीरिक उपभोग घेणे म्हणजे बलात्कार’ ही सर्वसामान्यांची ढोबळ व्याख्या. तर मग रोज वर्तमानपत्रांत कितीतरी लैंगिक शोषणाच्या घटना मांडल्या जातात, कधी लग्नाचे आमिष दाखवून तर कधी प्रेमाची भुरळ पाडून शोषण होते. कोणतेही आमिष दाखवून स्त्रीचा उपभोग घेतला जात असेल तर त्यास स्त्रीच्या मनाविरुद्ध कसे म्हणता येईल? (केवळ ती आमिषाला बळी पडली असेच म्हणावे लागेल.) मग मनाविरुद्ध नाही तर केवळ आमिष दाखवून तिच्या मनाची संमती घेऊन उपभोग घेतला जातो त्यास बलात्कार म्हणता येईल का? व्यावहारिक विचार केला तर त्यास मोबदला म्हणता येईल का?  भारतात आजही मोठय़ा प्रमाणात मुलींच्या मनाचा विचार न करता तिचे कुटुंब, समाज तिचा विवाह करतात, मग अशा विवाहानंतर येणाऱ्या संबंधांनाही बलात्कार म्हणावे का? मुलींच्या मनाविरुद्ध लग्न होऊन घडणाऱ्या संबंधांना तर मग समाजमान्य बलात्कारच म्हणावे लागेल! मग इथे नेमके आरोपी कोण? त्या स्त्रीचा पती, कुटुंब, समाज, कायदा की विवाहसंस्था? आणि अशा कळत-नकळत होणाऱ्या अत्याचाराच्या क्षमेचे स्वरूप काय असावे? हा प्रश्न कायम अनुत्तरितच राहणार!

आज जी सामूहिक बलात्कारातून बाहेर पडणारी राक्षसी वृत्ती, ‘‘आपला गुन्हा नाही तर आपल्यातली ती भावना जागृत होऊन आपल्यातल्या पशूने ते घडवले’’ असे निर्लज्जपणे सांगते, (जिथं पशू-प्राणीदेखील निसर्गाने ठरवून दिलेल्या त्या भावनांचा कालावधी ओलांडत नाहीत तिथं राक्षसी वासना आपला गुन्हा पशू-प्राण्यांवर लादते.) तेव्हा तिथे क्षमेचा अर्थ काय घ्यावा? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील तर प्रथम बलात्काराची नेमकी व्याख्या शब्दबद्ध करून क्षमेपलीकडच्या अर्थाची उकल करावी लागेल. आणि अशा उकल केलेल्या क्षमेलाच ‘अर्थपूर्ण क्षमा’ म्हणावी लागेल!

सुवर्णा थोरात, किल्ले धारुर, बीड.

 

 भावनाच अधिक प्रभावशाली

‘क्षमेपलीकडचा अर्थ’ वाचले. ज्या बलात्काराच्या घटनेचे वर्णन दिलेले आहे ती घटना परिस्थितीजन्य आहे. तसेच थोडा वेगळा विचार केल्यास दोघेही मद्यधुंद असल्याने आणि एकमेकांच्या प्रेमात असल्याने ही परिस्थिती उद्भवली. त्या युवकाने निघून न जाता खोलीवरच थांबून दुसरे दिवशी तिला जे झाले ते आपल्या मद्यधुंद अवस्थेमुळे झाले आणि आता आपण काय करायचे ते दोघे मिळून ठरवू या. जे झाले ते बरोबर नव्हते असे मीही मानतो आणि तुझी क्षमा मागतो, असे केले असते तर कदाचित हा झालेला मानसिक त्रास झाला नसता आणि झाले तो बलात्कार होता असेही मानले गेले नसते. एकूणच अत्यंत संवेदनशील असल्याने या प्रकारात भावनाच अधिक प्रभावशाली असतात.

रघुनाथ बोराडकर, पुणे

 

दृष्टिकोन बदलण्याची गरज

आरती कदम यांचा ८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेला ‘क्षमेपलीकडचा अर्थ’ हा लेख वाचला. जोपर्यंत माणसाची लोकांकडे (बलात्कार पीडित ) महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत आपण मांडलेले विचार शक्य नाही. एल्वा ही एका प्रगत देशातील असतानासुद्धा तिला इतके दिवस लागले स्वत:ला माफ करण्यासाठी; विशेष म्हणजे त्यात तिचा काहीच दोष नसताना. भारतासारख्या पुरुषप्रधान देशामध्ये तर किती वाईट परिस्थिती आहे, आणि आपल्या देशात अशा कितीतरी एल्वा वर्षांनुवर्षे स्वत:ला दोष देत धुमसत राहत असतील.

नितीन गव्हाणे

 

तिच्याइतकीच त्याचीही प्रगल्भता

आरती कदम यांचे ८ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या ‘क्षमेपलीकडचा अर्थ’ या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन. लेखाचा विषय महत्त्वाचा आहेच, पण बलात्काराच्या घटनेकडे स्वत: बलात्कारितेनंच इतक्या प्रगल्भपणे बघणं विलक्षण दुर्मीळ आहे, याशिवाय  तिच्याइतकीच प्रगल्भता त्याचीही दिसते हे तर आणखीनच विशेष. हे सारं आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा अभिनंदन.

विद्या बाळ