08 August 2020

News Flash

Happy Chocolate Day: डार्क चॉकलेटची काळी जादू

चव आणि कस या दोहोंचा संगम म्हणजे डार्क चॉकलेट, आनंदाचा जणू झराच.

डार्क चॉकलेट

प्रसिद्ध चॉकलेटिअर आणि शेफ वरुण इनामदार यांनी देश-विदेशातील चॉकलेट्सची चव घेत केलेलं हे चॉकलेटी रसग्रहण! आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजल्या जाणाऱ्या डार्क चॉकलेटच्या जादूविषयी…

काळा रंग जणू समाधीचा रंग असावा. डोळे मिटून घेतले की काळ्याचंच अस्तित्व राहतं, इतकंच. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जात नाही. म्हणजे तिथं काळ्याचं पांढरं करून चालत नाही. जन्मजात जे काळं आहे तेच ग्राहकांसमोर मांडावं लागतं आणि गुणरसग्राहक त्याच्यावर डोळे झाकून आपल्या पसंतीची मोहोर उमटवतात. काळा वा डार्क म्हणा, त्याचं ‘कन्फेक्शनरी’ क्षेत्रात तितकंच अबाधित स्थान आहे. ‘डार्क चॉकलेट’ हा त्यातील अनभिषिक्त सम्राट म्हणावा लागेल. कारण चवदार आणि तरीही आरोग्यपूर्ण असं हे कन्फेक्शनरी जगातलं एकमेव उदाहरण म्हणावं.

पोषणतत्त्वाचा विचार भारतात पुरातन काळापासून केला जात आहेच; पण तो कोको बियांच्या बाबतीतही तो केला जात असावा, हे आजवर ध्यानी आलेलं नव्हतं. कोको बियांच्या बाबतीत गांभीर्याने केले जात असलेले संशोधन मला कर्नाटकातील कासारगोड येथे दिसले. ‘सेन्ट्रल प्लान्टेशन क्रॉप्स रीसर्च इन्स्टिटय़ूट’ अर्थात रोपण पिकांवर संशोधन करणारी देशाची केंद्रीय संस्था या ठिकाणी आहे. या संस्थेचे डॉ. चौडाप्पा यांनी मला त्यांच्या एका प्रकल्पाला भेट देण्यासाठी आमंत्रित केले होते. तिथं पोहोचल्यावर मला आश्चर्याचे एकामागून एक धक्के बसले. आजवर चॉकलेटसाठीची कोकोबीन्स केवळ परदेशातूनच आयात केली जात असल्याचं मनावर बिंबलं होतं. ते या संस्थेनं साफ पुसून टाकलं. म्हणजे देशातील सर्वोत्कृष्ट प्रतीच्या कोको बिया उत्पादित करून त्याच्या वितरणासाठी ही संस्था गेली कित्येक वर्षे अहोरात्र झटत आहे. मी जेव्हा संस्थेच्या आवारात पाऊल टाकले तेव्हा प्रवेशद्वारावर अनेक छोटेमोठे फलक झळकत होते. त्यावर कोको आणि डार्क चॉकलेटच्या पोषणतत्त्वांची माहिती विस्ताराने दिलेली होती. यात तो आरोग्याचा महत्त्वाचा साथीदार आहे, हे आवर्जून नमूद करण्यात आलं होतं. कोको आणि डार्क चॉकलेटवर आजवर करण्यात आलेल्या अनेक वैद्यकीय चाचण्या आणि संशोधनांतून त्याचं आरोग्यदायित्त्व सिद्ध झालं आहे. डार्क चॉकलेट खास करून हृदयासाठी चांगलं आहे. त्याच्या सेवनाने हृदयाशी संबंधित विकार दूर होण्यास मदत होते. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर ‘अ‍ॅण्टि ऑक्सिडंट’ असल्याने त्याचाही फायदा होतो. अलीकडील ताज्या संशोधनात ‘फ्लावोनॉइड’ने पुरेपूर डार्क चॉकलेटच्या सेवनाने रक्ताभिसरण संस्था अधिक चांगली होण्यास मदत होते, हे सिद्ध झालं आहे. शरीराला आतून मजबूत करण्याची जबाबदारी जशी याच्यात आहे, तशी ती बाहेरून म्हणजे त्वचेला लकाकी आणणारे घटकही कोकोबीन्सच्या ठायी काठोकाठ भरले आहेत.

चव आणि कस या दोहोंचा संगम म्हणजे डार्क चॉकलेट, आनंदाचा जणू झराच. डार्क चॉकलेट हे मिल्क चॉकलेटप्रमाणेच कोकोबीन्सपासून होते, पण या चॉकलेटमध्ये दुधाचा अंश नसतो किंवा असलाच तर जरासा असतो. हेच त्याच्या आरोग्यपूर्ण असण्याचे गमक आहे. जास्तीत जास्त कोका बिया वापरून याला जितके गडद करता येईल, तितकी त्याची तीव्रता वाढत जाते; पण त्याचवेळी ते अधिकाधिक कडवड बनत जातं. नाण्याला दोन बाजू असतात. एक पांढरी आणि दुसरी काळी. आता या काळ्या कुळकुळीत चॉकलेटची शब्दश: काळी बाजू म्हणजे याचा अधिक वापरही तुमची चव घालवू शकते. म्हणजे ते कडू लागतं. डार्क चॉकलेटमध्ये कोकाचं प्रमाण ४४ ते ९९ टक्क्य़ांपर्यंत असू शकतं. पण जास्त कोको असणारं चॉकलेट विशेषकरून इतर चॉकलेटचा बेस बनविण्यासाठी वापरलं जातं. नुसतं खाण्यासाठी नव्हे.

आम्हा भारतीयांच्या जिभा दुधापासून बनलेल्या चॉकलेटवर लवलवणाऱ्या; अर्थात आपण सगळे मिल्क चॉकलेटचे फॅन. पण डार्क चॉकलेटवर ताव मारण्याची खवय्यांची रीत ही अलीकडची म्हणजे अनेक भारतीय सातासमुद्रापार गेले. तेथील मुदपाकखान्यात जे शिजतं ते उघडय़ा डोळ्यांनी पाहिलं आणि रसाला आसुसलेल्या जिभांनी चाखलं. ते भारतातही यावं, असं त्यांना वाटलं. त्यातूनच या डार्क चॉकलेटचा प्रसार भारतात झाला. भारतीय खवय्यांचं डार्क चॉकलेटशी जडलेलं हे अगदी कोवळं प्रेम म्हणावं लागेल.

मी भारतात चाखलेलं सर्वोत्तम डार्क चॉकलेट ‘लिण्ड्ट’ म्हणावं लागेल. खरं तर डार्क चॉकलेटचं मार्केट अद्याप भारतात तितक्या जोमाने उभारीस आलेलं नाही. ज्या प्रमाणात इतर देशांतील नागरिक डार्क चॉकलेटचा आस्वाद घेतात. तितक्या प्रमाणात खवय्येगिरी इथे रुजलेली नाही. अगदीच तोंडाला पाणी सुटतंय म्हणून सांगतो. अक्षरश तोंडात विरघळणाऱ्या ‘गिरारडेली’वर बाहेरचं जग फिदा आहे. हे अद्याप आपल्याकडे मिळत नाही. ( पण एक चांगली गोष्ट म्हणजे हे चॉकलेट प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग साइट्सच्या माध्यमातून तुम्ही घरी मागवू शकता, हे नुकतंच समजतंय.) भारतात हल्ली सर्रास मिळणारं डार्क चॉलेट म्हणजे ‘हर्शेज’चं डार्क चॉकलेट. या हर्शेजच्या बारमध्ये गोड आणि कडूचा संगम आहे. नेस्लेने किटकॅट सेन्सेस डार्क नव्यानं बाजारात आणलंय. भारतात डार्क चॉकलेटचे वाढते फॅन लक्षात घेऊन त्यांनी ही चाल केली असावी. त्याअगोदल आलंय कॅडबरीचं बॉनव्हिल. डार्क चॉकलेटची चव भारतीयांना पहिल्यांदा चाखवली ती कॅडबरी बॉनव्हिलनं. शेवटचं सांगायचं तर कॅम्पकोच्या ‘फनटॅन’ बारची मजा काही औरच. कर्नाटकातील पुत्तूरमध्ये कॅम्पकोच्या फॅक्टरीत गेलो असताना मला याचा साक्षात्कार झाला. तगडय़ा परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत तितक्यात तोडीची चव देत भारतीय कंपन्यादेखील उतरल्या आहेत, हे बघून आणि चाखून खरंच खूप आनंद झाला. भारतीय चॉकलेट कंपन्याही त्यांचं ‘निश मार्केट’ तयार करत आहेत.

खा, प्या, मजा करा, या रेषेत जगणाऱ्यांसाठी हे सारे सवंगडी नेहमीच हात जोडून उभे आहेत. गरज आहे ती फक्त चवीच्या प्रदेशात मुशाफिरी करण्याची. कसदार चवीने खाणार त्याला डार्क चॉकलेट देणार, असंच म्हणावं लागेल. पण शेवटी अति तेथे माती हे लक्षात ठेवा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. त्यामुळे डार्क चॉकलेट बिनधास्त चघळा. ते आरोग्यपूर्ण असेल पण तरीही जपूनच.

(अनुवाद : गोविंद डेगवेकर)

(सौजन्य- व्हिवा)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2018 1:01 am

Web Title: know all about dark chocolate happy chocolate day happy valentines week 2018
Next Stories
1 Then & Now: प्रेम, प्रपोज आणि बरंच काही..
2 Happy Propose Day: बारावीतलं प्रेम आणि पावसातलं फसलेलं प्रपोजल…
3 Happy Propose Day 2018: प्रपोज करण्यासाठी दहा सजेशन्स
Just Now!
X