News Flash

दुसरा चहा

मोकाशींच्या सुनेनं त्यांना सकाळचा दुसरा चहा पंधरा मिनिटं उशिरा दिला होता.

मोकाशींच्या सुनेनं त्यांना सकाळचा दुसरा चहा पंधरा मिनिटं उशिरा दिला होता. मोकाशींवरच्या घनघोर अन्यायाबद्दल च् च् असा आवाज करत आम्ही सर्व आजोबांनी सहानुभूती अधिक निषेध व्यक्त केला आणि मोकाशी, परब व ओक यांनी गुपचूप, या कानाचा त्या कानाला पत्ता लागू न देता, पुढील पाच वर्षे दुसरा चहा आपापल्या सुनांवर लादला!

आम्ही म्हातारे बागेत का येतो? तसं म्हटलं तर बसण्याकरिता; कारण बागेत पोचेपर्यंत आमची चालण्याची शक्ती संपलेली असते. आम्ही घरी काय करतो? बसतो, हा काही वेळा बदल म्हणून आम्ही आडवे होतो, झोपतोही. नोकरी करणारा तरुण नातू म्हणतो, ‘‘आजोबा, याचा अर्थ, तुम्हाला बसण्याकरिता बागेत जाण्याची काहीही गरज नाही. घरात झोपतापण येते, घरात ही जास्तीची सोय आहे. मग धडपडत बागेत जाता कशाला? रस्ता ओलांडताना पडलात, फ्रॅक्चर झालं, की हातापायाला प्लॅस्टर घालून तुम्ही पडायला मोकळे! आज कमीत कमी तुमची नित्यर्कम तुम्ही आपली आपण करता, उद्या फ्रॅक्चर होऊन पलंगबंद झालात तर तीही कामे आईबाबांना व मला करावी लागतील! ऑफिसमध्ये जाण्याकरिता आम्हाला प्रवासात धडपडावं लागतं, नोकरी करणं हीही धडपडच आणि फ्रॅक्चर होऊन अंथरुणावर पडलात की आमच्या मागं नवी धडपड.’’

आम्हा आजोबांना नातवंडांच्या म्हणण्यात तथ्य आहे हे कबूल करणं भागच आहे; पण आम्ही आजोबामंडळी बागेत जमतो ते नुसतं बसण्याकरिता नाही, तर आमची दु:खं वाटून घेण्याकरिता. दु:खं वाटल्यानं नुसती कमी होत नाहीत, तर दु:खांच्या निखाऱ्यांची फुलं होतात! आम्हा आजोबांच्या आया, आमच्या वडिलांच्या तुटपुंज्या मिळकतीत, हिमतीनं संसार निभावणाऱ्या, गृहकृत्यदक्ष व समाधानी होत्या. कधी चुकून दूध फाटलं तर फाटलेल्या दुधात गूळ मिसळून, त्या ‘फाटगुळणी’ पदार्थ तयार करायच्या. तो पदार्थ एवढा रुचकर असायचा, की दूध केव्हा नासते याची आम्ही मुले वाट पाहायचो. आम्ही आजोबा त्या श्रेष्ठ आयांची बाळं आहोत! म्हणून तर आम्ही दु:खांची फुलं करू शकतो.

मोकाशी आजोबा बागेत तक्रार करतात, ‘‘आज वंृदानं मला सकाळचा दुसरा चहा पंधरा मिनिटं उशिरा दिला.’’

ओकांनी विचारलं, ‘‘सकाळचा पहिला चहा? का तोही उशिरा मिळाला?’’

‘‘तो वेळेवर मिळाला, कारण तो घरातील सर्वाचा एकत्र असतो. वृंदाला सकाळी नवऱ्याची वेळ सांभाळायची असते. त्यात माझी वेळ सहजीच जमून जाते; पण तासानंतरच्या माझ्या दुसऱ्या चहाचं काय? तो मला पूर्ण दुधाचा लागतो. तो आज मला चांगला पंधरा मिनिटं उशिरा मिळाला.’’

मोकाशींवरच्या घनघोर अन्यायाबद्दल च् च् असा आवाज करत आम्ही सर्व आजोबांनी सहानुभूती अधिक निषेध व्यक्त केला.

परब म्हणाले, ‘‘या आजच्या पोरींना वेळेचं महत्त्व म्हणून नाही. पंधरा मिनिटे म्हणजे चक्क नऊशे सेकंद. बरं, उशीर का म्हणून विचारायची सोय नाही. डबे तयार करायचे असतात, ही नेहमीची सबब ठरलेली आहे. आम्ही तीस-पस्तीस र्वष नोकऱ्या केल्या आहेत म्हटलं! आम्ही जेवणाचे डबे घेऊनच जात होतो. त्या वर्षांची सेकंद करा. म्हणजे आमच्या नोकरीचं महत्त्व समजेल.’’

ओकांनी दु:खाची फुलं करण्याचा उपाय सुचवला, ‘‘मोकाशी, ज्येष्ठत्वाचं ढोंग निभावण्याकरिता, चहा पंधरा मिनिटं उशिरा मिळाला या कारणावरून आपण सुनेला काही बोलू शकत नाही; पण न बोलता, आपण त्यांना अद्दल घडवू शकतो.’’

‘‘कशी? कशी?’’ मोकाशी उत्सुक होते.

‘‘आपण सर्वानी फक्त पंचाऐंशी वर्षांपर्यंत म्हणजे या वर्षअखेर जगायचं असं ऐंशीव्या वर्षी ठरवलं होतं; पण आता आपण इहलोकीचं आपलं अवतारकार्य नव्वद वर्षांपर्यंत म्हणजे आणखी पाच र्वष वाढवू. तुमच्या वंृदाला पंधरा मिनिटांच्या उशिरासाठी, पुढील पाच र्वष, दुसरा चहा करण्याची शिक्षा, तिच्या नकळत ठोठावू.’’

मोकाशी, परब व ओक यांनी गुपचूप, या कानाचा त्या कानाला पत्ता लागू न देता, पुढील पाच वर्षे, दुसरा चहा आपापल्या सुनांवर लादला!

आजोबा बागेत जमतात ते अशा प्रकारे दु:खांची फुले करण्याकरिता. आजोबांची ही गरज आहे असं मला दुसऱ्या दिवशी परबांनी तोंड उघडेपर्यंत वाटत होते.

परब म्हणाले, ‘‘आणखी पाच वर्षे जगण्याचा आपला कालचा संकल्प ठीक आहे; पण आपल्या सुनांना, आणखी पाच वर्षे दुसरा चहा करण्याची तसदी पडावी म्हणजे सुनांना पीडा व्हावी हा हेतू योग्य नाही. हे पाप आहे. मी तुमच्याबरोबर नाही.’’

परबांचा हा पराभवाचा पवित्रा मला मुळीच आवडला नाही. मी स्पष्टपणे म्हणालो,

‘‘मोकाशी घराण्यात माघार घेण्याची रीत नाही.’’

ओक म्हणाले, ‘‘मोकाशी, परबांचे म्हणणे ऐकून तरी घ्या.’’

ओकांच्या या कमकुवतपणामुळंच परबांची संतवृत्ती फोफावली आहे. मी नाइलाजाने म्हणालो, ‘‘परब, सुनांना गुप्तपणे धडा शिकवण्यात चूक काय, नव्हे पाप काय, ते समजावून सांगा.’’

‘‘तुकोबांनी पाप-पुण्याची सोपी व्याख्या केली आहे. ‘पुण्य परउपकार, पाप ते परपीडा। आणिक नाही जोडा दुजा यासी॥’ पुण्य पुण्य म्हणजे काय? तर लोकांवर उपकार करणं. लोकांना त्रास देणं म्हणजे पाप. ‘तुका म्हणे, उघडे आहे हित, घात। जयाचे उचित करा तैसे॥’ दुसऱ्याला हितकारक काय व त्रासदायक काय हे आपल्या मनाला कळत असते. उचित ते आपण करावे.’’

मी परबांशी, माझ्याकडं एकही मुद्दा नसताना वाद घालू शकतो; पण परब संत तुकोबांना मध्ये आणतात. तुकोबांच्या विरुद्ध बोलणं म्हणजे मंबाजी होणं; मला मंबाजीपण नको. मी आशेने ओकांकडे पाहिलं. ओक मला परबांविरुद्ध लढण्यासाठी संस्कृतातून मदत पुरवतात.

ओक म्हणाले, ‘‘परब बरोबर सांगताहेत. ‘न तत् परस्य संदध्यात् प्रतिकूलम् यत् आत्मन:। एष: संक्षेपत: धर्म: कामात् अन्य: प्रवर्तते॥’ अर्थ सांगतो, मोकाशींना संस्कृत वज्र्य आहे. आपणास जे आवडत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत करू नये. धर्मानं वागणं म्हणतात ते थोडक्यात असं आहे. याहून वेगळं वर्तन स्वार्थापोटी घडत असतं.’’

ओक माझ्या बाजूनं नाहीत, विरुद्ध आहेत हे मला स्पष्ट झालं.

परब म्हणाले, ‘‘मोकाशी, आपल्या मुली आज त्यांच्या त्यांच्या संसारात व्यस्त आहेत. त्यांना आपल्याच वयाचे सासरे आहेत. आपल्या व्याह्य़ांनी भरपूर जगावं, त्यांनी आपल्या सुनांना म्हणजे मुलींना छळण्यासाठी जास्त जगू नये, आशीर्वाद देण्यासाठी जगावं असं आपल्याला वाटतं. होय की नाही? तुमच्या वासंतीवर दुसऱ्या चहाचा बोजा पडावा या दुष्ट हेतूनं तुमचे व्याही जगत राहिले तर ते तुम्हाला आवडेल?’’

वासंती मोकाशी-देशिंगकर या माझ्या संसारी, प्रौढ कन्येच्या आठवणीनं मी गलबललो. संतप्रेमी परब व संस्कृतभक्त ओक योग्य बोलतात. मला लगेच पटलं.

बागेतून परतल्यावर मी सुनेला म्हणालो, ‘‘वृंदा, मला यापुढे सकाळी दुसरा चहा मुळीच नको. मी आणखी पाच वर्षे जगून तुला मदत करणार.’’

वृंदा म्हणाली, ‘‘नाना, काही तरी काय बोलताय? तुम्ही शंभरी पुरी करा. सकाळचा पहिला ‘पाणचट’ चहा तुम्ही सर्वाबरोबर आमच्या प्रेमापोटी घेता हे मला माहीत आहे. दुसरा पूर्ण दुधाचा हाच तुमचा पहिला चहा आहे. तो तुम्ही घेत राहा. सकाळच्या गडबडीत मला तुमची वेळ सांभाळता येत नाही, तुम्ही मला सांभाळून घ्या.’’

भा.ल. महाबळ

chaturang@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 3:44 am

Web Title: article by bl mahabal
Next Stories
1 मत कोणाला?
2 मोठ्ठी आई
3 बाळ मातेपुढे नाचे!
Just Now!
X