News Flash

एक विठ्ठल आधार!

‘‘शरयू संत? शाळेत, पाचवीपासून अकरावीपर्यंत आपल्या वर्गात होती ती?’’

‘‘आपल्या उद्यानात आता शरयू संत आहे, उद्यान त्यामुळे छान फुलले आहे.’’ मोकाशींनी (वय ८३) खालच्या आवाजात ही बातमी थेट ओकांच्या (वय ८४) कानात टाकली.

‘‘शरयू संत? शाळेत, पाचवीपासून अकरावीपर्यंत आपल्या वर्गात होती ती?’’ ओक कुजबुजले.

परब म्हणाले, ‘‘कुजबुजता कशासाठी? दवंडी पिटावी अशी ही घटना आहे. ‘संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे॥ बहु दुधड जरी झाली म्हैसगाय। तरी होईल काय कामधेनू॥ तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण। तरीच महिमान येईल कळो॥’ मोकाशी, ओक, मलापण तुमच्या त्या संत मित्राकडे घेऊन चला. संतांचा मोठेपणा शब्दांत पकडता येणार नाही. भरपूर दूध देणाऱ्या गायीम्हशी खूप असतात, पण कामधेनू ती कामधेनू. संत होण्याची खटपट आपण करावी, म्हणजे संतपण अंगी आणणं किती कठीण आहे हे समजेल.’’

आमच्या बोलण्यातील फक्त संत एवढाच शब्द परबांना ऐकू आला का पूर्ण नाव? खात्री करून घेण्याकरता मी विचारलं, ‘‘परब, यात दवंडी पिटावं असं काय आहे? तुम्ही संतांचा अभंग का म्हणालात?’’

निष्पाप परब म्हणाले, ‘‘तुम्ही तुमचा कोणी संत मित्र बागेत आहे, असं म्हणाला म्हणून.’’

उद्यानातील शरयू संतकडे जायचं म्हणजे प्रथम परबांना कटवणं भाग होतं. उद्यानात येताना, माझ्या जवळ एक मोकळी, नवी दिसणारी पिशवी असते. तीत एक एक जुना नॅपकिन असतो. पिशवीही तशी जुनीच आहे, पण सहा वर्षांपूर्वीच्या नॅपकिनच्या तुलनेत चार वर्षांची जुनी पिशवी मला नवी दिसते. मी ती पिशवी परबांजवळ सोडली व म्हणालो, ‘‘ओक व मी फेरी मारून संताचा शोध घेतो. त्याला घेऊन इकडं येतो. माझ्या पिशवीकडं लक्ष द्या. विठ्ठल स्मरणात पिशवीचं विस्मरण होऊ देऊ नका.’’

परबांनी माझी मौल्यवान पिशवी हातानं जवळ ओढली, मानेनं आम्हाला दोघांना ‘जा’ म्हणून सांगितलं व तोंडानं, ‘विठ्ठल, विठ्ठल मंत्र सोपा।

करी पापा निर्मूळ॥ हा अभंग उच्चारला.

शाळेतील मैत्रिणीला भेटायला जाण्यात पाप कोणतं? माझ्या मनाला लागेल असं काहीतरी तुकोबांचं वचन परबांना नेमकं कसं काय आठवतं?

मी ओकांना थेट शरयू संतपुढे उभं केलं. मी कृत्रिम सहजपणे म्हणालो, ‘‘नमस्कार, शरयू संत, नमस्कार. तुम्ही आमच्या उद्यानात कशा काय?’’

शरयू आजी चमकल्या. स्वत:ला सावरत त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखलं नाही.’’

ओकांनी खुलासा केला, ‘‘आम्ही दोघं हायस्कूलमध्ये तुमच्या वर्गात होतो. मी ‘संस्कृत’ ओक, हे मोकाशी.’’

‘‘बाई गं! तुम्ही ओक व मोकाशी? किती बदलला आहात!’’ शरयू आजी हसल्या.

आम्हा दोघांना शरयू आजींचा गोंधळ समजला. आमच्या डोक्यांवर तुरळक केस उरले होते, तोंडात दातांच्या कवळ्या बसल्या होत्या, डोळ्यांवर चष्मे चढले होते, गाल सुरकुतले होते. आम्ही पक्के म्हातारे झालो होतो. नावं – आडनावं सोडली तर आम्ही पूर्ण वेगळे दिसत होतो. पण शरयू संत ही आमची शाळामैत्रीण अत्यंत अलगदपणे आजी झाली होती. म्हणून तर मी तिला सहजपणे ओळखू शकलो होतो! शाळकरी वयातील, तिच्या चेहऱ्यावरचा गोडवा, गालावरच्या खळ्या, शेलाटा बांधा आजीपणातही कायम होता. वार्धक्याच्या वादळानं ओकांचं व माझं बरंच शारीरिक नुकसान झालं होतं, पण शरयूला इजा करण्याचं क्रूर कर्म वादळानं केलं नव्हतं.

शरयू आजींच्या चेहऱ्यावर शाळकरी मिश्कीलपणा कायम होता. त्यांनी मला विचारलं, ‘‘मोकाशी, बंगला बांधलात का? कोणती कार विकत घेतलीत?’’

मी काहीच बोललो नाही. शरयूनं ओकांकडं मोर्चा वळवला, ‘‘अनघ्र्यम् अपि माणिक्यम् हेमाश्रयम् अपेक्षते।’ आणि ‘काच: काच: मणि: मणि:।’ हे श्लोकाचरण मी कृतज्ञतेने आठवते.’’

ओक नुसते हसले. थोडा वेळ ओक व शरयू बोलले. मी ऐकत होतो. बोलण्यातून समजलं की, ‘शरयू संत आता सौ. शरयू खांबेटे आहेत. त्यांची नात व तिचा नवरा  मुलुंडमध्ये स्थायिक झाले आहेत म्हणून शरयू चार दिवसांसाठी आली आहे. उद्या ती सातारला परतणार आहे.  खांबेटे घरी एकटे आहेत.’

परतताना ओकांनी मला विचारलं, ‘‘मोकाशी, शरयूनं तुम्हाला विचारलेला कार – बंगल्यावरचा प्रश्न मला बोचरा वाटला. शरयूनं असा प्रश्न का विचारावा? मला तो अयोग्य वाटला. या प्रश्नाचा शाळेतील दिवसांशी काही संबंध आहे का?’’

शरयूचा प्रश्न मला काटय़ाप्रमाणे रुतला होता. ओकांच्या बोलण्यात मला सहानुभूतीचा ओलावा दिसला. मी फसलो. मी सांगू लागलो, ‘‘ओक, शाळेनं अकारावीच्या आपणा विद्यार्थ्यांना सेंड ऑफ दिला. मी त्या शेवटच्या दिवशी शरयूजवळ माझं प्रेम व्यक्त केलं. मी म्हणालो, ‘‘तू खूप देखणी आहेस. तुझे वडील डॉक्टर आहेत. तुमचा बंगला आहे. आम्ही परिस्थितीनं  सामान्य आहोत. तू माझ्याशी आज लग्न कर, असं म्हणणार नाही. मात्र तू मला थोडा वेळ दे. मी कर्तबगार आहे. मी शिक्षण पूर्ण करीन, बंगला बांधीन, कार विकत घेईन व कारमध्ये बसून तुला मागणी घालायला येईन. तू माझी वाट पाहा.’ ओक, त्यावर शरयू नुसतं हसली. काहीच बोलली नाही. पुढं तिनं सातारच्या, लष्करात नोकरी करणाऱ्या कोणा मेजरशी विवाह केला. माझ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. बंगला बांधणं, मोटार विकत घेणं यात मला काहीही रुची उरली नाही. माझ्यासारख्या कर्तबगार व्यक्तीच्या मनाचं उद्यान शरयूनं उद्ध्वस्त केलं. तरीही शाळेतील मैत्रीपोटी मी तुम्हाला घेऊन तिला भेटायला गेलो. शरयूनं काय केलं? तिनं मला डिवचणारा प्रश्न विचारला! मी पाचशे चौरस फुटांच्या ब्लॉकमध्ये राहतो आणि माझ्याकडे स्कूटरही नाही ही बातमी तिच्यापर्यंत पोचली असणार!’’

ओक गप्प राहिले. मी बंगला का बांधला नाही याबाबत मी केलेला खुलासा ओकांना पटला नसणार! ओकांना अडचणीत आणण्याकरता मी मुद्दाम विचारलं, ‘‘शरयू संस्कृतात तुमच्याशी काहीतरी बोलली. तुम्ही शिकवलेले दोन श्लोक कृतज्ञतेने आठवते, असं ती म्हणाली. या दोन श्लोकांची काय गोम आहे?’’

‘‘मोकाशी, अण्णा संत माझ्या वडिलांना म्हणाले, ‘तुमच्या मुलाचं संस्कृत चांगलं आहे, असं शरयू म्हणत होती. तुमचे चिरंजीव शरयूला संस्कृत शिकवतील का?’ बाबांनी मला शरयूबरोबर संस्कृतचा अभ्यास कर म्हणून सांगितलं. एकत्र अभ्यास करता करता शरयू माझ्यात गुंतते आहे हे माझ्या ध्यानी आलं. मी शरयूला समजावलं, ‘‘तुझ्या वडिलांचा व माझ्या वडिलांचा आपणा दोघांवर विश्वास आहे. आपण फक्त संस्कृतच शिकू, प्रेम वगैरे काही करणार नाही. तू श्रीमंत आहेस, रूपवती आहेस. तुझ्या आईवडिलांच्या जावयाविषयी काही अपेक्षा आहेत. मी त्यामध्ये बसणारा नाही. मी माझी पात्रता ओळखतो. मी काच आहे, तू रत्न आहेस. चमकदारपणा हे बाह्य़ लक्षणच काय ते दोहोत समान आहे, प्रत्यक्षात, ‘काच: काच: मणि: मणि:।’ हे सत्य आहे. माणिक हे श्रेष्ठ रत्न आहे, म्हणून ते हलक्या किमतीचं तांबे – पितळेचे कोंदण थोडंच स्वीकारतं? ‘अनघ्र्यम् अपि माणिक्यम् हेमाश्रयम् अपेक्षते।’. माणिक हीन कोंदण स्वीकारत नाही, कोंदणाकरता त्याला सोनंच हवं असतं.’’

ओक व मी परबांजवळ आलो. काही न बोलता मी, माझ्या लायकीची माझी किमती पिशवी परबांकडून घेतली. परब ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणाले, मीही म्हणालो. मला आज विठ्ठलाचा आधार हवा होता, ‘माझं व्यंग जाणणाऱ्या’ ओकांचा नको होता.

भा.ल. महाबळ

chaturang@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 1:37 am

Web Title: b l mahabal loksatta chaturang marathi articles part 4
Next Stories
1 पावसाळा
2 चष्मा
3 उलटलेली चौकशी
Just Now!
X