वसई-विरार महापालिकेचे सर्वेक्षण सुरू

विरार : मागील वर्षीपासून कोविड वैश्विक महामारीमुळे बोगस डॉक्टरांवरील कारवाई मंदावली होती. पण या वर्षी कोविड प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा पालिका वैद्यकीय विभागाने आपला मोर्चा बोगस डॉक्टरांकडे वळवला आहे. पालिकेकडून शहरातील नोंदणी आणि नोंदणी नसलेल्या डॉक्टरांचे आणि त्यांच्या दवाखान्याचे सर्वेक्षण सुरु झाले आहे.    सध्या पालिकेच्या यादीत केवळ ११२३ दवाखान्यांची नोंदणी झाली आहे.

पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार पालिकेने आतापर्यंत ६२ डॉक्टरांवर कारवाई केली आहे. यात मागच्या महिन्यातच नालासोपारा येथील एका डॉक्टरवर पालिकेने कारवाई करत त्याचा दवाखाना बंद केला होता. कोविड १९ काळात पालिकेकडून बोगस डॉक्टरांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने शहरात बोगस डॉक्टरांची संख्या झपाटय़ाने वाढत गेली.  त्यात पावसाळा असल्याने अनेक बोगस डॉक्टर आपली दुकाने थाटात आहेत. डॉक्टर खेडय़ापाडय़ात. चाळीत बिनदिक्कत कोणतेही परवाने न घेता आपले दवाखाने सुरू करत आहेत. सामान्य भांडवल गुंतवून हे दवाखाने सुरू करून रुग्णांवर उपचार करून त्यांच्या आरोग्याशी खेळतात. पण पालिका प्रशासन मनुष्यबळ आणि पोलीस संरक्षण देत मिळत नसल्याने कारवाई करत नव्हती. शहरात मोठय़ा प्रमाणात विनापरवाने नसतानाही दवाखाने सुरू असताना पालिकेने महापलिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याची टीका होत आहे.

क्लिनिकल इस्टाब्लिशमेंट अ‍ॅक्ट २०१० यावर अजूनही शासनाकडून कोणताही निर्णय झाला नसल्याने पालिकेत दवाखाने नोंदणी सक्ती पालिकेला करता येत नाही. तसेच नोंदणी प्रक्रिया मोठी  खर्चीक बाब असून त्यानंतरसुद्धा जैविक कचरा आणि इतर सर्व माहिती पालिकेला द्यावी लागत असल्याने अनेक डॉक्टर पालिकेकडे आपल्या दवाखान्याची नोंदणी करत नाहीत. यामुळे अनेक बोगस डॉक्टरांचे फावले जात आहे. पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी बोगस डॉक्टरांचा विषय गांभीर्याने घेतला असून लवकरच अशा डॉक्टरांवर पालिका कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ कोविडकाळात पालिका आरोग्य कर्मचारी मर्यादेपेक्षा अधिक व्यस्त असल्याने ही कारवाई मंदावली होती. पण आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा पालिका सक्रिय होऊन कारवाई करणार आहे.