पर्यावरणपूरक देखाव्यातून गणेशभक्तांना सामाजिक संदेश

कल्पेश भोईर
वसई : दरवर्षी दणक्यात साजरा होणारा गणेशोत्सव यंदाही करोनाच्या संकटामुळे अगदी साधेपणाने साजरा होत आहे. असे असले तरी अनेक कलाकारांनी आपल्या घरी गणपतीसाठी विविध प्रकारचे सामाजिक संदेश देणारे पर्यावरणपूरक देखावे साकारले आहेत, तर दुसरीकडे करोनामुळे बाजारात सजावटीसाठी लागणारे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने अनेकांनी आपल्या घरच्या घरी जे काही साहित्य उपलब्ध आहे त्यातच आकर्षक असे देखावे साकारले आहेत.

वसई तालुक्यातील नायगाव पूर्वेतील जूचंद्र गाव हे ज्या प्रमाणे रांगोळी या कलेमध्ये प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे इतर कलाकृतीमध्येही येथील कलाकारांचे वैशिष्टय़ आहे. त्यातीलच अमित भोईर या कलाकाराने या वर्षी करोनासारख्या महासाथीवर आधारित देखावा तयार केला आहे. करोनाच्या संकटामुळे देशात काय काय घडले व त्यातून आपण काय शिकलो असे विविध प्रकारचे संदेश त्यांनी दिले आहेत. करोनाच्या महासाथीपासून कसे वाचले पाहिजे यासाठी मुखपट्टी, ‘सॅनिटायझर’च्या बाटल्या ठेवल्या आहेत. एकूण ९० विविध रंगांच्या मास्कचा वापर केला आहे. तसेच कागदी पुठ्ठय़ावर विविध चित्रपटांची नावे लिहिली आहेत.

त्यात ‘लयभारी’, ‘टकाटक’, ‘बकेट लिस्ट’, ‘हिरकणी’, ‘प्रवास’ अशा नावातून करोनाच्या काळातील पोलीस, डॉक्टर, आरोग्यसेवक करीत असलेल्या कार्याचे कौतुक व नागरिकांनी करोनापासून बचावासाठी काय केले पाहिजे असे संदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मितेश पाटील या कलाकाराने पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या वारली संस्कृतीचे दर्शन या गणेशोत्सवात घडविले आहे. वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील कोकण विभागातील वारली या आदिवासी जमातीची वैशिष्टय़पूर्ण चित्रशैली आहे.

डहाणू आणि पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या वारली जनजातींचे राहणीमान व त्यांची जगभर प्रसिद्ध असलेली चित्रे कागदी पुठ्ठा व रंग याचा वापर करून तयार करण्यात आली आहेत. यामध्ये गेरूने सारवलेल्या भिंतींवर तांदळाच्या पांढऱ्या पिठाने साधे व सुबक आकार रंगवण्याची पद्धत, तारपा हे पारंपरिक वाद्य वाजविणारा पुरुष मध्यभागी उभा असून त्याच्याभोवती गोलाकार रचनेत नृत्य करणारे महिला व पुरुष याखेरीज वारली जनजातीच्या देवी-देवता, शेती, शिक्षण, घर, धान्याचे कोठार, पशु, पक्षी, विविध कामे करणारे महिला-पुरुष, बैलगाडी अशी वारली जीवनाशी संबंधित कलाकुसर मितेश पाटील याने केली आहे. तर नेहा म्हात्रे हिनेसुद्धा घरीच उपलब्ध असलेल्या जुन्या बांगडय़ा व विविध रंगाचे धागे यांचा वापर करून पर्यावरणपूरक सजावट केली आहे. यंदाच्या वर्षी बाजारात नव्याने काही साहित्य मिळाले नसल्याने जयेश राऊत यांनी घरच्या बांबूचा वापर करून सुबक असा देखावा साकारला आहे.

पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य

यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने अनेकांनी पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य दिले आहे. दरवर्षी बाजारात जाऊन विविध वस्तूंची खरेदी करून सजावट केली जाते. परंतु या वर्षी बाजारातही जुनेच साहित्य उपलब्ध असल्याने घरी जे साहित्य आहे त्याच वापर करून सजावट केली आहे, तर काही कलाकारांनी घराच्या घरी मातीच्या मूर्त्यांही तयार करून गणेशोत्सव साजरा केला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांंपासून साजरा होणाऱ्या उत्सवातून निसर्गसंवर्धनासाठी प्रयत्न होताना दिसून येत आहे.