वसई- वसई विरार शहर परिसरातील ६९ गावांना लवकरच सुर्या पाणी प्रकल्पातील अतिरिक्त पाणी मिळणार आहे. सुर्या प्रकल्पाच्या जलवाहिन्या वसईपर्यंत टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने १४० दशलक्ष लिटर्स पाणी उपलब्ध होणार आहे. याशिवाय गावांमध्ये जलवाहिन्या अंथरण्यात आल्या असून जलदाब चाचणी सुरू आहे. यामुळे पुढील काही दिवसात वसईच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना पाणी मिळणार आहे.

वसई विरार महापालिका क्षेत्र तसेच परिसरातील ६९ गावांना सुर्या प्रकल्पातील पाणी मिळत नव्हते. त्यांना विहिरी सारख्या नैसर्गिक पाणी स्त्रोतांवर अवलंबून रहावे लागत होते. ६९ गावांसाठी २००८ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारे नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी योजना आखण्यात होती मात्र १५ वर्ष होऊनही परंतु ६९ गावातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नव्हते. या गावांना पाणी देण्याची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पालिकेकडे वर्ग करण्यात आली होती. मात्र पालिकेकडेच पाणी पुरेस नसल्याने गावांचा पाणी प्रश्न कायम होता. या गावांसाठी पुर्वी महाराष्ट्र जीनव प्राधिकरणाकडून अंथरण्यात आलेल्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या होत्या तसेच २०१२ साली उभारलेल्या पाण्याच्या रिकाम्या जलकुंभांची अवस्था बिकट झाली होती. पालिकेने ही योजना ताब्यात घेऊन पाणी वितरणासाठी काम हाती घेतले होते या  ६९ गावांपेैकी २६ गावांना पाणी देण्यात येत होते.  उर्वरित ४३ गावांच्या पाण्याचा प्रश्न होता. या गावात टाकण्यात आलेल्या ज्या जलवाहिन्या जीर्ण आणि तुटल्या होत्या. त्या दुरूस्त करण्यात आल्या आहेत.  तसेच जुन्या जलकुंभांचे संरचनात्मक लेखापरिक्षण ते दुरूस्त करण्यात आले आहे. वसई विरार शहराला सुर्या पाणी प्रकल्पातून अतिरिक्त १६५ दशलक्ष लिटर्स पाणी मंजूर झाले आहे. त्यापैकी सध्या १०० दशलक्ष लिटर्स पाणी शहराला मिळत आहे. त्यामुळे आता या ४३ गावांना लवकरच पाणी पुरवठा केला जाणार आहे. सध्या आम्ही वसईच्या पश्चिम पट्‌ट्यातील वटार आणि इतर गावांना पाणी देण्याची चाचणी करत आहोत.

हेही वाचा >>>वसईकरांना पालिकेतून ५१ सेवा मिळणार ऑनलाईन; वेळेची बचत आणि कामात पारदर्शकपणा

१४० दशलक्ष लिटर्स पाणि मिळणार

सध्या सुर्या पाणी प्रकल्पाच्या योजनेतून १६५ दशलक्ष लिटर्स पैकी १०० दशलक्ष लिटर्स पाणी मिळत आहे. काशिदकोपर पासून वसई फाट्यापर्यंत जलवाहिन्या अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १४० दशलक्ष लिटर्स पर्यत पाणी घेता येईल, असे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

१७ पैकी १५ जलकुंभ पूर्ण

पाण्याचे वितरण करण्यासाठी पालिकेने अमृत योजनेअंतर्गत एकूण १७ जलकुंभ उभारले होते. त्यापैकी १५ जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २ जलकुंभाचे किरकोळ काम बाकी असून ते देखील लवकरच पूर्ण होणार आहे.

हेही वाचा >>>वसई भाईंदर रोरो सेवेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद; प्रवासी कर माफ केल्याने वर्षभर वाजवी दरात सेवा

राज्य शासनाकडून भरीव तरतूद

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच्या ४ महिन्यांचे लेखानुदान सादर कऱण्यात आले. या अर्थसंकल्पता पाणी पुरवठा आणि स्वच्छता यासाठी तब्बल ३ हजार ८०० कोटी रुपयांची भरीव तरतुदी करण्यात आली आहे. त्यामुळे वसई विरार शहराच्या प्रस्तावित खोलसापाजा, देहरर्जी आदी धरणांच्या कामाना खर्‍या अर्थाने गती मिळणार आहे.

संध्या वसई विरार शहराला मिळणारा पाणी पुरवठा

वसई – विरार शहराला सूर्या, उसगाव आणि पेल्हार या तीन धरणातून पाणीपुरवठा होतो. या तिन्ही धरणातू शहराला दररोज २३० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत असतो. सुर्या पाणी प्रकल्पाच्या योजनेतून एमएमआरडीएतर्फे १६५ दशलक्ष लिटर्स पाणी मंजूर असून सध्या १०० दशलक्ष लिटर्स पाणी येत आहे. परंतु वाढत्या लोकसंख्यामुळे शहरातला ३७२ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. सध्या शहराला दररोज १४२ दशलक्ष लिटर्स पाण्याची तूट भेडसावत आहे.