अंगावर वाघासारखे पट्टे रंगवण्याचा अमानुष प्रकार

वसई :  सर्वसामान्य नागरिकांना भटक्या श्वानाची दहशत असते. मात्र वसई शहरात भटक्या श्वानांमध्येच एक दहशत पसरली आहे. ही दहशत आहे एका वाघसदृश श्वानाची. वाघासारखा दिसणाऱ्या श्वानाला पाहून इतर श्वान धूम ठोकत आहेत. या श्वानाच्या अंगावर कोणीतरी वाघासारखे पट्टे रंगवण्याचा अमानुष प्रकार केला आहे. 

दोन दिवसांपूर्वी गोरेगाव आरे कॉलनीत बिबटय़ाच्या हल्ल्यात महिला जखमी झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. त्या घटनेनंतर वसईत या  श्वानाच्या अंगावर वाघासारखे पट्टे रंगवल्यामुळे   त्याची दहशत माणसांवर नव्हे तर भटक्या श्वानांवर पसरली आहे. वाघासारखे पट्टे असल्यामुळे त्याला अचानक पाहून नागरिकांमध्ये भीतीने धडकी भरत आहे.

वसईत नाळे परिसरात या श्वानाच्या अंगावर कोणीतरी वाघासारखे काळय़ा रंगाचे पट्टे रंगवले आहेत. त्यामुळे तो हुबेहूब वाघासारखा दिसू लागला आहे. हा भटका श्वान असल्याने त्याचा वावर रस्त्यावर असतो. पण त्याला पाहून इतर भटकी श्वान घाबरू लागली आहे. एरवी आपल्या भागात एखादा पाळीव किंवा बाहेरील श्वान आला की इतर श्वान त्याच्यावर भुंकत असतात. मात्र या वाघ्या श्वानाला पाहून इतर श्वान धूम ठोकत असल्याची माहिती नाळे गावातील रहिवासी मनीष म्हात्रे यांनी दिली.

रात्री अंगावर वाघासारखे पट्टे असलेला हा श्वान पाहिल्यास वाघासारखा भास होतो. त्यामुळे परिसरात अनोळखी व्यक्तीला भीती वाटते. भटक्या गुरांनाही या वाघ्या श्वानाचा धसका घेतला आहे.

विरार पश्चिमेच्या बोळिंज परिसरात सहा महिन्यांपूर्वी जंगली श्वापद आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. वन विभागाने घेतलेल्या शोधमोहिमेनंतर तरस असल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, असा प्रकार करणे हा घृणास्पद असल्याचे  प्राणीमित्रांकडून सांगण्यात आले आहे.

‘कारवाई होणे गरजेचे’

प्राण्यावर कुठल्याही प्रकारचा रंग लावणे किंवा त्यांच्या शरीराला अपाय होईल अशी कुठलीही कृती करणे बेकायदा आहे. या श्वानाला लावलेला रंग हा अमानुष प्रकार आहे. यामुळे श्वानाला इजा होण्याची शक्यता आहे. संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी वसईतील प्राणीमित्रांनी केली आहे.