scorecardresearch

समय चौहान हत्या प्रकरणात गँगस्टर सुभाष सिंग ठाकूरचा सहभाग; विरारमध्ये आणण्यासाठी गुन्हे शाखेकडून उत्तर प्रदेश न्यायालयात अटक वॉरंट सादर

विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात कुख्यात अंडरवल्र्ड डॉन सुभाष सिंग ठाकूर यांचा सहभाग आढळून आला असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

वसई: विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात कुख्यात अंडरवल्र्ड डॉन सुभाष सिंग ठाकूर यांचा सहभाग आढळून आला असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला विरारमध्ये आणण्यासाठी गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश न्यायालयात अटक वॉरंट सादर केले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
समय चौहान याची हत्या अंडरवल्र्ड डॉन आणि सध्या उत्तर प्रदेशच्या तुरुंगात असणारा गॅंगस्टर सुभाष सिंग ठाकूर यांच्या सांगण्यावरून झाली असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सुभाष सिंग ठाकूर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला आरोपी बनवले आहे. या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्यासाठी गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशच्या न्यायालयात अटक वॉरंट सादर केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत तेरा आरोपींना अटक करण्यात आली असून या सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुभाष सिंग ठाकूर याला विरारमध्ये आणण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली
आरोपी वापरायचे इमो कॉल
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल एक कोटी कॉलचा ‘डंप डेटा’ काढला होता. त्यापैकी एक हजार कॉलची पोलिसांनी पडताळणी केली. मात्र हाती काही लागले नाही, कारण हे सर्व मारेकरी ‘इमो’ कॉल वापरत होते. इमो कॉल वापरत असल्याने त्यांचा कुठलाही ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची २ हजार छायाचित्रे असलेली भित्तिपत्रके सर्व ठिकाणी लावण्यात आली होती. या छायाचित्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली आणि पोलिसांनी उत्तर प्रदेश गाठून आरोपींचा माग घेतला. संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी वसई-विरारमधील तब्बल दोन हजार घरे पालथी घालून शोध घेतला होता.
आतापर्यंतची सर्वात मोठी शोधमोहीम
समय चव्हाण याचे हत्या प्रकरण पोलिसांसाठी सर्वात मोठे आव्हान होते. यासाठी गुन्हे शाखेने ६० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष पथक बनवले होते. आतापर्यंतची ही सर्वात मोठी शोधमोहीम आणि आव्हानात्मक काम असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खंडणी नाकारली म्हणून हत्या
उत्तर प्रदेशच्या तुरुंगात असलेला सुभाष सिंग ठाकूर वसई-विरारमधल्या बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी उकळत होता. मृत समय चौहान विरारच्या एका पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत ११ इमारती बांधत होता त्यासाठी प्रत्येक इमारतीमागे २५ लाखांची खंडणी ठाकूर याने मागितली होती. मात्र समयने त्याला नकार दिला होता. यामुळे त्याने हत्या करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gangster subhash singh thakur maharashtra state river conservation chauhan murder case crime branch arrest warrant uttar pradesh court virar amy

ताज्या बातम्या