लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : नालासोपारामध्ये एका बेकरी चालकाकडून परिसरातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता पर्यंत ४ मुलींनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. तुळींज पोलिसांनी बेकरी चालकाला अटक केली आहे. त्याने आणखी मुलींसोबत गैरप्रकार केले आहेत का, त्याचा पोलीस तपास करत आहेत.

नालासोपारा पूर्वेच्या नगिनदास पाडा येथील रेहमत नगर मघ्ये आरोपी अफजल हुसैन अली (३३) याची सितारा नावाची बेकरी आहे. या बेकरीत परिसरातील मुली खरेदीसाठी येत असताना अली त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. याबाबत एका पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले की, सोमवारी जेव्हा तिची मुलगी केक खरेदी करून घरी परतली तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितले. बेकरीच्या मालकाने तिला दुकानात बोलावले आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. पीडितेच्या आईने परिसरातील अन्य महिलांना या प्रकाराबाबत सांगितले. तेव्हा आणखी ३ महिला पुढे आल्या. त्यांच्या मुलींसोबतही बेकरी चालक अफजल अली याने गैरप्रकार केले होते. त्यानंतर चारही महिलांनी तुळींज पोलीस आरोपीविरुद्ध तक्रार दिली.

आणखी वाचा-वसई : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू

आरोपी अफजल हुसैन अली (३३) हा सितारा बेकरीचा मालक आहे. ४ महिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे तुळींज पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सोच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अलीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अली याने या परिसरातील इतर मुलींसोबत असे गैरप्रकार केले आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.