लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : सांडपाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या एका सफाई कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला आहे. वसईच्या चिंचपाडा येथे ही दुर्घटना घडली आहे. अवघ्या आठवड्याभरापूर्वीच विरार येथे सांडपाणी प्रकल्पाच्या टाकीत गुदमरून ४ कामगरांचा मृत्यू झाला होता.

वसई पूर्वेच्या चिंचपाडा येथे एव्हरशाईन इंडस्ट्री आहे. येथील सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी दुपारी तिरूपती भुट्टे (३३) या सफाई कामगाराला बोलाण्यात आले होते. दुपारी ३ च्या सुमारास कुठल्याही सुरक्षेच्या साधनाशिवाय तो टाकीत उतरला होता. मात्र टाकीतील विषारी वायूमुळे त्याचा श्वास गुदमरून तो बेशुध्द झाला. त्याला उपचारासाठी आधी आयकॉन या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर प्रकृती खालावल्याने पालिकेच्या सर डी.एम.पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला.

आणखी वाचा-भाईंदर मध्ये स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी

या प्रकरणी वालीव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आम्ही या प्रकऱणी तपास करत असून त्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी दराडे यांनी दिली. शौचालये आणि सांडपाण्याची टाकी खासगी व्यक्तींकडून साफ करण्यास बंदी असून असे करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येतो.

९ एप्रिल रोजी विरारच्या ग्लोबल सिटी येथे खासगी सांडपाणी प्रकल्पाची सफाई करणार्‍यासाठी उतरलेल्या शुभम पारकर (२८), अमोल घाटाळ (२७) निखिल घाटाळ (२४) आणि सागर तांडेलकर (२९) या चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. मात्र एवढी मोठी घटना घडल्यानंतरही हा प्रकार सुरूच होता आणि आठवड्याभराच्या अंतराने आणखी एका कामगाराला आपली जीव गमवावा लागला.