ऐतिहासिक वास्तूच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

भाईंदर :  उत्तन येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या ऐतिहासिक  ‘जंजिरे धारावी’  किल्ल्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दुल्ल्याचा वावर वाढल्यामुळे दारूच्या बाटल्यांसह अमली पदार्थ आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे किल्ल्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाईंदर पश्चिम येथील उत्तन भागात धारावी मंदिरापुढे  समुद्रकिनारी  ‘जंजिरे धारावी’ हा किल्ला आहे. चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्यावर मिळवलेल्या विजयामध्ये या मोठे योगदान आहे. वसई किल्ला आणि जंजिरे धारावी किल्ला समोरासमोर असल्याने पोर्तुगीजांची जलमार्गाने येणारी रसद तोडण्यासाठी चिमाजी अप्पांनी धारावी किल्ल्याचा उपयोग केला होता.   सध्या पालिकेकडून किल्ल्याच्या वरील भागात असलेल्या बालेकिल्ल्यावर सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र किल्याचा बुरूज व इतर परिसर तसाच मोकळा सोडल्यामुळे किल्ल्याची दुरवस्था होऊ लागली आहे.

ऐतिहासिक  महत्त्व असलेला किल्ला अशाप्रकारे पडून असल्यामुळे अनेक दुर्गप्रेमी या किल्ल्याच्या संवर्धनाकरिता धावून आले आहेत. त्यांनी सुट्टीच्या दिवशी किल्ल्यावर ‘जतन मोहीम’ राबवून  तेथील वाढलेली गवत-झाडे कापून  स्वच्छता ठेवत आहेत. मात्र ही स्वच्छता करत असताना त्यांना मोठय़ा प्रमाणात मद्याच्या बाटल्या आणि अमली पदार्थ आढळून येत आहे. यामुळे किल्ल्याचा गर्दुल्ले दुरुपयोग करत असल्याने संताप निर्माण होऊ लागला आहे.  किल्ल्याच्या संवर्धनाकरिता पालिकेने पुढाकार घेऊन येथील सुरक्षेकरिता कर्मचारी तैनात करावा, अशी मागणी या दुर्गप्रेमींकडून पालिकेकडे करण्यात येत आहे.

आम्ही गेल्या चार वर्षांपासून जंजिरे धारावी या किल्याचे संवर्धन व्हावे म्हणून जतन मोहीम राबवत आहोत. मात्र या किल्यावरील शांततेचा गैरफायदा उचलून अनेक गर्दुल्ले उपस्थितीत राहून मद्यसेवन करत आहेत. त्यामुळे किल्याच्या सुरक्षेकरिता किमान एक तरी कर्मचारी पालिकेने ठेवणे गरजेचे आहे.

-श्रेयस सावंत, दुर्गप्रेमी