भाईंदर : मीरा-भाईंदर शहराच्या मुख्य मार्गावरून प्रवास करत असताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये या हेतूने मेट्रो मार्गिकेसह तीन उड्डाणपुलांची निर्मिती करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या उड्डाणपुलांचे काम जलद गतीने सुरू असून येत्या वर्षभरातच पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पुलांमुळे काशिमीरा ते भाईंदर फाटकचा प्रवास सुसाट होणार आहे.मीरा-भाईंदर शहराचा झपाटय़ाने होणारा विकास पाहता या शहरातदेखील मेट्रो प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाची निविदा २०१८ मध्ये काढण्यात आली असून प्रत्यक्षात ९ सप्टेंबर २०१९ रोजीपासून कामास सुरुवात झाली आहे.

या प्रकल्पाला ‘दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो मार्ग ९’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच याकरिता साधारण सहा हजार सहाशे सात कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हे काम एमएमआरडीए विभागामार्फत होत असले तरी या कामाचे कंत्राट जे पी इन्फ्राह्ण या कंपनीला देण्यात आले आहे. यात आतापर्यंत आठ स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार गेल्या अडीच वर्षांपासून हे काम प्रगतिपथावर सुरू आहे.

मात्र मीरा-भाईंदर शहराची भविष्याची गरज आणि येथील अरुंद रस्ते पाहता वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिकेसह तीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या उड्डाणपुलांमुळे मीरा-भाईंदर शहराच्या मुख्य मार्गावरील कशिमीरा येथून थेट भाईंदर फाटक येथील महाराणा प्रताप स्मारकाजवळ येणे सुसाट होणार आहे.

हा उड्डाणपूल प्रामुख्याने मुख्य मार्गापासून काही अंतरावर उंच आणि मेट्रो मार्गिकेपासून काही अंतर खाली असणार आहे. सध्या यातील प्रेझेंट पार्ट येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम निम्म्याजवळ आले आहे, तर इतर उड्डाणपुलांच्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी काही तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात येत आहे. सध्या काशिमीरा ते भाईंदर फाटकपर्यंतचा प्रवास हा सहा किलोमीटपर्यंतचा असला तरी वाहतूक कोंडीमुळे तो पूर्ण करणे साधारण अध्र्याहून अधिक तासाचे होते. मात्र नव्याने निर्मिती होणाऱ्या उड्डाणपुलामुळे हा प्रवास अवघ्या काही मिनिटांत करणे शक्य होईल.

असे होणार उड्डाणपूल
पहिला उड्डाणपूल :— प्लेझंट पार्क येथून सुरू होऊन हाटकेश करत सिल्वर येथे उतरणार आहे.
दुसरा उड्डाणपूल :— एस के स्टोन येथून सुरू होऊन कानाकिया करत शिवार गार्डन येथे उतरणार आहे.
तिसरा उड्डाणपूल :— दीपक हॉस्पिटल येथून सुरू होऊन गोल्डन नेस्ट करत महाराणा प्रताप स्मारकाजवळ उतरणार आहे.