लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या आझाद नगर झोपडपट्टीत बुधवारी पहाटे पाच वाजता भीषण आग लागली आहे. या आगीत तीस हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीमुळे सिलेंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. दीपक उर्फ पप्पू चौरसिया (४२) असे मृताचे नाव आहे. याशिवाय दोन अल्पवयीन लहान मुलं ही आगीत किरकोळ जखमी झाले आहेत.

भाईंदर पूर्व येथील  फाटक रोड भागात अनेक वर्षापासून आझाद नगर झोपडपट्टी उभी राहिली आहे. या झोपडपट्टीत काही रहिवासी घरे व भंगारची दुकाने आहेत. बुधवारी सकाळी अचानकपणे पाचच्या सुमारास  येथील झोपडपट्टीमध्ये आग लागली आणि काही वेळातच ही आग सर्वत्र पसरून  जवळपास तीस अधिक घरे यात जळाली आहेत. आगीचे लोट आकाशात उंच दिसून येत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आणखी वाचा-नालासोपाऱ्यात भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू; ४ मजूर गंभीर जखमी

याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन विभागाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली आहे.तर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू पुढील उपाययोजना करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी दिली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी

भाईंदरमध्ये झोपडपट्टीमध्ये लागलेली आग ही अतिशय भीषण होती. आगीची तीव्रता अधिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यावेळी बचाव कार्य करीत असताना तीन अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली आहे.