भाईंदर : मीरा-भाईंदर शहराला उपलब्ध करण्यात आलेल्या पाणीपुरवठय़ापैकी सरासरी ५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा प्रति दिवस कमी होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे शहरात मोठी पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत.

मीरा-भाईंदर शहराला प्रतिदिन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सन २०१४ पर्यंत ५० दशलक्ष लिटर तर स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर असा एकूण १३६ दशलक्ष लिटर इतका मंजूर पाणीपुरवठा केला गेला होता. मात्र सन २०१५  मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ८५ दशलक्ष लिटर इतक्या पाणी पुरवठय़ांत वाढ करण्यात आली. सन २०१७ पर्यंत ही वाढीव पाणी पुरवठा योजना टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास आली आहे. या शहराला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दररोज १३५ दशलक्ष लिटर याप्रमाणे ३१ दिवसांचा चार हजार १८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र या शहराला केवळ २२ दिवसांचाच कोटा पुरविला जात आहे. मागील दोन वर्षांच्या काळात या शहरातील लोकसंख्या दोन लाखांनी वाढली असून महाआघाडी सरकारने या शहरात एक दशलक्ष लिटर देखील पाणीपुरवठय़ात वाढ केलेली नाही. तसेच  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ३१ दिवसांच्या सरासरीऐवजी २२ दिवसांपर्यंतचेच सरासरी पाणी मिळत आहे.

त्यामुळे मीरा-भाईंदर शहराला गेल्या सहा महिन्यापासून साधारणत: दररोज ६० ते ७० दशलक्ष लिटर इतका कमी पाणीपुरवठा होत असून एक  ते १५ ऑक्टोंबर या दरम्यान या शहराला मंजूर पाणीपुरवठय़ापैकी एक हजार २० दशलक्ष लिटर इतका कमी पाणीपुरवठा झाला असल्याची टीका माजी आमदार मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

२१ ऑक्टोबर रोजी आंदोलन 

भाईंदर शहराला भेडसाविणाऱ्या भीषण पाणीटंचाईला राज्यातील शिवसेना प्रणित महाआघाडी सरकारच सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप करतानाच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ येत्या २१ ऑक्टोबर रोजी सिल्वर पार्क ते दहिसर चेकनाका या दरम्यान पदयात्रा आणि तद्नंतर या महामंडळाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सत्ताधारी भाजपने दिला आहे.