भाईंदर : मीरा-भाईंदर शहराचा नैसर्गिक समतोल राखण्याकरिता तसेच त्यावर देखरेख ठेवण्याकरिता स्वतंत्र पर्यावरण विभागाची अवश्यकता आहे. मात्र पालिकेकडून केवळ नावापुरता पर्यावरण विभाग स्थापना केला असून त्याकरिता आवश्यक पर्यावरण अधिकारी व तांत्रिक मनुष्यबळ पालिकेकडे नाही.

मीरा-भाईंदर शहर हे तिन्ही बाजूने समुद्रकिनाऱ्याने व्यापलेले शहर आहे. त्यामुळे या शहरात मोठय़ा प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे. त्याचप्रमाणे उत्तन येथे घनदाट जंगल परिसर असून त्या ठिकाणी जैवविविधता उद्यान तयार करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून शहरातील वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे पर्यावरणाचा मोठय़ा प्रमाणात ऱ्हास होत आहे.

 या महत्त्वाच्या बाबींचा समतोल राखण्याकरिता महानगरपालिका क्षेत्रात आकृतिबंद व सेवाशर्ती नियमानुसार पर्यावरण विभागाची निर्मिती करणे बंधनकारक आहे. मात्र मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून केवळ पर्यावरण उपायुक्त ठरवण्यात आला असला तरी आवश्यक पर्यावरण अभ्यासक अभियंता व  तांत्रिक बाबी उभी करण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे जैवविविधता उद्यान, कांदळवन संरक्षण आणि घनकचरा व्यवस्थापन या कामात आवश्यक पर्यावरण समतोल राखला जात नाही. तसेच पालिकेकडून वार्षिक तयार करण्यात येणारा पर्यावरण अहवालदेखील बनावट असल्याचा समोर आले होते. त्यामुळे पालिकेने महत्त्वाच्या अशा पर्यावरण विभागाची स्थापना करावी, अशी मागणी पर्यावरण अभ्यासक तुषार गायकवाड यांनी केली आहे.