अत्याधुनिक यंत्राचा भारतात प्रथमच वापर

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात उभारण्यात येणाऱ्या मेट्रो निमिर्तीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या कामासाठी पहिल्यांदाच स्ट्राडल कॅरिअर या अत्याधुनिक यंत्राचा  मीरा-भाईंदरमध्ये वापरण्यात येणार असल्याने काम जलदगतीने होणार आहे.

गेल्या दोन वर्षांंपासून ‘दहिसर -मीरा-भाईंदर मेट्रो मार्ग ९’ या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. हा मार्ग दहिसर चेकनाक्यावरून सरळ काशिमीरा नाक्यापर्यंत आणि नंतर  थेट गोल्डन नेस्ट सर्कलपर्यंत जाणार आहे. या ठिकाणी डावीकडे उड्डाणपुलाजवळून हा मार्ग भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदान जवळ नेण्यात येणार आहे.  या मार्गावर  नऊ ठिकाणी स्थानके उभारली जाणार आहेत. मात्र गेल्या काही महिन्यापासून या कामात निरनिराळे अडथले निर्माण होत असल्याने काम संथगतीने सुरु होते.

सध्या बऱ्याच ठिकाणी मेट्रोचे खांब उभारण्यात आले आहेत. मात्र या खांबनवर अद्यापही कॅप उभारणी बाकी आहे.हे काम जलद गतीने पुर्ण करण्याकरिता विदेशातून स्ट्राडल कॅरिअर हे यंत्र मागविण्यात आले आहे.विशेष बाब म्हणजे स्ट्राडल कॅरिअर मशीन भारतात प्रथमच मीरा-भाईंदर शहरात मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात आली आहे. त्याची उंची जवळपास  ९४ फुट असून यामुळे काम करताना अपघात होण्याची शक्यता फार कमी प्रमाणात आहे.या मशीनमुळे मेट्रोचे काम करत असताना लोकांना वाहतूक कोंडीचा सामना देखील करावा लागणार नाही. यामुळे मेट्रोचे काम जलदगतीने होणार आहे.