वसई: शहरातील राष्ट्रपुरुषांचे पुतळे धूळ खात पडत असल्याचे वृत्त लोकसत्ता ‘वसई विरार सहदैनिकात’ प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक सामाजिक संस्थांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे.
नालासोपारा शहरात महाराणा प्रताप समितीने ६ राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारले होते. त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर वि. दा. सारवकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव हेडगेवार यांच्या पुतळय़ांचा समावेश होता. १९९० मध्ये ही समिती बरखास्त झाली आणि पुतळे जणू वाऱ्यावर पडले. या पुतळय़ांना ना कुणी मालक ना कुणी वाली, त्यामुळे त्यांची देखभाल होत नव्हती. याबाबतचे वृत्त लोकसत्ताच्या ‘वसई विरार सहदैनिकात’ प्रसिद्ध करण्यात आले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही सामाजिक संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संस्थांचे कार्यकर्ते पुढे आले आहेत.
रविवारी कार्यकर्त्यांनी नालासोपारा येथील हेडगेवार यांच्या पुतळय़ाची साफसफाई केली. सेव्हन आर्टस ग्रुप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिलीप जोशी, प्रवीण पाटील, नीरव शुक्ला, मोहक पाटील, समीर कर्णिक, संजय वैद्य यांनी या कामी पुढाकार घेतला. आठवडय़ाभरात या पुतळय़ांचे स्वखर्चाने सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. खरेतर आमच्याकडून अनवधानाने दुर्लक्ष झाले होते. मात्र लोकसत्ताह्णने ही बाब समोर आणल्यानंतर आम्ही या पुतळय़ाची नियमित देखभाल करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपाचे वसई विरार उपजिल्हाध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली. वसई विरार महापालिका आयु्क्त अनिलकुमार पवार यांनीसुद्धा या पुतळय़ांच्या साफसफाई आणि देखभालीविषयी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. खासगी जागेतील हे पुतळे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठीचे धोरण तपासले जाईलच तसेच पालिकेतर्फेही या पुतळय़ांची देखभाल केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या पुतळय़ांची देखभाल आणि साफसफाई करण्यासाठी बरखास्त झालेली महाराणा प्रताप समिती आता नव्याने स्थापन करण्यात आली आहे. गुढीपाडव्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा निर्णय घेतला. बरखास्त झालेल्या समितीचे राजा जाधव आणि यशवंत पाटील यांना बोलवून त्यांचाही सल्ला घेण्यात आला होता. समितीमार्फत शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचा परिसरही स्वच्छ करण्यात येणार आहे.