स्वामी विवेकानंद उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य, खेळण्याचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत

भाईंदर : मीरा रोड येथील प्रसिद्ध स्वामी विवेकानंद उद्यानाची पालिकेच्या दुर्लक्षामुळे अत्यंत दुरवस्था झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उद्यानात येत असलेल्या वृद्ध व्यक्तींसह लहान मुलांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मीरा रोड येथील शांती नगर सेक्टर ६ मध्ये मीरा-भाईंदर महापालिकेचे स्वामी विवेकानंद उद्यान आहे. शांती नगर सेक्टर ६ हा परिसर दाटीवाटीची वस्ती असलेला परिसर आहे. या उद्यानात मोठय़ा प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. त्यात सकाळ व संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांची तर संध्याकाळी लहान मुलांचा जास्त समावेश असतो. अतिशय सुंदर अशा उद्यानाची आता दुरवस्था झाली आहे. उद्यानाची साफसफाई रोज केली जात नाही, त्यामुळे उद्यानात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. मुलांसाठी असलेले पाळणे, खेळण्याचे इतर साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहेत. विजेचे खांब खाली पडलेले आहेत. ते चालू स्थितीत असल्याने त्यात विजेचा प्रवाह आहे. लहान मुलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना विजेचा धक्का लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. उद्यानात पिण्याच्या पाण्याची सोय आहे, परंतु त्यात पाणीच नसल्यामुळे त्याचा काहीच उपयोग नाही. स्वच्छतागृह अतिशय खराब अवस्थेत आहेत. त्यातून प्रचंड दुर्गंधी येत आहे. याकडे प्रशासन, लक्ष देत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

या उद्यानाची आयुक्तांनी पाहणी करून संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नागरिक श्याम थवई यांनी केली आहे.

उद्यानाची पाहणी करून त्वरित तुटलेले साहित्य बदलण्यात येईल तसेच उद्यानाची साफसफाई करून पाणी व्यवस्था करण्यात येईल.

नागेश वीरकर, उद्यान अधीक्षक