scorecardresearch

नालासोपारा पूर्वेत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर; अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना जाण्यास अडचणी

नालासोपारा पूर्वेतील भागात रस्त्याच्या मध्ये उभी केलेली वाहने, व रस्त्याच्या कडेला भरविण्यात येत असलेले बाजार यामुळे येथील भागात वाहतूक कोंडी होऊ लागली.

वसई : नालासोपारा पूर्वेतील भागात रस्त्याच्या मध्ये उभी केलेली वाहने, व रस्त्याच्या कडेला भरविण्यात येत असलेले बाजार यामुळे येथील भागात वाहतूक कोंडी होऊ लागली. दिवसेंदिवस ही समस्या जटिल होत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत सेवा पुरविणारी वाहने ही या वाहतूक कोंडीत अडकून पडू लागली आहेत.

नालासोपारा पूर्वेतील भागातून मुख्य रस्ता गेला आहे. या भागातील रस्त्यावर दिवसागणिक वाहनांची संख्या वाढू लागली आहे. आधीच रस्ते अपुरे आहेत. त्यातच संतोषभुवन, धानिवबाग, वालाईपाडा, यासह इतर ठिकाणच्या भागांत मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. तर काही बेशिस्त रिक्षाचालकही रिक्षा उभ्या करतात. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या अधिक जटिल बनू लागली आहे. मात्र पालिका व वाहतूक विभाग यांच्या मार्फत कोणतीच कारवाई केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेषत: पालिकेने जे रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर बाजार भरविले जात आहेत त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. या बाजारामुळे मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. आधीच रस्ते अपुरे आहेत अशातून वाहनचालकांना वाहने काढण्यास नाकीनऊ येत आहेत. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास पेल्हार फाटा येथे विद्युत रोहित्राला आग लागल्याची घटना घडली होती. ही आग विझविण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. परंतु नालासोपारा पूर्वेतील भागात रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन बराच वेळ हे वाहन वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचे चित्र दिसून आले आहे.

जर आपत्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक सेवा देणारी वाहनेही सर्वसामान्य वाहनांप्रमाणे अडकू लागली तर नागरिकांना अत्यावश्यक सेवा वेळेत मिळणार कशी असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. पालिकेने रस्त्यावर बेकायदा बाजार भरवीत असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Problem traffic congestion nalasopara east serious difficulties accessing essential service vehicles amy

ताज्या बातम्या