भाईंदर: मीरा-भाईदर पालिकेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नती आणि बढतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पालिकेने कायम सेवेतील कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका अद्ययावत करणे तसेच स्थायी प्रमाणपत्र तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नती मिळणार आहे.

पालिकेत १ हजार १३० कायम सेवेतील कर्मचारी आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांची बढती, पदोन्नती प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे आता पालिकेने हा रखडलेला प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ७५० कर्मचारी यांची सेवापुस्तिका (सव्‍‌र्हिस बुक) अद्ययावत करण्यात आली असून ५५० कर्मचारी यांना स्थायी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यामुळे कर्मचारी यांच्या पालिका सेवेतील कार्यकाळाचा अधिकृत दस्तावेज तयार झाला आहे. त्यामुळे सर्वांना पदोनन्नी, बढती दिली जाणार आहे. कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, कार्यकारी अभियंतापासून लिपिक, वरिष्ठ लिपिक, साहाय्य आयुक्त अशा सर्वाना पदोन्नती मिळणार आहे. महिन्याभरात या बढतीच्या प्रक्रिया सुरू होतील, अशी माहिती उपायुक्त मारुती गायकवाड (आस्थापना) यांनी दिली.आम्ही यापूर्वी १२ कर्मचाऱ्यांना बढती दिली आहे तसेच १२ जणांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेतले असल्याचेही उपायुक्त गायकवाड यांनी सांगितले. करोनाकाळात पालिकेच्या ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनादेखील पालिकेने अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली आहे. याशिवाय मागील १४ वर्षांपासून पालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या प्रसेविकांना अधिपरिचारिका म्हणून बढती देण्यात आली आहे.