भाईंदर : मागील दोन दिवसांपासून मिरा-भाईंदर शहरातील पाणीपुरवठा बंद असल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात खासगी टँकरचे पाणीदेखील मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अधिकचे पाणी पैसे खर्च करून बाटलीबंद पाण्यावर नागरिकांना आपली तहान भागवत आहेत.

मिरा-भाईंदरला स्टेम प्राधिकरण व एमआयडीसीकडून दररोज १९० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. यातील निम्म्याहून अधिक म्हणजेच सुमारे ११५ दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसीकडून दिले जाते. वास्तविक मिरा-भाईंदरला दररोज २२५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र तेवढे पाणी उपलब्ध नसल्यामुळे पालिका प्रशासनाकडून पाण्याच्या वितरणाचे वेळापत्रक आखण्यात आले आहे.

हेही वाचा >>> नागरिकांना अंधारात ठेवल्याची महापालिकेची कबुली, रविवारच्या मांसाहार बंदीमुळे मिरा भाईंदरमध्ये संताप

मात्र, यावर्षी उकाडा वाढण्यानंतर पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा अनियमित होऊ लागला आहे. त्यातच जलवाहिनी फुटणे अथवा शटडाऊनमुळे पाणीपुरवठा बंद होत असल्याचे कारण वारंवार प्रशासनाकडून दिले जात आहे. शुक्रवारी २४ तासासाठी शटडाऊनचे कारण देत हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे हाल झाले.

मागील ३० ते ३५ तास पाणीपुरवठा बंद होता. मात्र शनिवारपासून तो सुरू झाला आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार त्या त्या भागात पाणीपुरवठा केला जाईल. – शरद नानेगावकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग