scorecardresearch

शहरबात:दळणवळण प्रकल्पांना गती कधी?

इंग्रजांनी भाईंदर खाडीवर रेल्वे पूल बांधला आणि १८६७ रोजी वसई रेल्वे मार्गाने मुंबईशी जोडली गेली.

सुहास बिऱ्हाडे
इंग्रजांनी भाईंदर खाडीवर रेल्वे पूल बांधला आणि १८६७ रोजी वसई रेल्वे मार्गाने मुंबईशी जोडली गेली. परंतु आजही रस्तेमार्गाने जाण्यासाठी पूल नसल्याने खाडीला वळसा घालून महामार्गावरून जावे लागत आहे. अनेक प्रकल्पांची कामे सुरू होऊन १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. वर्सोवा खाडीवरील पुलाचे काम संथगतीने सुरू आहे, भाईंदर खाडी पुलासाठी अनेक परवानग्या बाकी आहेत, मेट्रो तर आणखी दहा र्वष मिळणार नाही. त्यामुळे वसईकरांची पुढची काही वर्षे त्रासाची जाणार आहेत.
कुठल्याही शहराच्या विकासासाठी दळणवळणाच्या पायाभूत सुविधा मोठय़ा प्रमाणावर विकसित होणे आवश्यक असते. हे इंग्रजांनी ओळखले होते. पूर्वी वसई हे बंदर होते. वसईत विविध प्रकारचा शेतमाल तयार व्हायचा. पण वाहतुकीचा मार्ग नव्हता. इंग्रजांनी भाईंदर खाडीवर रेल्वे पूल बांधला आणि १२ एप्रिल १८६७ रोजी पहिली विरार लोकल धावली. यामुळे वसई-विरार मुंबईशी रेल्वेमार्गाने जोडले गेले. यामुळे वसईचा शेतमाला, भाज्या, फळे, मासे, दूध मुंबईला जाऊ लागला. पण रस्ते मार्ग विकसित झाले नव्हते. पूर्वी जर रस्त्याने मुंबईला जायचे फार दिव्य असायचे. वसई-विरार शहर हे खाडीपलीकडे असल्याने वसईतून रस्ते मार्गाने मुंबईला जाणे सहज शक्य नव्हते. लोकांकडे खासगी वाहने नसायची. १९५२ मध्ये गावातून एसटी सुरू झाली. पण ती ठाण्यापर्यंत होती. जर जायचे झाल्यास भिवंडी-ठाणे अशा मार्गाने एसटी बदलून मुंबईला जावे लागायचे. महामार्गावरील मालजीपाडा आणि ससूननवघर आदी गावांतील ग्रामस्थांना नायगाव आणि भाईंदरला बोटीने जावे लागायचे आणि तेथून मग ट्रेनने मुंबईला जावे लागायचे.
रस्ते मार्गाने जाण्यासाठी वर्सोवा (वरसेवा) खाडीवर १९७० मध्ये पूल बनविण्यात आला. त्यावरून रस्त्याने खाडीला वळसा घालून मुंबईला ये-जा करावी लागत होती. वरसावे खाडीवर पूल तयार झाल्यानंतर थेट मुंबईला ये-जा करता येऊ लागली असली तरी त्याने देखील वेळेचा अपव्यय होतो. म्हणजे वसईला रस्ते मार्गाने जायचे असल्यास भाईंदर खाडीला वळसा घालून घोडबंदर येथून वर्सोवा पूल ओलांडून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून जावे लागते. हे सुमारे ३१ किलोमीटरचे आहे. याशिवाय नालासोपारा, वसई आणि विरार शहरात येण्यासाठी महामार्गापासून ९ ते १० किलोमीटरचे अंतर पार पाडावे लागते ते वेगळे. सलग महामार्गावरून जाता येत असले तरी एकवेळ समजू शकले असते. पण महामार्गावरून जाताना मनाची तयारी करून जावे लागते. कारण एकमेव निमुळता वर्सोवा पूल असल्याने वाहतूक कोंडी होऊन तासनतास अडकून पडावे लागते. वर्सोवा पुलाच्या वाहतूक कोंडीत अडकून पडण्यासारखी शिक्षा नाही. हा पूल जुना असून त्याला पर्यायी पूल तयार कऱणे अपेक्षित होते. पण तशी दूरदृष्टी राज्यकर्त्यांची होती ना शासनाची. त्यामुळे जेव्हा हा पूल धोकादायक बनला तेव्हा महत्त्व समजले आणि २०१८ साली नवीन पूल बनविण्याचे काम हाती घेतले. विविध कारणांमुळे या पुलाचे काम रखडले. खरं तर तो पूल २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. आता त्याचे काम सुरू असून तो पुढील काही महिन्यात सुरू होईल अशी आशा आहे.
मेट्रोला आणखी १० वर्षांची प्रतीक्षा
दाटीवाटीच्या शहरात उन्नत मार्गाद्वारे ट्रेन नेता येऊ शकते ही संकल्पना मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईत प्रत्यक्षात अवतरली. मुंबईतील मेट्रो रेल्वेचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. बघता बघता मुंबईत मेट्रोचे जाळे उभे राहण्यास सुरुवात झाली. मुंबईलगच्या शहरांमध्ये मेट्रो विस्तारू लागली. मेट्रोचे १३ विविध टप्पे प्रगतिपथावर आहेत. त्यात ठाणे, कल्याण पासून मीरा- भाईंदरचा समावेश आहे. पण वसईकरांचं काय? आपल्या शहरात मेट्रो येईल आणि वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल अशा भाबडय़ा आशेपायी असणाऱ्या वसईकरांच्या वाटय़ाला सध्या मेट्रो नाही. कारण मेट्रोच्या अहवालात वसई मेट्रोसाठी २०३१ तारीख देण्यात आली आहे. प्रकल्पांना प्रत्यक्षात मूर्त स्वरूप येताना लागणारा विलंब पाहता त्याला आणखी वर्ष लागणार आहे. पुढील १० र्वष तरी मेट्रो मिळणार नाही. म्हणजे इतर शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका झालेली असताना वसईकरांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप आणखी एक तप तरी सहन करावा लागणार आहे, यात शंका नाही.
भाईंदर खाडी पुलालासुरुवातच नाही
वसई-विरार शहराला मुंबईशी जोडणाऱ्या या भाईंदर खाडीवर एमएमआरडीएतर्फे सहा पदरी पूल बांधला जाणार होता. २००० साली नवघर माणिकपूर नगर परिषद असताना या खाडी पुलाचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे ठेवला होता. तेव्हा पुलाचा खर्च ३०० कोटी होता. अखेर २०१३ मध्ये एमएमआरडीएने या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. परंतु काम सुरू झाले नव्हते. २०१८ पर्यंत या पुलाचा प्रस्तावित खर्च अकराशे कोटींवर पोहोचला होता. सप्टेंबर २०१४ पर्यंतचे लक्ष्य गृहीत धरून हे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता पुलाचे काम आणखी लांबणीवर पडल्याने खर्च २००० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. २०१३ मध्ये या कामाला अंतिम मंजुरी मिळाली होती. हा पूल कांदळवन वनक्षेत्र आणि खारभूमीच्या मिठागरातून जाणार आहे. या कामासाठी मुंबई सागरी मंडळ, इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण च्या परवानग्या मिळवाव्या लागणार होत्या. खारभूमीला आणि वन खात्याला जागेचा मोबदला द्यावा लागणार होता. या मंजुरी आणि निधी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निविदा काढून कामाला सुरुवात केली जाणार होती. पंरतु अद्याप या परवानग्या मिळालेल्या नाही. त्यामुळे पुढील १० र्वष तरी हे काम पूर्ण होईल असे वाटत नाही.
हे रखडलेले प्रकल्प करण्यासाठी शासकीय दरबारी दबाव निर्माण करून पाठपुरावा करणे गरजेचे होते. सरकारं बदलत गेली, प्रशासन ढिम्म राहिलं. इंग्रजानी पूल बांधल्यानंतर नवीन रेल्वे पूल बांधण्यासाठी २००० साल उजाडावे लागले. आणि आता अद्याप भाईंदर खाडीवरील वाहनांसाठीचा पूल तयार नाही. इंग्रजांनी रेल्वे पूल बांधला नसता तर प्रगती झाली नसती. किंवा आता ब्रिटिश असते तर एव्हना ४-५ पूल बांधून मोकळे झाले असते. म्हणून वसईकरांसाठी ब्रिटिश राजवट बरी होती, असे म्हणायची वेळ आली आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Speed up transportation projects railway bridge over bhayander creek road metro projects amy

ताज्या बातम्या