विरार : वसई विरार महानगर पालिकेतील स्मार्ट शौचालयासंबंधी घोटाळय़ातील ठेकेदारांवर पालिकेने अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. या घोटाळय़ासंदर्भात ठेकेदाराला किमान विचारणा करण्याची तसदीही पालिकेने न घेतल्याने कोटय़वधी खर्चून उभी केलेली स्मार्ट शौचालये भंगारात पडली आहेत.
वसई विरार महानगर पालिकेने सन २०१९ मध्ये आठ प्रभागात नागरिकांच्या सुविधेसाठी स्मार्ट शौचालये उभारण्याचे काम प्रॅनिक एन्टरप्राइजेस या ठेकेदाराला दिले होते. करारनाम्याप्रमाणे शौचालये पुरविण्याबरोबर १० वर्षांसाठी त्याच्या देखभाल दुरुस्तीचे दायित्वही ठेकेदाऱ्याला देण्यात आले होते. त्यामुळे २०२८पर्यंत या शौचालयाची जबाबदारी ठेकेदाराने घेणे आवश्यक आहे. पालिकेने त्यासाठी तब्बल ८० लाख मोजले आहेत. मात्र प्रत्यक्षात एकदा स्मार्ट शौचालय लावून दिल्यावर ठेकेदाराने त्याकडे ढुंकून पाहिलेले नाही. योग्य ती काळजी न घेतल्याने, देखभाल दुरुस्तीविना ही शौचालये रस्त्याच्या कडेला भंगाराप्रमाणे सडत पडली आहेत.
‘लोकसत्ता’ने मागील काही महिन्यात या संदर्भात बातम्या प्रसिद्ध करत पालिकेकडे विचारणा केली होती. त्यावेळी पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले गेले. पण तीन महिने उलटूनही पालिकेने कारवाईला सुरुवात केलेली नाही.
पालिकेच्या दप्तरी जरी आठ प्रभागात ही शौचालये बसवली असल्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात काही प्रभागात ही शौचालये आजतागायत लागलेलीच नाहीत, असे स्थानिकांनी सांगितले. जेथे लागली आहेत, तेथील शौचालयेसुद्धा पूर्णत: सडली आहेत. ठेकेदार त्याची कोणतीच दुरुस्ती करत नाही त्यामुळे देखभालीचा तर प्रश्नच नाही. सद्यस्थितीत एकाही प्रभागातील शौचालय कार्यरत नाही. अनेक शौचालयातील साहित्य चोरीलाही गेले आहे. त्याची पुन्हा दुरुस्ती होऊ शकत नाही. पालिकेने या शौचालयांकडे कोणतेच लक्ष दिले नाही. नैतिक जबाबदारी म्हणूनही चार वर्षांत या शौचालयांची परिस्थिती तपासावी, असे पालिकेला वाटलेले नाही. ठेकेदाराकडे साधी विचारणाही केलेली नाही. परंतु पालिकेने ठेकेदाराला पाच महिन्यांपूर्वी नोटीस बजावली होती, अशी माहिती आरोग्य निरीक्षक निलेश जाधव यांनी दिली होती. अर्थात त्यानंतर ठेकेदारावर कोणतीही कारवाई अद्याप केलेली नाही.
शौचालये बसवलेले प्रभाग : प्रभाग समिती ‘अ’मध्ये विरार पश्चिमेला रेल्वे स्थानक परिसर, प्रभाग समिती ‘ब’ मध्ये ओस्वाल नगरी चौक, ‘सी’ मध्ये नारंगी चौक, विरार पूर्व, प्रभाग समिती ‘डी’ मध्ये चंदन नाका नालासोपारा पूर्व, प्रभाग समिती ‘इ’ मध्ये पाटणकर सिग्नल, प्रभाग समिती ‘एफ’मध्ये संतोष भुवन, प्रभाग समिती ‘एच’ मध्ये अंबाडी रोड, प्रभाग समिती ‘आय’ पार नाका येथे शौचालये बसवल्याचे सांगितले.या संदर्भात सबंधित विभागाकडून माहिती घेऊन, रीतसर कारवाई केली जाईल – अनिलकुमार पवार, आयुक्त वसई विरार महानगर पालिका