scorecardresearch

मेट्रोसाठी आणखी १० वर्षांची प्रतीक्षा;अद्याप प्रकल्प अहवाल तयार नाही, २०३१ मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न

सर्व शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणले जात असताना वसईकरांना मात्र मेट्रोसाठी आणखी दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सुहास बिऱ्हाडे
वसई: सर्व शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणले जात असताना वसईकरांना मात्र मेट्रोसाठी आणखी दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या सर्वंकष वाहतूक अहवालात वसई-विरार मेट्रोसाठी २०३१ सालानंतर तयार होणार असल्याचे सांगितले आहे. वसई मेट्रो प्रकल्प २०२६ रोजी पूर्ण केला जाणार होता. त्याला आता विलंब लागणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
आपल्या शहरात मेट्रो सुरू व्हावी, यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे सध्या मेट्रोचे काम विविध ठिकाणी सुरू आहे. दहिसर ते डिए नगर मेट्रो २ (अ) आणि दहिसर ते अंधेरी मेट्रो- ७ या मार्गावरील एक टप्पा सुरू झाला असून दुसरा टप्पा १५ ऑगस्टला सुरू होणार आहे. तर सध्या मेट्रो २ बी,( डीएन नगर-मंडाले-चिता कॅप), मेट्रो मार्ग ४ (वडाला- गायमुख) मेट्रो मार्ग ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) मेट्रो मार्ग ६ (स्वामी समर्थ नगर-विक्रोळी) आणि मेट्रो मार्ग क्रमांक ९ (दहिसर ते भाईंदर) यांचे काम प्रगतीपथावर आहे. मेट्रो मार्ग क्रमांक १०, ११ आणि १२ च्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. २०४२ मधील वाहतूक कोंडीचा अभ्यास करून एमएमआरडीएतर्फे तयार करण्यात आलेल्या सर्वंकष वाहतूक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
मिरा रोड ते विरार स्वतंत्र प्रकल्प
वसई-विरार शहरासाठी एमएमआरडीएतर्फे तयार केला जाणारा मार्ग क्र. १३ आहे. तो मिरा रोड ते विरार असा असणार आहे. त्यासाठी स्वतंत्र प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी मे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांची सल्लागार कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मार्गाची अंदाजित लांबी २४ कि.मी. आहे. मेट्रो मार्ग १३ च्या संरेखनासाठी दोन पर्याय निश्चित करण्यात आले आहे. अहवालानुसार कामाची सुरुवात २०२६ मध्ये करण्यात येणार असून तो २०३१ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यात ३१ स्थानके असतील. खर्च ७ हजार कोटी आहे.
‘विलंबाचे कारण काय?’
वसईतील मेट्रो मार्ग २०२६ मध्ये पूर्ण केला जाणार होता. आता विलंब होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वसई-विरार शहरात मेट्रो मार्ग तयार करण्यासाठी २०१८ मध्ये सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात आली होती. त्याचे पुढे काय झाले? तो अहवाल प्रकाशित का केला नाही असा सवाल आपचे नेते जॉय फरगोस यांनी केला आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Years metro project report mumbai metropolitan development authority vasai metro project amy

ताज्या बातम्या