विपुल शहा

अत्याधुनिक तंत्रज्ञान, बदलते ट्रेण्ड्स यामुळे व्यावसायिक रीअल इस्टेट क्षेत्रात व्यवसायाच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत. या निर्माण होणाऱ्या संधी नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत आणि त्या अनुषंगाने व्यावसायिक रीअल इस्टेट बाजारपेठेत नेमके काय बदल घडून येणार आहेत याविषयी..

गेल्या दशकभरातील भारताच्या प्रगतीचा आढावा घेतल्यास एक गोष्ट सहजपणे जाणवेल की, उद्योजकतेचे बीज सहजपणे रुजले आणि आज ते चांगलेच फोफावलेले दिसते. यामध्ये केवळ पारंपरिक नाही, तर अपारंपरिक स्वरूपाच्या उद्योगांनीदेखील चांगलीच बाजारपेठ निर्माण केली आहे. ही बाजारपेठ यशस्वी होण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रस्थापित बडय़ा उद्योजकांनी स्थानिक उद्योजकांना दिलेला पाठिंबा. हे बडे उद्योजक बाजारपेठेमध्ये नवनवीन ट्रेण्ड्स निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात, असे आजवरचे चित्र आहे. परंतु येत्या काही वर्षांत यामध्ये अपारंपरिक परंतु नव्याने निर्माण होणाऱ्या उद्योजकांचे वर्चस्व राहील यात शंकाच नाही. कारण या उद्योजकांनी सहकार्य आणि लवचीकता यांच्या मिलाफातून विकसित केलेली नवी कार्यशैली.

आपल्या दैनंदिन कामाचा विस्तार आणि प्रसार नियोजनपूर्वक रीतीने करणे, ही त्यांची कार्यशैली. या कार्यशैलीच्याच जोरावर या नवउद्योजकांनी भारतीय अर्थव्यवस्थेत स्वत:चे असे खास स्थान निर्माण केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबरोबर लवचीक कार्यशैली, त्या-त्या कामासाठी योग्य व्यक्तींची पारख, कामाच्या विस्ताराची योग्य आखणी अशा या व्यावसायिक दृष्टिकोनामुळे रीअल इस्टेट बाजारपेठेच्या कामालादेखील एकप्रकारे शिस्तीचे वळण लागले आहे. या स्वरूपाच्या कार्यशैलीमुळे रीअल इस्टेट बाजारपेठेला भविष्यात निश्चितच चांगले दिवस पाहावयास मिळतील.

अलीकडच्या काळात रीअल इस्टेट बाजारपेठेत अनेक नवनवीन ट्रेण्ड्स आले. तेव्हा यात प्रभावी ठरलेल्या काही ट्रेण्ड्सविषयी थोडक्यात जाणून घेऊ या.

सहकारी तत्त्वावरील जागा

सरकारने नवउद्योगांच्या निर्मितीसाठी पोषक वातावरणास चालना दिल्यामुळे येत्या काही वर्षांत कार्यालयीन स्वरूपाच्या जागांच्या मागणीत वाढ होणार आहे. कारण आजची कार्यालयीन संस्कृती स्थानिक पातळीपुरती मर्यादित न राहता ती जागतिक झाली आहे. या जागतिकीकरणाच्या काळात कामाच्या विस्ताराबरोबर मुख्य गरज असते ती कार्यालयीन जागेची. अनेक फ्री लान्स तत्त्वावर काम करणारे व्यावसायिक किंवा कन्सल्टंट आपल्या घरातून किंवा एखाद्या कार्यालयीन स्वरूपाच्या जागेवरून काम करीत असतात. पण बऱ्याचदा असे होते की, जागा मिळते. परंतु आवश्यक त्या सेवा उपलब्ध नसतात. तर कधी सेवा उपलब्ध असतात, पण जागेची अडचण असते. त्यामुळेच मुख्य उद्योग आणि या उद्योगाला कामाचा पुरवठा करणारे सहकारी यांच्यात योग्य समन्वय साधण्यासाठी भविष्यात सहकारी तत्त्वावरील जागांना वाढती मागणी राहणार आहे. अलीकडे मोठय़ा शहरांमध्ये, उपनगरांमध्ये व्यवसायानिमित्त सहकारी तत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्याचा ट्रेण्ड विकसित होताना दिसत आहे. यामध्ये जागेबरोबर आवश्यक त्या सेवा सुविधा देखील पुरविण्यात येतात.

जसे एखादा कन्सल्टंट तीन-चार कंपन्यांसाठी काम करीत असेल तर त्याला कार्यालयीन जागेबरोबर फोन, वायफाय, इंटरनेट आदी सवांबरोबर चहा-पाण्याची सोयदेखील पुरविण्यात येते. मग कामाच्या वेळेच्या स्वरूपानुसार भाडे आकारणी केली जाते.

क्राऊडफंडेड संकल्पना

हा प्रकल्प म्हणजे निधी उभारण्याची एक प्रक्रिया आहे. यात व्यावसायिक स्वरूपाच्या जागांसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून निधी उभारला जातो. या प्रक्रियेत जगाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांना समाविष्ट करून, निधी उभारण्यामागची भूमिका स्पष्ट करून त्या साहाय्याने विकासनिधी उभारला जातो. आपल्याकडेदेखील ही प्रक्रिया आता चांगलीच मूळ धरूलागली आहे. अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शी बाजारव्यवस्था यामुळे रीअल इस्टेट गुंतवणूकदारांनादेखील गुंतवणुकीचा योग्य तो परतावा मिळतो. त्यामुळेच विकासकदेखील अलीकडे व्यावसायिक किंवा गृह प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी या क्राऊडफंडेड संकल्पनेचा वापर करताना दिसत आहे.

काम, आवश्यक सेवा आणि करमणूक एकाच छताखाली

व्यावसायिकाचा दिवसाचा अध्र्याहून अधिक वेळ हा त्याच्या कामाच्या ठिकाणी जात असतो. त्यामुळे कामाच्या ताणातून थोडा वेळ बाहेर पडण्यासाठी, करमणुकीच्या गरजांसाठी त्याला इतरत्र धावाधाव करावी लागते. ही गरज लक्षात घेऊन अलीकडे विकासक आपल्या व्यावसायिक प्रकल्पांमध्ये मॉल्स, फिटनेस सेंटर्स, स्पा सेंटर्स, कॉफी शॉप्स्, दूरसंचार सेवा आदींना समाविष्ट करून घेत आहे.

जेणेकरून कामाच्या ताणांतून थोडावेळ मुक्त व्हावेसे वाटल्यास आवश्यक त्या सर्व सोयी एकाच जागेत उपलब्ध होतील अन् वेळही वाचेल. शिवाय या स्वरूपाच्या सेवांना कमी भाडे आकारले तरी त्यापासून मिळणारा फायदा चांगलाच असतो. यामुळेच विकासक हल्ली व्यावसायिक प्रकल्पांबरोबर छोटय़ा उद्योगांनादेखील समाविष्ट करून घेत आहे. म्हणजेच वरच्या मजल्यावर आवश्यक त्या व्यावसायिक सुविधा आणि खालच्या मजल्यावर करमणूक सेवा, अशा मिश्रित स्वरूपांच्या प्रकल्पांची मागणी वाढत आहे.

तंत्रकुशल कार्यप्रणाली

तंत्रकुशल कार्यप्रणाली म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक त्या आधुनिक सेवा पुरविणे. आज कामाच्या ठिकाणी वायफाय सेवा, डेटा सिक्युरिटी, अपग्रेडेड अ‍ॅप्स् यांसारख्या सुविधा असणे आवश्यक ठरत आहे. त्याचबरोबर कॉन्फरन्स किंवा प्रेझेन्टेशन हॉलदेखील आवश्यक ठरत आहे. त्यामुळे अशा सर्व सुविधांनी युक्त अशी तंत्रकुशल कार्यप्रणाली देणे ही काळाची गरज बनत चालली आहे.

गोदाम व्यवस्था (वेअरहाऊसिंग)

व्यावसायिक रीअल इस्टेट क्षेत्रासाठी उपयुक्त अशी ही व्यवस्था आहे. माल आणि सेवा कर (जीएसटी)सारख्या सरकारी उपायांच्या अंमलबजावणीमुळे गोदांमाच्या क्षमतेत वाढ झाली आहे. शिवाय या विभागात फ्री-ट्रेण्ड हाऊसिंग झोनचीदेखील सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांमुळे उत्पादनांची साठवणूक करणे सहज-सुलभ होते. त्यामुळे वेळ आणि मूल्य वाचते. शिवाय उत्पादनाच्या दृष्टीने सुरक्षित अशी व्यवस्था आहे. आणि त्यापासून मिळणारा फायदादेखील चांगलाच असतो. यामुळेच विकासकांमध्ये हे मॉडेल अलीकडे जास्तच लोकप्रिय ठरत आहे. त्याचबरोबर, भविष्यात यामध्ये चांगल्या संधी निर्माण होण्याची शक्यता दिसते.

अत्याधुनिक तंत्रज्ञान, आवश्यक त्या सेवा-सुविधा आणि पारदर्शी व्यवस्था यामुळे येत्या काही वर्षांत व्यावसायिक रीअल इस्टेट बाजारपेठेत व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जे नव्याने व्यवसाय करू इच्छितात, त्यांच्यासाठी निश्चितच आशादायी असे वातावरण असणार आहे. तेव्हा संधी आणि विकास जोडीने आल्यावर भरभराट ही होणारच.