डॉ. उदयकुमार पाध्ये

दर तीन वा पाच वर्षांनी जवळजवळ दुप्पट होत जाणारा संगणकाचा वापर, त्याच बरोबर दरमहा लाखोंच्या संख्येने विकली जाणारी अशी अनेक अत्याधुनिक उपकरणे पाहिली की सहज लक्षात येते की, हे संकट साधेसुधे नाही, कारण नवीन उपकरणांची खरेदी ही थेट ई-कचऱ्याला जन्म देणारी असते.

रूढीप्रिय पारंपरिक घर असो, अत्याधुनिक सुखसोईंनी नटलेली शहरी सदनिका वा बंगला असो, खेडय़ापाडय़ातील साधीसुधी वास्तू असो, हिमाच्छदित पर्वतांतलं वा रणरणत्या वाळवंटातलं घरकुल असो वा अगदी असुविधांनी ओथंबलेली रेल्वे रुळाच्या काठची पत्र्या-प्लॅस्टिकची झोपडी असो, अशा सर्व ठिकाणी तसेच सर्वाच्या कार्यालयातही फारसा गुप्त न राहिलेला सुप्तशत्रू वावरतोय; नवनवीन रूपांनी जन्माला येतोय आणि दिसामासांनी अघोरी बाळसं घेऊन नको तेव्हढा गुटगुटीत होतोय! ही गंभीर समस्या आहे ‘ई’ म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची, ज्याला ई-गार्बेज असं गोंडस नाव आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना या भ्विष्यातल्या भयानक संकटाची पुरेशी कल्पनाही नाही; आणि ज्यांना आहे त्यांना त्याच्या गंभीरतेशी एक तर देणंघेणं नाही वा त्यावर विचार वा कृती करण्यासाठी फुरसत नाही. वरकरणी विशुद्ध वाटणारी ही विज्ञानाच्या वेष्टनातली विषवल्ली संपूर्ण जीवसृष्टीच्या अस्तित्वाला आणि आरोग्याला विकृत विळख्याने वेढत चाललीय! जागृती आणि जाणिवेच्या अभावी ती स्वास्थ्याचा गळा घोटते की काय असे आता वाटू लागलेय!

भौतिक, सर्वसामान्य वा नेहमीच्या साध्यासुध्या कचऱ्यापेक्षा कैकपटींनी अधिक धोकादायक, विषयुक्त आणि घातक अशा या ई-कचऱ्याचे दुष्परिणाम याच्या न्यूक्लीअर वेस्ट म्हणजेच आण्विक कचऱ्यासारखे भयंकर आहेत, कारण यामध्ये मुख्यत्वेकरून त्याचाही भाग आणि आण्विक घटकही आहेत. या ई-वेस्ट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे उगमस्थान आहे ते आपण आपली जीवनशैली अधिक सुखदायी आणि सोईंनी युक्त करण्याच्या आपल्या प्रवृत्तीमध्ये. ज्यासाठी आपण विविध प्रकारची उपकरणे आणि इलेक्ट्रिक वा इलेक्ट्रॉनिक साधने वापरतो.

*      छोटी घरगुती उपकरणे, उदा. मिक्सिर, इंडक्शन कुकर, इलेक्ट्रिक ज्युसर्स, इ.

*      मोठी घरगुती उपकरणे, उदा. मायक्रोवेव्ह ओव्हन्स, मिक्सर्स, ग्राइंडर्स, घरघंटी, पंखे, कूलर्स, एसी, इ.

*      दूरसंचार आणि माहिती संकलनासाठी वापरात असलेली इलेक्ट्रॉनिक (घरगुती आणि कार्यालयीन) उपकरणे, उदा. मोबाईल, संगणक, लँडलाइन फोन, चार्जर्स, पॉवर बँकस्, इन्व्हर्टर्स, बॅटरीज, इ.

*      प्रकाशव्यवस्थेसाठी वापरत असलेली टय़ूबज्, बल्बज्, एलईडी लॅम्प्स, टॉर्च.

*      खेळणी आणि मनोरंजनासाठी वापरण्यात येणारे सिंथेसायझर्स, की-बोर्ड्स, इलेक्ट्रॉनिक तंतूवाद्ये आणि सुषीर वाद्ये, ऑक्टोपॅडसारखी तालवाद्ये, डीव्हीडी, एमपी थ्री प्लेअर्स, पूर्वीचे टेपरेकॉर्डर्स वा इलेक्ट्रिीक रेकॉर्ड प्लेअर्स, मुलांची खेळणी, व्हिडीओ गेम्स, टॉयगन्स्, टीव्ही सेटस्, साऊंड सिस्टिम्स्, स्पीकर्स, इ.

*      दवाखाने, क्लिनिकल लॅब्स, प्रयोगशाळा, इ. ठिकाणी वापरली जाणारी इमेजिंग, स्कॅनिंग (एमआरआय/ एमआरए), क्षकिरण, सोनोग्राफी, इं.साठी वापरली जाणारी तसेच या सर्वाना पूरक अशी अनेक उपकरणे. (ही इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक अशी दोन्ही प्रकारची असतात.)

*      नियंत्रण आणि निरीक्षणासाठी उपयोगात येणारी सर्किट टीव्ही, सीसी टीव्ही, कॅमेरा, बझर्स आणि सुरक्षा यंत्रणा.

*      कार्यालयीन आणि वैयक्तिक वापरासाठी, विशेषत: माहिती आणि तंत्रज्ञान यासाठी सर्रास वापरली जाणारी फॅक्स, कॉपियर मशिन्स, स्कॅनर्स, प्रिंटर्स, आयपॅड, डेस्कटॉप, मॉनिटर्स इ.

या सर्व उपकरणांत वीजवहन, संचालन आणि नियंत्रण यासाठी आवरणयुक्त (कोटेड) तारा, कंडेन्सर्स, डायोड्स, ट्रान्झिस्टर्स आणि तत्सम पूरक कार्य करणारी छोटीमोठी उपकरणे असतात. या सर्व वस्तू वा उपकरणे नादुरुस्त झाल्यावर ती दुरुस्त करून वा त्यातील उपयुक्त भाग काढून त्यांचा पुनर्वापर करणे आणि दुरुस्त करण्यापलीकडे असल्यास त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे वा त्यासाठी काही खासगी वा सरकारी संस्थांकडे सुपूर्द करणे हाच मार्ग असतो. पण या वस्तू जर उघडय़ावर वा कचऱ्यात टाकल्या गेल्या किंवा जमिनीत खड्डा करून गाडल्या गेल्या तर त्या घातक ठरतात. यातील कॅथोड रे नलिकेतील शिसे, बेरियम, फॉस्फोरस, जस्त, एलसीडी आणि एलईडी मॉनिटर्समधील आण्विक घटक आणि जड धातू असतात. ते खुल्या वातावरणात फेकल्याने अपरिमित हानीकारक ठरतात. एकाच वेळी यातील विषारी आणि किरणोत्सारी घटक वायू, जल आणि भूमिप्रदूषणास कारणीभूत होतात. विजेच्या पीव्हीसी आवरणयुक्त तारांपासून विषारी डायऑक्सिन निघते. अशा प्रकारचे अनेक घटक निष्काळजीपणे कोठेही फेकणे अनिष्ट आणि अशास्त्रीय होय.

दर तीन वा पाच वर्षांनी जवळजवळ दुप्पट होत जाणारा संगणकाचा वापर त्याच बरोबर दरमहा लाखोंच्या संख्येने विकली जाणारी अशी अनेक अत्याधुनिक उपकरणे पाहिली की सहज लक्षात येते की, हे संकट साधेसुधे नाही, कारण नवीन उपकरणांची खरेदी ही थेट ई-कचऱ्याला जन्म देणारी असते. घरात तसेच कार्यालयीन वापरासाठी होत जाणारी- (आर्थिक सुबत्तेमुळे गरजेपेक्षा अधिक) अशी या उपकरणाची खरेदी ई-कचरा गणितीय पद्धतीने वाढवत चाललीय. अशा करोडोंच्या संख्येने अस्तित्वात असलेल्या उपकरणांच्या संख्येमुळे हा कचरा साठविणे वा पुन:प्रक्रियेसाठी आवश्यक जागा मिळवणेही भविष्यात मुश्कील होईल. या कचऱ्यात एक हजारापेक्षा अधिक संख्येने असलेले घातक घटक यांचे नियोजन करणे हेही आत्ताच भेडसावणारी समस्या ठरू पाहातेय. ई-कचऱ्याचा मुख्य भाग असलेले लोह आणि अलोह धातू, प्लॅस्टिक, काच, प्रिंटेड सर्किट बोर्डस्, सिरॅमिक रबर आणि यातील तांबे, अ‍ॅल्युमिनियम या सर्वाचे प्रमाण १० ते २० टक्के यामध्ये आहे. प्लॅटिनम, प्लॅडियम असे मौल्यवान धातू, याशिवाय शिसे, पारा, अर्सेनिक, कॅडमियम, होक्सावेलेट, क्रोमियम आणि फ्लेम रिटाडेट. इ. मुळे या कचऱ्याचा विषारीपणा अनेक पटींनी वाढतो. हेलोजेनेटेड पदार्थ, सर्किट बोर्डमधील ब्रोमिनेटेड जाळल्यावर डाय ऑक्सिन आणि फ्यूरॉन हे तयार होतात; जे मानवीच नव्हे तर सर्व सजिवांच्या आरोग्याला अत्यंत घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतातला असा ७० टक्के कचरा हा १० प्रगत राज्यांतून आणि त्या राज्यांतील १० मोठय़ा शहरांतून येतो. दुर्दैवाने अशा राज्यांत  आणि शहरांत आपल्यापैकी बऱ्याच जणांचे वास्तव्य आहे. म्हणून ई-कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीची जबाबदारी आपल्यावर इतरांपेक्षा अधिक आहे. Reduce, Reuse & Recycle या तत्त्वानुसार वागले तर या भयानक राक्षसावर नियंत्रण मिळविता येईल.

ई-कचरा घरात साठवून ठेवला वा उघडय़ावर टाकला किंवा जमीन वा पाण्यात टाकला तर तो घातक आहेच, यातून उत्पन्न होणारे विषारी वायू आणि विद्युत चुंबकीय लहरी या आपल्या शरीरातील मेंदूची केंद्रे, मज्जा आणि स्नायूसंस्था यांच्या संवेदनाशीलतेवर आणि सूक्ष्म कार्यावर विपरीत परिणाम होतो. ही उपकरणे चालू स्थितीतही शरीरावर प्रभाव पाडत असतातच, पण बिघडलेल्या अवस्थेतही वा कचऱ्यापासून अशा प्रकारची हानी संभवते. उदाहरणच द्यायचे झाले तर चालू स्थितीतील मायक्रोवेव्ह ओव्हनजवळ उभे राहिले तर येणारा किरणोत्सार हा क्ष-किरण मशीनच्या किरणोत्साराच्या प्रभावाएवढय़ा क्षमतेचा असतो. याचप्रमाणे इतरही उपकरणे आपल्या कुवतीनुसार कमी-अधिक प्रमाणात चांगल्या आणि खराब स्थितीत घर वा कार्यालयात विद्युत चुंबकीय प्रदूषण (ईलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉन्टॅमिनेशन) म्हणजेच ईएमसी करीत असतात. याबद्दल रॉबर्ट बेकर या युरोपातील प्रसिद्ध संशोधकाने प्रसिद्ध केलेली निरीक्षणे खूप महत्त्वाची वाटतात. अगदी उपद्रवमूल्य नसल्यासारखे भासणारे निरागस फ्लूरोसंट आणि सीएफल दिवे हे चालू असतानाच नव्हे तर कचऱ्यातूनही त्यातील फॉस्फरचा थर निघाल्यामुळे अतिनील किरणे फेकत राहतात आणि शरीरासाठी ती घातक ठरतात. म्हणूनच अशी खराब झालेली सर्व उपकरणे घरात साठवून न ठेवता तसेच बाहेर निष्काळजीपणे न फेकता त्यांची शास्त्रीय पद्धतीने साठवण वा प्रमाणित पुनर्वापर किंवा सुरक्षित पद्धतीने नष्ट करणाऱ्या संस्थांच्या हवाली करणे हेच शहाणपणाचे ठरेल. राज्य सरकार आणि महानगरपालिका त्याच प्रमाणे काही खासगी अधिकृत संस्था हे कार्य करताना दिसतात. विशेषत: चेन्नई आणि बंगळुरू इथे हे कार्य बऱ्याच मोठय़ा प्रमाणात आणि अत्यंत शिस्तबद्ध रीतीने केले जाते. याशिवाय असंघटित क्षेत्रात हे कार्य केले जाते. दर वर्षी देशभरात सुमारे आठ ते दहा लाख टन ई-कचरा बनतो. ज्यात उत्तर भारताचा वाटा सुमारे ४० टक्क्यांपेक्षा कमी-अधिक असल्याचे सांगतात. जगभरात तो सुमारे ५० दशलक्ष मेट्रिक टन एवढा बनतो, ज्यातील फक्त १२.५ टक्केच पुनर्वापर करण्याजोगा असतो. भारत सरकारने या कचऱ्याच्या विल्हेवाटीसंबंधीचे नियम ई-वेस्ट हँडलिंग रुल्स – २०१२ मध्ये बनविले आहेत. एकूण विषारी पदार्थाचा ७० टक्के भाग ई-कचऱ्याचा असतो आणि सरसकट कचऱ्याच्या तो फक्त दोन टक्केच असतो. यावरून त्याच्या विषाक्ततेची कल्पना यावी.

संपूर्ण विश्वच या ई-कचऱ्याच्या प्रभावाने त्रस्त होतेय. म्हणून खरी गरज सध्याच्या ई-कचऱ्याच्या योग्य विल्हेवाट आणि पुनर्वापराची असली तरी तो कमीत कमी निर्माण कसा होईल हेही पाहणे आवश्यक आहे. यासाठी व्ही. व्ही. जॉनने ‘द बुकवर्म टर्नस्’मध्ये वर्णन केल्यासारखे करावे लागेल. या संगणकीय मायाजालाच्या गोंधळाला कंटाळून बुकवर्म, ई-बुक न वाचता थेट रद्दीवाल्याकडे मूळ पुस्तक शोधण्यासाठी जसा बाहेर पडतो तो मार्ग चोखाळायची आपणा सर्वावर वेळ बेतू शकते. निसर्गातील परिसंस्था आणि संपूर्ण जीवसृष्टीला विनाशाकडे ढकलणाऱ्या या ई-कचऱ्यारूपी मानवनिर्मित राक्षसाला माणसाळवण्यापेक्षा साधी, सोपी, सरळ, निसर्गस्नेही आणि पर्यावरण हितैषी अशी जीवनपद्धती अंगीकारणे हे आत्ताच सुरू करणे आवश्यक आहे.

cosmic_society_india@yahoo.co.in