19 November 2017

News Flash

गणपतीची गेस्टरूम

बाप्पाला प्रिय असणाऱ्या एकवीस मोदकांच्या तयारीत स्वयंपाकघर मशगूल असतं.

सुचित्रा साठे | Updated: August 19, 2017 4:47 AM

काही जणांनी दूरदृष्टीने स्वत:च्या घराचा नकाशा काढताना गणपतीच्या येण्याची नोंद ठेवून कौतुकाने जागेची व्यवस्था केलेली असते. काहींचं देवघरच इतकं प्रशस्त असतं की या आठ-दहा दिवसांच्या पाहुण्याची तिथे आरामात तात्पुरती सोय होते. काही जणांकडे सुरक्षित कोनाडा असतो, तर काहींनी दिवाणखान्यातील शोकेसमध्ये अर्धा किंवा संपूर्ण भाग रिकामा करून त्याची सोय केलेली असते. काहींनी टिकाऊ लाकडी फोल्डिंगच्या घराची सोय केलेली असते. काही उत्साही मंडळी दरवर्षी त्याला नवीन घर थाटण्याच्या बाबतीत आग्रही भूमिका घेत असतात.

पाहुणे येणार म्हटल्यावर आपल्याला किती आनंद होतो! त्यातून ते मुक्कामाला येणार असतील तर दुधात साखरच. त्यांच्या येण्याची बातमी कळल्यापासून तर मनाला सतत त्यांचेच वेध लागतात. आपली राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, त्यांना काय आवडतं त्याप्रमाणे मेनू प्लॅनिंग, त्यांच्या मनोरंजनाची व्यवस्था, त्यांना भेटायला येणाऱ्या माणसांचं आदरातिथ्य, त्यांना आपलं घर आवडावं, त्यांचं वास्तव्य सुखाचं व्हावं म्हणून आपल्या घराची आवराआवर असे एक ना दोन अनेक विचारतरंग मनात उमटत असतात. पण सगळ्याचा केंद्रबिंदू ते पाहुणेच असतात. मग हाच पाहुणा आपला लाडका गणेश असेल तर! त्याच्या गेस्टरूमचा विचार पहिला मनात डोकावतो. त्यासाठी त्याचे आकारमान ठेवणे क्रमप्राप्त असते. सुबक ठेंगणी मूर्ती हवी की नजरेत भरणारी वजनदार, असे पर्याय पुढे येतात. यजमानांच्या खिशावर आणि तरुणाईच्या खांद्यावर भार टाकत उत्तर शोधलं जातं. एकदा मूर्तीचं क्षेत्रफळ, घनफळ ठरलं की सोयीस्कर, सुखावह जागेचा शोध चालू होतो. हे त्याचे घर, हे त्याचे घर, जगावेगळे असावे सुंदर ही प्रत्येकाचीच भावना असते. त्याला स्थानापन्न होता येईल आणि आजूबाजूला डावीउजवीकडे त्याला हव्या असणाऱ्या गोष्टी ठेवता येतील, एवढी तरी जागा हवीच, यावर सगळ्यांचं एकमत असतं.

काही जणांनी दूरदृष्टीने स्वत:च्या घराचा नकाशा काढताना त्याच्या येण्याची नोंद ठेवून कौतुकाने जागेची व्यवस्था केलेली असते. काहींचं देवघरच इतकं प्रशस्त असतं की या आठ-दहा दिवसांच्या पाहुण्याची तिथे आरामात तात्पुरती सोय होते. काही जणांकडे सुरक्षित कोनाडा असतो, तर काहींनी दिवाणखान्यातील शोकेसमध्ये अर्धा किंवा संपूर्ण भाग रिकामा करून त्याची सोय केलेली असते. काहींनी टिकाऊ लाकडी फोल्डिंगच्या घराची सोय केलेली असते. काही उत्साही मंडळी दरवर्षी त्याला नवीन घर थाटण्याच्या बाबतीत आग्रही भूमिका घेत असतात. हे घर बांधताना मस्तपैकी जागून एकटय़ाने किंवा ‘सह’योगाने बांधण्याचा त्यांचा आग्रह असतो. म्हणून कल्पकतेचं वरदान, हौस आणि आधुनिक तंत्रज्ञान हातात हात घालून गृहनिर्मिती करतात. काहीजण ‘आलास ना बाबा आमच्या घरी पाहुणा, आता आमची झोपडी गोड मानून घे,’ म्हणत फारसा विचार न करता झटपट त्याची सोय करतात. काहींना मस्त मांडी घालून बाप्पाची पूजा, त्याच्याशी सुखसंवाद करायला आवडतो. ते त्याची सोय खालीच चौरंगावर करतात. काहींना उभं राहून पूजा करायची असते तर काहींचे वय त्यांना खुर्ची सोडून देत नाही. सगळे विचार थांबले की त्यांच्या गेस्टरूमवर शिक्कामोर्तब होते.

जागा ठरली की सुशोभित करण्याचे वेध लागतात. मग रंगरेषांवर हुकमत असलेले हात कामाला लागतात. अनेक प्रकारच्या सजावटींच्या वस्तूंनी बाजार ओसंडून वाहात असतो. रंगीबेरंगी, सोनेरी चमकणाऱ्या कागदांच्या माळा, नक्षी, प्लॅस्टिकची कागदाची फुलं असं साहित्य हजर होतं. कोणी खास थीम निवडतात. पर्यावरणाला अग्रक्रम देऊन थर्माकोलवर काट मारतात. देखण्या इंटिरियरने गणेशाची रूम झगमगू लागते. शेवटचा हात फिरवून सफाईदारपणा आणला जातो.

नंतर प्रकाशयोजनेवर प्रकाश पडतो. बाप्पाच्या तोंडावर उजेड हवा हं, नवीन माळ लावा बरं का, अशा सूचना घुमत असतात. आवडीनुसार दिव्यांच्या माळा आणल्या जातात. काही माळा शांत, स्थिर प्रकाश देणाऱ्या, एकाच रंगाच्या, काही विविध रंगांच्या, काही लुकलुकणाऱ्या सतत डोळे मिचकावणाऱ्या, काही सतत दिशा १८० अंशातून बदलणाऱ्या, काही अगदी चिमुकल्या आकारात दोन- तीन जणांची युती निभावणाऱ्या. सगळ्या दिव्यांनी बाप्पाचं घर नवरंगात न्हाऊन निघतं. नववधूप्रमाणे सजून तयार होतं. समई, लामणदिवा स्निग्ध सोनेरी, चैतन्यदायी, प्रकाशाचा अभिमान मिरवण्यात मागे राहत नाहीत. त्यांना वाऱ्याच्या गुदगुल्यांनी हसू आवरत नसल्यामुळे काचेच्या कंदिलात बंदिस्त राहण्याच्या त्या तयारीत असतात. काही ठिकाणी बाप्पाचं वास्तव्य असेपर्यंत डोळ्यात तेल घालून त्यांना अंधारावर मात करण्याचं कर्तव्य पार पाडायचं असतं. त्यामुळे बाप्पाच्या जवळ त्याचं स्थान निश्चित असतं.

भटजींशिवाय बाप्पाचा गृहप्रवेश होणं काहींना पटतं, काहींना नाही. त्यासाठी केव्हाही या पण निश्चित या, असा पर्याय भटजींना आधीपासून दिलेला असतो. मंत्राच्या उच्चाराने भारावलेल्या वातावरणाबाबत काहींचा आग्रह तर काहींची सीडी, कॅसेट असा पर्याय जवळ करण्यास पसंती.

गणेश चतुर्थीच्या दिवशीची लगबग तर विचारूच नका. बाप्पाला आवडणाऱ्या दूर्वा इतरांना ‘दूर व्हा दूर व्हा’ म्हणत पूजेच्या थाळीत अग्रभागी विराजमान होतात. लालचुटुक जास्वंदी फारच भाव खाते. केवडय़ाचं मोल अनमोल होतं. कळलावीला बाप्पाच्या विरहाची कळ काढवत नाही. चाफा, मोगरा अशी सुवासिक फुले, पत्री, धूप, उदबत्ती, सगळे बाप्पाची ‘गेस्टरूम’ फ्रेश करण्यासाठी तत्पर असतात.

बाप्पाला प्रिय असणाऱ्या एकवीस मोदकांच्या तयारीत स्वयंपाकघर मशगूल असतं. छोटी कंपनी नवीन कपडे घालून बाप्पा आणण्यासाठी आतूर झालेली असते. थाळी किंवा पाट, टोपी, झांजा, पायावर घालायला दूध, पाणी, औक्षणाची तयारी सिद्ध होते. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ हे आमंत्रण स्वीकारून ‘बाप्पा’ दारात हजर होतात. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या असतात. आनंदाची कारंजी उडत असतात. बाप्पाची ‘गेस्टरूम’ त्याच्या पदस्पर्शासाठी केव्हाची आतूर झालेली असते.

suchitrasathe52@gmail.com

First Published on August 19, 2017 4:47 am

Web Title: ganpati festival 2017 house decoration for ganpati special room for ganpati